Author: Raj

  • कार्लसन जिंकला पण चकी झळकला

    १९९५ मध्ये एका स्पर्धेत खेळताना साहेबांचा मूड नव्हता म्हणून प्रत्येक गेममध्ये दहा-पंधरा खेळ्या झाल्या की तो बरोबरीचा प्रस्ताव ठेवायचा. समोरचा ‘सुटलो! देवा, तुझे आभार कोणत्या जन्मात आणि कसे फेडू तेवढं कळव’ असं मनातल्या मनात म्हणून प्रस्ताव लगेच स्वीकारायचा. पण बारीव्ह आणि बेलियाव्हस्की लय शाणे, ते म्हनले नाय आम्हाला जित्तायचंच हाय, मंग तेनला धू-धू धुतलं गड्यानं.

    या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेमध्ये सध्याचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला कोण आव्हान देणार याचं उत्तर अखेर मिळालं. लंडनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॅंडिडेट्स स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने निसटता विजय मिळवला. कार्लसन आणि रशियाचा व्ह्लादिमिर क्रामनिक या दोघांनाही ८.५ गुण मिळाले होते. असं झालं तर काय करायचं याविषयी प्रत्येक स्पर्धेचे नियम वाटेल तसे असू शकतात. इथे कार्लसनला क्रामनिकपेक्षा जास्त विजय मिळाले म्हणून त्याला विजेता ठरवण्यात आलं. बिचाऱ्या व्ह्लादचा ‘क्राइम मास्टर गोगो’ झाला. मात्र क्रामनिकनं हा काहीसा अन्यायकारक निर्णय खिलाडू वृत्तीनं स्वीकारला.

    ही स्पर्धा या वर्षीच्या सगळ्या स्पर्धांमध्ये सर्वोच्च दर्जाची होती याचं कारण यातले आठही खेळाडू ज्यांना ‘सुपर-जीएम’ किंवा सुपर ग्रॅंडमास्टर्स म्हणता येईल असे होते. कार्लसन, क्रामनिक, अरोनियन, मागच्या वर्षीचा आव्हानवीर गेलफांड, इव्हानचुक, स्विडलर, ग्रिश्चुक आणि राजाबोव्ह. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे एक कार्लसन सोडला तर बाकीच्या सर्व खेळाडूंना रशियन भाषा येत होती. रशिया आणि बुद्धिबळ यांचं सख्य बरंच जुनं आहे आणि आजही विश्वविजेतेपद रशियाकडे नाही हे रशियाच्या खेळाडूंना बोचत असतं. म्हणूनच या स्पर्धेआधी कास्पारोव्हने नेहमीप्रमाणे दर्पोक्ती केली, “विश्वविजेतेपद भारतातून नॉर्वेकडे जाण्याआधी रशियात यायला हवं.” विश्वविजेतेपद भारतातच राहील ही शक्यता अर्थातच कास्पारोव्हने जमेला धरलेली नाही पण ती धरली तर मग तो कास्पारोव्ह कसला? अर्थात कास्पारोव्हला बाकीचे मुद्देही टोचत असणार. एकतर विश्वविजेतेपदाची स्पर्धा परत फिडेच्या ताब्यात गेली आहे, सगळे खेळाडू नियमानुसार वागत आहेत आणि मुख्य म्हणजे यात तो कुठेच नाही. तर रशियाला निदान या वर्षी तरी चान्स नाही हे नक्की झालं.

    कार्लसन स्पर्धा जिंकणार याविषयी मिडियात बरीच चर्चा होती. कास्पारोव्हचा सर्वोच्च इलो रेटिंगचा विक्रम (२८५१) नुकताच कार्लसनने मोडला. आधीच तो मिडियाचा फेवरिट होता आता तर स्टार झालाय. ब्रिटीश ग्रॅंडमास्टर शॉर्टने तर त्याच्यामुळे बुद्धिबळात ‘रनेसान्स’ येणार आहे असं म्हणायचंही शिल्लक ठेवलं नाही. कार्लसन दिसायला चांगला आहे, मॉडेलिंग करतो त्यामुळे लोकप्रियही आहे. मुद्दा आहे तो रनेसान्स या शब्दाबद्दल. याचं थोडंसं अमेरिकन ‘ऑस्सम’सारखं झालंय. पिझ्झा आवडला तर तो ‘ऑस्सम’ आणि नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर गेला तर ते ही ‘ऑस्सम’, अधेमधे काही नाही. अमेरिकेच्या पाच लेखकांनी थोर कादंबऱ्या लिहिल्या की तो झाला ‘अमेरिकन रनेसान्स’. रनेसान्सचा अर्थ पुनरुज्जीवन असा घेतला तरी शॉर्टच्या लेखातून काहीच अर्थबोध होत नाही. बुद्धिबळात आता नवीन खेळाडू येत आहेत हे मान्य, आणि जर ते आनंदपेक्षा चांगले खेळत असतील तर त्याला हरवतीलच. आनंदचा खेळ आधीइतका आक्रमक नाही पण त्याचबरोबर त्याने सलग तीन विश्वविजेतेपद स्पर्धा जिंकल्या आहेत हे का सोईस्करपणे विसरलं जातंय? आणि या सर्व स्पर्धांमध्ये दोन्ही खेळाडू तरुण नव्हते हे ही विशेष. मग फक्त कार्लसन मॉडेलिंग करतो आणि तरुण वर्गामध्ये लोकप्रिय आहे म्हणून त्याला रनेसान्स म्हणायचं का? मग आमच्याकडे तर रनेसान्सची आख्खी टीम आहे, आहात कुठे?

