Author: Raj

  • पालुस जुनियर, अमिग्डला आणि उत्क्रांती

    समाजमनाची विविध आंदोलने तात्कालिक आवर्तनांमधून जात असताना त्यांना निरखून पाहिले असता त्यांचे प्रकटन तेव्हा बोलल्या जाणार्‍या भाषेमधूनही होते असे जाणकारांच्या अनुभवास आले आहे. जाणकार म्हणजे अर्थातच आम्ही, ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. थोडक्यात सांगायचे तर, कमिंग स्ट्रेट टु द बिंदू (रेखा,हेलन) विदाउट बिटींग (रंजीत,डॅनी) अराउंड द झुडूप आय टेल यू, दुबईस्थित व्यावसायिक पक्या डेंजर यांनी म्हटल्याप्रमाणे जो…

    समाजमनाची विविध आंदोलने तात्कालिक आवर्तनांमधून जात असताना त्यांना निरखून पाहिले असता त्यांचे प्रकटन तेव्हा बोलल्या जाणार्‍या भाषेमधूनही होते असे जाणकारांच्या अनुभवास आले आहे. जाणकार म्हणजे अर्थातच आम्ही, ह्यॅ ह्यॅ ह्यॅ. थोडक्यात सांगायचे तर, कमिंग स्ट्रेट टु द बिंदू (रेखा,हेलन) विदाउट बिटींग (रंजीत,डॅनी) अराउंड द झुडूप आय टेल यू, दुबईस्थित व्यावसायिक पक्या डेंजर यांनी म्हटल्याप्रमाणे जो [१] पब्लिक के दिल मे र्‍हैता हय, वोईच उसकी जुबान पे आता हय. हा साक्षात्कार आम्हाला होण्याचे कारण म्हणजे सध्या आंतरजालावर बर्‍याच ठिकाणी दिसणारा Awwwwww! हा उद्गार-कम-आश्चर्य-कम-इमोसनल-अत्याचार वाचक शब्द. बहुतेक वेळा मांजरांच्या चित्राखाली हा आढळतो आणि याच्या उद्गारकर्त्या म्हैला अंदाजे सव्वा महिना ते ९७ वर्षे या वयोगटातील असतात. हा शब्द जितका लांब तितकी उद्गारकर्तीणीची भावणा अधिक तीव्र असा अंगठ्याचा नियम [२] लावता येतो. या शब्दाची इतर रूपेही आहेत. शो श्वीट किंवा शो क्यूट हे त्याचेच प्रकार.

    क्यूट नक्की कशाला म्हणायचे? सवयीनुसार क्यूटची व्याख्या बदलू शकते का? माझ्या बेडरूमच्या खिडक्यांना जाळ्या आहेत. एक दिवस संध्याकाळी जाळीच्या बाहेरच्या बाजूला एक पालोबा दिसले. पालोबाईही असतील कदाचित. जाळीवरून हळूहळू फिरणारे त्यांचे पाय पाहून मला जुरासिक पार्कमधील टी-रेक्स आठवला. (लाइफ, फाइंड्स अ वे.) हळूहळू त्यांची सवय झाली, त्यांचे डेली रूटीनही लक्षात आले. दिवसभर बाहेर उन असल्याने जाळीत ताणून द्यायची आणि रात्री शब्दश: माशा मारायला निघायचे, हाय काय अन नाय काय. बिलं भरणे, डेंटिस्टकडे जाणे असली फालतू कामे करायला ते काय उत्क्रांत झाले होते का? मग एके दिवशी दुसर्‍या खिडकीच्या जाळीत एक पालपिल्लू दिसले. त्याची फिरण्याची इष्टाइल पाहून त्याचे नाव ठेवले – पालुस. मग शिणियर पालोबा आठवले, त्यांच्यावर अन्याय का? मग दोघांची नावे ठेवली – पालुस जुनियर आणि पालुस सिनियर. (नाहीतरी हल्ली पितापुत्रांना सिनियर-जुनियर म्हणायची फ्याशन आहेच्चे.) पालुस जुनियर मांजराच्या पिल्लाइतका क्यूट नसला तरी पिल्लू क्याटेगरीत असल्याने चालून जातो. पालुस सिनियर अचानक दिसले तर दोन क्षण पोटुसमध्ये खड्डुस पडतो, पण ती अमिग्डलाची करामत.

    आमचे पूर्वज याच अमिग्डलाच्या भरवशावर शिकारी करायला निघायचे. अमिग्डला म्हणजे ‘क्रांतीवीर’ सिनेमात ज्याला नाना पाटेकर ‘छोटा दिमाग’ म्हणतो ती. एखाद्या झुडुपातून खसफस ऐकू आली की थांबून लढायचे की धूम [३] ठोकायची याचा निर्णय क्षणार्धात करावा लागायचा. अर्थात कधीकधी निर्णय चुकायचा. म्हणजे वाघ समजून धूम ठोकावी आणि कोल्ह्याचे पिल्लू निघावे असाही प्रकार व्हायचा. मग रात्री गुहेत शेकोटीच्या आसपास गप्पांचा फड रंगल्यावर त्या कोल्ह्याच्या पिलाचे रूपांतर सिंहात व्हायचे आणि कथेला रंग चढायचा. आज कोल्ह्याच्या जागी क्लायंट असतो आणि आपण त्याला कसे गंडवून कॉन्ट्रॅक्ट दुपटीच्या दरात मिळवले याची सुरस कथा ग्लासातील बर्फाच्या किणकिणणार्‍या पार्श्वसंगीतावर सांगितली जाते. इतपत उत्क्रांती [४] व्हायला गेलाबाजार ३०,००० वर्षे लागली, आहात कुठे? [५] उत्क्रांती या शब्दाची शोकांतिका ही की यात क्रांती हा शब्द दडलेला आहे. क्रांती म्हटले की मनोजकुमारने भारतीय सिनेरसिकांवर केलेला अत्याचार आठवतो. त च्या जागी ट करून हिंदी बोलणारे टॉम अल्टर, बॉब क्रिस्टो आठवतात. आपण उत्क्रांत झालो आहोत यावरचा विश्वास डळमळीत व्हायला लागतो.