    तर आता आनंदची गाठ आहे कार्लसनशी. कार्लसनचा अत्यंत महत्त्वाचा गुण म्हणजे जिद्द. अगदी शेवटापर्यंत निकराने लढत राहून तो प्रतिस्पर्ध्याच्या सहनशक्तीचा अंत बघतो. बरेचदा हा ताण सहन न झाल्यामुळे त्याचे प्रतिस्पर्धी चुका करतात आणि त्याचा फायदा त्याला मिळतो. वेगवेगळ्या ओपनिंगमधून फायदा मिळवण्याचं कसब त्याच्याकडे फारसं नाही – त्याचा भर असतो तो मिडल आणि एंड गेमवर. याउलट ओपनिंगमध्ये सध्या आनंदची गणना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये व्हावी. आनंदचं बचावतंत्रही भक्कम आहे आणि मुख्य म्हणजे जागतिक विश्वविजेतेस्पर्धांचा भरपूर अनुभव त्याच्याकडे आहे. या सर्वांचा तो पुरेपूर उपयोग करेलच. आणि कार्लसनही पूर्ण तयारीनिशी उतरणार यात शंका नाही. आनंदची टीम ठरलेली आहे, कार्लसन कुणाचं साहाय्य घेतो आहे हे बघणं रोचक ठरावं.

    या स्पर्धेमध्ये कार्लसनचा खेळ म्हणावा तितका चांगला झाला नाही. स्पर्धेच्या पहिल्या भागात त्याने चांगला खेळ केला पण दुसऱ्या भागात तो काही वेळा अडचणीत आला. तुलनेने क्रामनिकचा खेळ बऱ्यापैकी समतोल आणि उच्च दर्जाचा होता. कार्लसन ही स्पर्धा एकहाती जिंकणार असा अंदाज क्रामनिकने सपशेल खोटा ठरवला. शेवटच्या क्षणापर्यंत तो जिंकणार की कार्लसन असा प्रश्न होता. अरोनियनने सुरुवातीला चांगला खेळ केला आणि आघाडी घेतली पण शेवटी ताणाखाली येऊन बऱ्याच चुका केल्या आणि तो चवथ्या क्रमांकावर गेला. तिसरा क्रमांक स्विडलरने पटकावला.

    याखेरीज स्पर्धेत एक वाइल्डकार्ड होतं ते म्हणजे युक्रेनचा व्हॅसिली इव्हानचुक. इव्हानचुक आनंद आणि क्रामनिकच्या पिढीचा. एका वाक्यात सांगायचं तर जिनियस पण उलट्या खोपडीचा माणूस. नुसतं टॅलेंट असेल पण त्याला शिस्तीची जोड नसेल तर काय होतं याचं उत्तम उदाहरण. स्वत:वर नियंत्रण ठेवता आलं असतं तर नक्की विश्वविजेतेपद मिळालं असतं. त्याचा मूड असेल तर मग समोर कास्पारोव्ह असो की आणखी कुणी, खात्मा ठरलेला. मूड नसेल तर इतक्या दळभद्री चुका करतो की ज्याचं नाव ते. बरं, बाकीचे खेळाडू विश्वविजेतेपद, विजय किंवा रॅंकिंग यांच्यासाठी खेळतात, चकीला कशाचीच पर्वा नाही. १९९५ मध्ये एका स्पर्धेत खेळताना साहेबांचा मूड नव्हता म्हणून प्रत्येक गेममध्ये दहा-पंधरा खेळ्या झाल्या की तो बरोबरीचा प्रस्ताव ठेवायचा. समोरचा ‘सुटलो! देवा, तुझे उपकार​ कोणत्या जन्मात आणि कसे फेडू तेवढं कळव’ असं मनातल्या मनात म्हणून प्रस्ताव लगेच स्वीकारायचा. पण बारीव्ह आणि बेलियाव्हस्की लय शाणे, ते म्हनले नाय आम्हाला जित्तायचंच हाय, मंग तेनला धू-धू धुतलं गड्यानं. सगळ्या स्पर्धेत फक्त एक पराभव – क्रामनिककडून. एकदा लिनारेसच्या स्पर्धेत फ्लाइटचे गोंधळ निस्तरताना पोचायला पहाटेचे पाच वाजले. दुपारी स्पर्धा सुरू. पहिला डाव कुणाशी तर खुद्द कास्पारोव्हशी. तरी पठ्ठ्या जिंकला, पाचव्या राउंडमध्ये कार्पोव्हलाही धूळ चारली आणि स्पर्धा जिंकली. गेल्या दहा वर्षात कास्पारोव्हनं स्पर्धा जिंकली नाही असं पहिल्यांदाच झालं.

    असा हा इव्हानचुक किंवा ‘चकी’. लंडनच्या स्पर्धेत त्याच्याबरोबर डाव असलेल्या प्रत्येकाला आज बाबाचा मूड कसा आहे याची धास्ती पडलेली. सुरुवातीला चकीला सूर सापडत नव्हता. प्रत्येक वेळी घड्याळ जिंकायचं, वेळ पुरायचा नाही. राजाबोव्ह, अरोनियन आणि ग्रिश्चुककडून हरला. नवव्या डावात राजाबोव्हला हरवून परतफेड केली. दहाव्या डावात अरोनियनबरोबर खेळताना त्याने चक्क ‘बुडापेस्ट गॅंबिट’ वापरली. हा प्रकार या दर्जाच्या खेळामध्ये कधीही वापरला जात नाही. हा डाव त्यानं अरोनियनला सहजी जिंकू दिला असंही बरेच लोक म्हणाले. त्याचा राग येऊन की काय, बाराव्या डावात त्याने चक्क कार्लसनला हरवलं आणि एकच खळबळ माजली. गेल्या अडीच वर्षांमध्ये कार्लसन कुणाकडूनही हरला नव्हता. या पराभवामुळे क्रामनिक पहिल्या क्रमांकावर आला. अर्थात पुढच्याच डावात कार्लसनने राजाबोव्हला हरवून बरोबरी साधली. शेवटच्या डावात कार्लसन आणि क्रामनिक दोघेही पहिल्या क्रमांकावर होते आणि क्रामनिकचा सामना होता चकीशी. परत चकी फॉर्ममध्ये आला आणि त्याने क्रामनिकलाही हरवलं. संपूर्ण स्पर्धेतील हा क्रामनिकचा एकमेव पराभव. चकीने स्पर्धेच्या दोघाही विजेत्यांना हरवलं!

    नेहमीप्रमाणे भारतीय मिडियाला असं काही चाललं आहे याचा पत्ताही नव्हता. टाइम्स ऑफ इंडिया आणि एक्सप्रेस यांचा अपवाद वगळता साधी बातमीही नाही. त्यातही एक्सप्रेसच्या बातमीत तपशिलाच्या इतक्या चुका – कोणता राउंड कुणी कुणाशी खेळला यासारख्या गोष्टी जाणून घ्यायला आजच्या काळात लंडनला जावं लागत नाही. तुलनेनं पाश्चात्त्य दैनिकांचं कव्हरेज पाहिलं की या भारतभूची आणि आपल्या थोर्थोर वगैरे संस्कृतीची दया यायला लागते. एरवी भारत म्हटलं की मिडियाच्या उड्या पडतात. या पार्श्वभूमीवर ही अनास्था आश्चर्यकारक आहे कारण या स्पर्धेचा विजेता आनंदशी खेळणार आहे.

    —-

    १. ‘बेगानी शादी में अब्दुला दीवाना’ सिंड्रोम. होनुलुलुपासून ग्वाटेमालापर्यंत कुणाचाही, कशाचाही भारतभूशी दूरान्वयानेही संबंध सापडला की “बजाव रे बजाव.”

    एक्झिबिट अ. “सुनीता विल्यमसनं आकाशात सामोसे नेले होते!! धतडं ततडं.” “अहो सामोसे नेऊ द्या नाहीतर वडेवाल्या जोश्यांचं आख्खं दुकान नेऊ द्या. तुम्ही का निपाणी बुद्रुकमध्ये उड्या मारताय?”

    एक्झिबिट ब. हिग्ज बोझॉन सापडला, बोझॉन-बोस-सत्येंद्रनाथ बोस-मेरा भारत महान. धतडं ततडं.

  • कवीमनाचा गुप्तहेर : जॉन ल कारे

    ल कारे स्वत: माजी गुप्तहेर असल्यानं त्याचे या बाबतीतले तपशील अचूक असणारच पण इतर विषयांवर लिहीतानाही त्याचं फिल्डवर्क पक्कं असतं. कादंबरी नसती तर ‘रिपोर्ताज’ म्हणता यावं इतके तपशील दिलेले असतात.

    पुस्तकांच्या दुकानात गेल्यावर कधीकधी कोणती पुस्तकं कुठे ठेवली आहेत यावरून बरेच अंदाज बांधता येतात. लॅंडमार्कमध्ये फेरफटका मारताना इंग्रजी पुस्तकांचे दोन वेगवेगळे विभाग दिसले. एक होता ‘फिक्शन’ आणि दुसरा ‘लिटररी फिक्शन’. फिक्शनखाली लोकप्रिय लेखक – ग्रिशॅम, क्राइकटन, डॅन ब्राऊन, स्टीफन किंग. लिटररी फिक्शन खाली उच्च वर्गातील लेखक, बहुतेकांना नोबेल मिळालेलं किंवा मिळेल अशी चर्चा असलेले – पामुक, मारक्वेझ, मुराकामी, रश्दी. हे पाहिल्यावर मला पहिल्या वर्गातील लेखक इकॉनॉमी क्लासमध्ये दाटीवाटीने, अंग चोरून बसले आहेत आणि दुसऱ्या वर्गातील लेखक मायक्रॉफ्ट होम्सच्या ‘डायोनिजिझ क्लब’च्या मेंबरांप्रमाणे कुणाकडेही लक्ष न देता आपल्यातच मग्न आहेत असं एक चित्र उगीचच डोळ्यासमोर आलं. ही जी वर्गवारी आहे ती फक्त लॅंडमार्कपुरतीच मर्यादित नाही, न्यूयॉर्कर, पॅरिस रिव्ह्यू सारख्या मासिकांपासून पार नोबेल कमिटीपर्यंत या वर्गवारीचे वेगवेगळे पडसाद दिसत असतात. याबद्दल बरंच लिहीलं गेलं आहे. एक म्हणजे पहिल्या वर्गाचं मुख्य ध्येय वाचकांचं मनोरंजन करणं हे आहे तर दुसऱ्या वर्गातील लेखकांना त्यापलिकडे जाऊन काहीतरी शोधायचं असतं. कधीकधी हा शोध इतका टोकाचा असतो की हे लेखक वाचकांचा विचार न करता फक्त स्वांतसुखाय लेखन करतात की काय अशी शंका यावी. दुसरा मुख्य फरक पुस्तकाच्या विषयांमध्ये आहे. मनोरंजन करणारी पुस्तकं नेहेमी गुप्तहेर, सायन्स फिक्शन, रहस्यकथा असे विषय निवडतात तर लिटररी फिक्शन वर्गातील लेखकांचे विषय बहुतकरून रोजच्या आयुष्यातील घटना असतात. या वर्गातील वैविध्य लक्षात घेता असं सामान्यीकरण खरं तर योग्य नाही पण हा मुद्दा उलट्या दिशेने मांडला तर कदाचित अधिक सुसह्य होईल. उच्चभ्रू वर्गातील लेखक रहस्य किंवा गुप्तहेर यांच्या वाट्याला जाताना फारसे दिसत नाहीत. एखादा इशिगुरो प्रयत्न करतो पण तो ही फारसा यशस्वी होत नाही.

    इथे एक रोचक मुद्दा येतो. गुप्तहेरांच्या कथा भले रोमांचक आणि म्हणून मनोरंजक असतील पण ती ही शेवटी माणसंच असतात. त्यांचं आयुष्य, त्यातले निरनिराळे पदर कोण उलगडून दाखवणार? जेम्स हेडली चेस किंवा फ्रेडरिक फोरसिथ यांच्या कथांमध्ये प्लॉट आणि त्यातील रोमांचक वळणे याला इतके महत्व असते की त्यांना याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. आणि हेमिंग्वे वगैरे यांच्या वाटेलाच जात नाहीत. पण ही दोनच टोकं आहेत का? यातला मध्यममार्ग पत्करून गुप्तहेरांचं वास्तविक चित्रण करणारा लेखक नाही का?.

    उत्तर आहे हो. असा किमान एक लेखक आहे, जॉन ल कारे.

    ल कारेची बरीच वैशिष्ट्ये आहेत. याचे गुप्तहेर कधीही बॉंंडप्रमाणे परफेक्ट नसतात. साधारण पन्नाशीच्या पुढचे, बरंच जग पाहिलेले, बहुतेक वेळा विचारपूर्वक आणि संथ कृती करणारे असे असतात. अगाथा ख्रिस्तीचा हर्क्यूल पायरो यांच्या जवळ जातो पण क्लायमॅक्सला पायरोही ‘सेंटर ऑफ अट्रॅक्शन’ बनतोच. याउलट ल कारेचे नायक बहुतेक वेळा शेवटपर्यंत पडद्यामागेच राहणं पसंत करतात. नायकाला जे साध्य करायचं असतं ते साध्य होतं पण इतक्या सहजपणे की तुम्ही वाचक नसता तर तुम्हाला या ठिकाणी काही घडतं आहे याचा पत्ताही लागला नसता. किंबहुना क्लायमॅक्सच्या ठिकाणी जे सामान्य लोक असतात त्यांना शेवटपर्यंत याचा पत्ता नसतो. ‘स्मायलीज पीपल’ मध्ये शीतयुद्ध शिगेला पोचलेलं असताना क्रेमलिनचा एक गुप्तहेर फोडायचा असतो. संपूर्ण कादंबरीत हे नाट्य चालू असतं पण शेवटी मात्र गुप्तहेर शरण येतो तेव्हा सकृतदर्शनी क्लायमॅक्स अत्यंत साध्या रीतीने घडतो. एका पूलाच्या या बाजूला जॉर्ज स्मायली आणि त्याचे अनेक साथीदार आपापली ठिकाणं पकडून बसलेले असतात. रात्रीची वेळ, स्मायली उंचावरून दुर्बिणीतून पुलाकडे बघत असतो. अखेर ठरलेल्या वेळेला एक हॅट घातलेली व्यक्ती पुलावरून इकडे यायला लागते. ती इकडे आल्याबरोबर अंधारातून चार-पाच लोक पुढे येतात, एक कार येते आणि तिच्यातून ते लगेच रवाना होतात. स्मायली दुर्बिणीतून त्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहतो.

    इंग्रजीत ज्याला poignant म्हणता येईल असा हा शेवट ल कारेच्या बऱ्याच कादंबऱ्यांमध्ये दिसतो. अगाथा ख्रिस्तीची कथा संपली की एक दुष्ट आणि बाकीचे सुष्ट अशी विभागणी होते आणि दुष्टाला शिक्षा होते. ल कारेच्या कथांमध्ये अशी विभागणी करणं अवघड किंवा अशक्य असतं. मुळात ल कारेचे स्मायली किंवा इतर नायक रूढार्थाने नायक नसतात. त्यांच्यात चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात, त्यांचा भूतकाळही बरेचदा आक्षेपार्ह असतो. आयुष्यात त्यांनी अनेक तडजोडी केलेल्या असतात, मर्त्य माणसांमध्ये असू शकणारे सर्व दोष त्यांच्यात असतात. कथा संपल्यानंतर नायकाचा हेतू सफला झाला म्हणून आनंद होण्याऐवजी वाचकाला वेगळेच प्रश्न पडतात. या प्रश्नांमधून कधी राजकीय प्रक्रियेची निष्फळता समोर येते तर कधी इस्त्राईल-पॅलेस्टाइनसारख्या गुंतागुंतीच्या प्रश्नांवर आणखी किती आयुष्यं बळी जाणार आहेत या जाणीवेमुळे अस्वस्थ व्हायला होतं.

    ल कारेनं ब्रिटीश सरकारतर्फे काही वर्षे गुप्तहेरखात्यात काम केलं होतं. नंतर त्यानं कादंबऱ्या लिहायला सुरूवात केली. त्याचं खरं नाव डेव्हिड जॉन मूर कॉर्नवेल. पुस्तकांसाठी टोपणनाव शोधत असताना बसमधून त्याला एका शिंप्याच्या दुकानाच्या नावाचा बोर्ड दिसला – ल कारे. तेच नाव त्यानं निवडलं. त्याची ‘द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड’ ही कादंबरी गाजल्यानंतर या क्षेत्रात त्याचं स्थान निश्चित झालं. सुरूवातीला जॉर्ज स्मायलीच्या कथा लिहील्यानंतर त्यानं इतर नायक आणि विषय हाताळले. शीतयुद्ध आणि त्यातील गुप्तहेरकथा याबरोबरच इस्त्राइल-पॅलेस्टाइन संघर्ष (द लिटल ड्रमर गर्ल), औषध कंपन्यांनी आफ्रिकेमध्ये उपचारांच्या नावाखाली माणसांना गिनिपिग म्हणून वापरणं (द कॉन्स्टन्ट गार्डनर) किंवा रशियातील शस्त्रविक्री करणारे माफिया (सिंगल ऍंड सिंगल) असे अनेक विषय त्याने हाताळले आहेत.

    ल कारे स्वत: माजी गुप्तहेर असल्यानं त्याचे या बाबतीतले तपशील अचूक असणारच पण इतर विषयांवर लिहीतानाही त्याचं फिल्डवर्क पक्कं असतं. कादंबरी नसती तर ‘रिपोर्ताज’ म्हणता यावं इतके तपशील दिलेले असतात. यासाठी त्याची काम करायची पद्धत अनोखी आहे. पहिल्यांदा तो जो कथेचा विषय आहे त्याच्याशी संबंधित एखादा चांगला खबऱ्या निवडतो. त्याच्यामार्फत ओळख काढत-काढत मुख्य माणसापर्यंत पोचतो आणि त्याला प्रत्यक्ष भेटून माहिती मिळवतो. हा माणूस म्हणजे एखादा माफिया डॉन, गुप्तहेर किंवा ड्रग डीलर असतो. नाइटक्लबसारख्या ठिकाणी अशा लोकांना भेटून, त्यांना विश्वासात घेऊन स्वत:बद्दल बोलतं करणं हे अशक्यप्राय वाटणारं काम ल कारेला चांगलं जमतं आणि यातूनच त्याची कथा, त्यातील पात्र, प्रसंग उभे राहतात. कदाचित यामुळेच की काय, ल कारेची पात्रं, त्याच्या कथा खऱ्या वाटतात. त्याच्या प्रत्येक कथेच्या प्रस्तावनेमध्ये ज्यांनी बहूमूल्य मदत केली आहे पण ज्यांची नावे देता येणार नाहीत असे लोक हमखास असतात.

    इथपर्यंतही सगळं ठीक आहे. बेस्टसेलर लिहीणारे अनेक लेखक बरीच तयारी करतात. ग्रिशॅमही कथा लिहीताना भरपूर संशोधन करतो, स्वत: वकील असल्याने त्याचं कायद्याचं ज्ञानही सखोल आहे. पण ल कारे या सर्वांच्या पलिकडे जावून काहीतरी देतो. त्याने केलेया निसर्गाच्या वर्णनांमध्ये एक ‘लिरिकल क्वालिटी’ असते जी गुप्तहेरकथांमध्ये अपेक्षित नसते. अशा वेळी चुकून आपण सॉमरसेट मॉम किंवा डिकन्स तर वाचत नाही ना अशी शंका यायला लागते. (डिकन्स ल कारेचा आवडता लेखक आहे.) पण हे क्षणभरच टिकतं, ल कारे यात वहावला जात नाही. कथेचा बाज कुठेही ढिला होऊ न देता ज्याला लिटररी म्हणता येईल अशा प्रदेशात क्षणभर फेरफटका मारून परत येणं ही ल कारेची खासियत म्हणता येईल.

    त्याचे गुप्तहेरही बरेचदा असं करतात. ‘द लिटल ड्रमर गर्ल’ची गुप्तहेर नायिका शत्रूच्या तावडीत असताना स्वत:वर नियंत्रण ठेवण्यासाठी इलियटच्या कविता किंवा ‘ऍज यू लाइक इट’ चे संवाद म्हणते तर पाळत ठेवण्याच्या कामावर असताना धुक्यात वेढलेली घरं, त्यात दिसेनासा होणारा रस्ता पाहून जॉर्ज स्मायलीला हर्मन हेस्सच्या ओळी आठवतात,

    Strange to wander in the fog….

    no tree knows another.

    —-

    १. या वर्गातील लोकांच्या चेहेऱ्यावरचे भाव बघायचे असतील तर टॉम ऍंड जेरीच्या कार्टून मालिकेतील एक भाग पहावा. यात टॉम पाश्चात्य शास्त्रीय संगीतकार आहे. कॉन्सर्टमध्ये वाजवताना त्याच्या चेहेऱ्यावरून आणि देहबोलीतून स्नॉबिशनेस नुसता उतू जातो आहे, अर्थात जेरी येईपर्यंतच!

    २. हा मुद्दा थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातूनही मांडता येईल. सगळ्या गुप्तहेरकथांमध्ये सीआयए, केजीबी, एमआय ५-६ – अगदी इस्त्राईलची मोस्सादही असते. भारताचं काय? दोन-तीन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेलं अमर भूषण यांच ‘एस्केप टू नोव्हेअर‘ हे पुस्तक या दृष्टीने महत्वाचं ठरावं. २००५ मध्ये भारताच्या रीसर्च ऍंड ऍनालिसिस विंग – रॉचे जॉइंट सेक्रेटरी – मेजर राबिंदर सिंग सीआयएचे हस्तक असल्याचे उघडकीला आलं. हे स्पष्ट होईपर्यंत सिंग बायकोबरोबर काठमाडूमार्गे अमेरिकेला रवाना झाले होते. या सर्व ऑपरेशनचं नेतृत्व अमर भूषण यांच्याकडे होतं. ‘एस्केप टू नोव्हेअर’ जरी कादंबरी असली तरी ती या सत्यघटनेवर आधारित आहे त्यामुळे यातून किमान रॉचं काम कसं चालतं यावर थोडा प्रकाश पडावा. (ही अजून वाचलेली नाही.)

  • हॉलिवूडची गोजिरवाणी मुलं

    एके काळी मराठी चित्रपटांमध्ये माहेर, सासर, तुळशीवृंदावन, बांगड्या अश्या ‘कीवर्ड्स’ची चाहूल जरी लागली तरी बाया-बापड्या डोळ्याला पदर लावायला तयार व्हायच्या. विशिष्ट प्रकारच्या आड्यन्सला विशिष्ट गोष्टी दाखवल्या की त्यांच्या भावनांचा ड्याम (म्हणजे धरण, डॅम इट! चापट​!) वाहायला लागतो.

    एके काळी मराठी चित्रपटांमध्ये माहेर, सासर, तुळशीवृंदावन, बांगड्या अश्या ‘कीवर्ड्स’ची चाहूल जरी लागली तरी बाया-बापड्या डोळ्याला पदर लावायला तयार व्हायच्या. विशिष्ट प्रकारच्या आड्यन्सला विशिष्ट गोष्टी दाखवल्या की त्यांच्या भावनांचा ड्याम (म्हणजे धरण, डॅम इट! चापट​!) वाहायला लागतो. चित्रपट लोकप्रिय होण्यासाठी हे तंत्र अनेक जणांनी वापरलं आहे. काही लोक खुबीने वापरतात, काही ‘बुल इन चायनाशॉप’च्या धर्तीवर. हिंदी चित्रपटातही हे होतं पण तिथली ‘गिमिक्स’ इतकी प्रसिद्ध आहेत की त्याबद्दल परत लिहायची गरज नाही. आणि पॉश दिसत असले तरी हॉलिवूडचे चित्रपटही हेच करतात – फक्त त्यांचे भावनिक ‘वीक पॉइंट’ थोडे वेगळे आहेत आणि याबद्दल कुठे लिहून आल्याचं फारसं दिसत नाही.

    ‘इंडिपेडन्स डे’. जगबुडी आलेली आहे आणि वाचवण्यासाठी जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे दोन निधड्या छातीचे वीर. आणि ते लढाईला जात असताना निरोप देण्यासाठी दोन गोजिरवाणी पोरं. ही पोरं बहुतेक वेळा सोनेरी केस, निळे डोळे या वर्गात बसतात. (इथे विल स्मिथ आहे त्यामुळे थोडा बदल. शिवाय सर्वात शक्तिशाली देशात आता वर्णद्वेषही राहिलेला नाही हा यामागचा संदेश. बघा! दिग्दर्शक इथे दिसतो. ) अशा वेळी तो बाप मरायला चाललेला असताना ही कारटी हमखास विचारणार, “तुम्ही परत कधी येणार? ” मग लेखक-दिग्दर्शकांच्या वकुबाप्रमाणे बाप एक छोटेखानी भाषण किंवा संदेश देतो. बरेचदा ही मुलं जे काही संकट आलं आहे त्यात सापडतात. ह्याची उदाहरणं द्यायची म्हटली तर पानं भरतील पण उदाहरणं संपणार नाहीत. एका ‘स्टार-ट्रेक’ चित्रपटात संपूर्ण वेळ एकही मूल दिसलं नाही. तसंही यानावर मुलं कुठून असणार? पण एका प्रसंगात क्लिंगॉनचा हल्ला होतो आणि लगेच बाया-बापड्या आणि लहान मुलं सुरक्षित ठिकाणी जाताना दिसतात. ‘अपोलो-१३’ हा सर्व बाबतीत उल्लेखनीय चित्रपट पण तिथेही यान संकटात सापडलेलं असताना कमांडर जिम लॉवेलच्या तीन लहान मुलांवर नको इतका फोकस करण्याचा मोह रॉन हॉवर्डला आवरता आला नाही. ‘इंटरस्टेलर’मध्ये स्पेशल इफेक्ट्सवर इतकी मेहनत घेतली पण स्क्रिप्टचं काय? इथेही जग वाचवण्यासाठी नायक जाताना त्याच्या मुलीबरोबर परत तोच प्रसंग. मनमोहन देसाईंनी ज्याप्रमाणे ‘लॉस्ट अँड फाउंड’ फॉर्म्युला शेवटपर्यंत सोडला नाही, तसंच हॉलिवूडही गोजिरवाण्या अमेरिकन मुलांचा बाप जग वाचवतो हा फॉर्म्युला सोडायला तयार नाही.

    ‘ज्यूरासिक पार्क’ थोडासा वेगळा आहे. स्पिलबर्गने लहान मुलांवर अनेक चित्रपट केले. ‘इ. टी. ‘ संपूर्णपणे मुलांचाच होता पण त्यात कथा मुलांच्या दृष्टिकोनातून मांडली होती. चित्रपटात बराच वेळ कॅमेरा मुलांच्या नजरेतून बघतो. ‘ज्यूरासिक पार्क’मध्येही मुलं संकटात सापडतात पण या मुलांच्या व्यक्तिरेखा अधिक गहिर्‍या होत्या. त्यांची व्यक्तिमत्त्वं परस्परविरोधी आणि म्हणूनच एकमेकांना पूरक होती. शिवाय​ डॉ. ग्रँटला मुलांची आवड नसणं आणि त्यातून निर्माण होणारे प्रसंग रोचक होते.

    या सर्वांच्या मुळाशी ‘अमेरिकन ड्रीम’ आहे. मॉरगेजखाली घेतलेलं स्वतःचं घर, चौकोनी कुटुंब, कुत्री-मांजरं वगैरे. थोडक्यात ‘अ वाइफ अ‍ॅड अ फॅमिली अँड अ डॉग अँड अ कॅट’ (चित्रपट कोणता ते ओळखा! ). मात्र यात ‘अल्टर्नेटीव्ह फ्यामिली’ येत नाही. बॅड पब्लिसिटी. या ड्रीमवर कोणतंही संकट आलं की अमेरिकन प्रेक्षकाच्या भावनेला हात घालता येतो आणि हॉलिवूडचे पटकथा लेखक याचा पुरेपूर फायदा घेतात.

    अर्थातच अपवाद आहेत आणि सन्माननीय आहेत. ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’मधली स्काउट फिंच. लहान मुलीची इतकी सशक्त आणि गहिरी व्यक्तिरेखा क्वचितच बघायला मिळते. याचं श्रेय अर्थातच मूळ कादंबरीची लेखिका हार्पर ली हिला जातं. वर्णद्वेषाचा संघर्ष एका लहान मुलीच्या नजरेतून दाखविणे या कल्पनेवर बेतलेला हा चित्रपट मैलाचा दगड ठरावा. त्याचप्रमाणे मार्जरी किनॅन रोलिंग्जच्या ‘द इयरलिंग’ (मराठी अनुवाद राम पटवर्धन यांचं ‘पाडस’) वर आधारित चित्रपटही उल्लेखनीय आहे. इथेही श्रेय लेखिकेला जातं.

    या सर्वाहून वेगळी लहान मुलगी क्वेंतिन टॅरँटिनोच्या ‘किल बिल २’ मध्ये बघायला मिळते. टॅरँटिनोचा चित्रपट असल्याने याला अनेक पदर आहेत आणि याचे एकाहून अधिक अर्थ लावता येतात. टॅरँटिनोने हॉलिवूड आणि जपानी सिनेमांमध्ये नेहमी दिसणारी प्रतीकं वापरलेली आहेत मात्र बरेचदा यांचा वापर नेहमी होतो त्याच्या अगदी उलट केलेला आहे. ‘किल बिल २’मध्ये ‘वेस्टर्न स्फॅगेटी’ चित्रपटांचं संगीत आहे पण इथे मूळ व्यक्तिरेखा स्त्रीपात्र आहे. वेस्टर्न चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांना नगण्य भूमिका असतात, टॅरॅटीनोने इथे त्याचा व्यत्यास केला आहे. (चित्रपट सुरू होतो तेव्हाचं संगीत बेथोवनच्या सुप्रसिद्ध पाचव्या सिंफनीवर बेतलेलं आहे, पण त्यातली गंमत काय ते अजून कळलेलं नाही. )

    ‘किल बिल २’ मधली लहान मुलीची व्यक्तिरेखा वरवर पाहिलं तर हॉलिवूड चित्रपटाला साजेशीच आहे. आई आणि बाप एकमेकांच्या जिवावर उठलेले असताना मध्ये सापडलेली एक गोंडस मुलगी. पण थोडं लक्षपूर्वक पाहिलं तर या व्यक्तिरेखेचं वेगळेपण लक्षात येतं. ही मुलगी तिच्या वयाला साजेसं न वागता प्रौढांसारखी वागते. जन्मल्यापासून आईला एकदाही बघितलेलं नसतं, तरीही इतक्या वर्षांनी आई दिसल्यावर तिची प्रतिक्रिया अत्यंत सौम्य असते. नंतर बाप मेल्यावर आईबरोबर राहत असताना तिला बाबांची आठवणही येत नाही. तिच्या अ‍ॅक्वेरियममध्ये असलेल्या माश्याला ती मारून टाकते. ही व्यक्तिरेखा विलियम गोल्डींगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाइज’मधल्या मुलांच्या जवळ जाणारी वाटते. आपल्याकडे ‘प्रेमस्वरूप आई’ ही जशी ठोकळेबाज प्रतिमा आहे त्याचप्रमाणे हॉलिवूड चित्रपटात नेहमी दाखवली जाणारी निष्पाप, गोजिरवाणी मुलं तितकीच साचेबद्ध आहेत. या प्रतिमेला छेद देणारं पात्र टॅरॅंटीनोने निर्माण केलं आहे.

    या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि नेहमीच ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ नसलेले अ‍ॅक्शनपट अधिक भावतात. जेम्स बाँडच्या चित्रपटांचा हा एक मोठा ‘प्लस पॉइंट’ म्हणता यावा. कियानु रीव्हजचा ‘स्पीड’, हॅरिसन फोर्डचा ‘द फ्युजिटीव्ह’ अशी काही उदाहरणे आहेत. तसंच क्युब्रिक, कपोला, ऑलिव्हर स्टोनसारख्या दिग्दर्शकांनी असे फॉर्म्युले वापरणं कटाक्षाने टाळलं आहे.