    तळटीपा :

    [१] अमरू उपराष्ट्राध्यक्ष नव्हेत. पीजे : जो बायडेन पाळण्यात असताना त्यांची आई कोणते गाणे म्हणायची? उत्तर : बाळा जो जो रे.

    [२] अंगठ्याचा नियम अर्थात रूल ऑफ थंब. जेव्हा आपल्याकडे लोक अंगठा वापरत होते किंवा कापून घेत होते तेव्हा हा अंगठ्याचा नियम वापरून पाश्चात्य संशोधकांनी अनेक शोध लावले, प्रगती केली आणि आपल्याला अंगठा दाखवला. त्यांची प्रगती झाली म्हणून आपली पॅसेंजर झाली. तेव्हा ते तसे झाले म्हणून तर आत्ता हे असे झाले. असो.

    [३] चित्रपट नव्हे. ‘नवरंग’मध्ये संध्याला पाहून जी ठोकावीशी वाटते ती धूम.

    [४] उत्क्रांतीवरून आठवलं. शाळेत आम्हाला उत्क्रांतीचा धडा सरमळकर बाईंनी शिकवला. मी, सावड्या, लेल्या आणि शिर्क्या मागच्या बेंचांवर भंकस करत बसायचो. लेल्याची आई रोज डब्यात थालपीटं, कोथिंबीरीच्या वड्या द्यायची. लेल्याच्या वाट्याला एखादा तुकडा यायचा, बाकी आम्हीच संपवायचो. प्रिलिमच्या आधी लेल्यानं बातमी आणली, “उत्क्रांतीचा प्रश्न पंधरा मार्काला येणार आहे, गॅरंटेड.” तसा सावड्या मला विचारतो, “इचिभना, उत्क्रांती म्हणजे काय रे सुर्व्या?” मी म्हणालो, “मला तरी कुठे माहितेय? डेक्कनक्वीनने कधी शिकवलं कुणाला माहीत?” असो. गेले ते दिवस.

    [५] आहात कुठे ही नक्की काय भानगड आहे? या प्रश्नाला काही अर्थ आहे का? काही लोकांचा हा आवडता प्रश्न आहे. अंबानीने ढमके अब्ज देऊन घर [अ] बांधले, आहात कुठे?

    तळतळटीपा :

    [अ] अंबानीने जे बांधले त्याला घर म्हणणे म्हणजे मार्लन ब्रॅंडोला ‘आग ही आग’ मध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका देण्यासारखे आहे. पण आमच्या मध्यमवर्गीय शब्दकोषात याला साजेसा शब्दच नाही त्याला आम्ही काय करणार? फार तर बंगला. आमच्या पालुसची धाव घर, १-२ बीएचके यापलिकडे जात नाही. थिट्या मध्यमवर्गीय जाणिवांच्या घुसमटीचे प्रकटन करण्यासाठी आविष्काराची निकड भासणे, त्या निकडीचे रूपांतर रक्ताळलेल्या बोथट जखमांच्या खपल्यांमध्ये होणे, त्या खपल्यांवर चढलेला खुंटलेल्या संवेदनांचा पिवळसर-जांभळा रंग, कधी त्रिज्येमधून तर कधी परिघाबाहेरून भाग न जाणारे अपरिमेय गणित, भागाकारात हच्चा घेतला तरी पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढींच्या उसवलेल्या झग्यातून कुरकूरणारी बोथट मनांची आक्रंदने, चेंगीझ खानपासून राखी सावंतपर्यंत हेलपटलेल्या झगझगीत रूपेरी वाफांच्या मनस्वी झिलया, नेणीवेच्या शुभ्र कॅनव्हासवर रंगांचे अजीर्ण होऊन सकाळी सकाळी ज्याक ड्यानियल्सची आंबट-करपट ओकारी व्हावी तत्सम रेखाटलेला आदिम जाणिवांचा कलाविष्कार, हीच आजच्या भगभगीत, ओशट, तडकलेल्या बूर्झ्वा भावनिक आंदोलनांची शोकांतिका आहे.

  • केम छो? मजा मां

    मला शब्द निरखायचा छंद आहे १. एखादा शब्द अचानक समोर येतो, त्याला वेगवेगळ्या बाजूंनी बघितलं की त्याचे अनेक पदर उलगडत जातात. इतर भाषांबाबत हे सहजपणे होतं कारण नवीन भाषा शिकताना बरेच शब्द परिचित नसतात. पण मराठीच्या बाबतीत काही कळायच्या आतच शब्दांशी मैत्री झाली होती त्यामुळे मराठी शब्दांचं वेगळेपण कळायला त्या शब्दांकडे थोडं लांब उभा राहून,…

    मला शब्द निरखायचा छंद आहे . एखादा शब्द अचानक समोर येतो, त्याला वेगवेगळ्या बाजूंनी बघितलं की त्याचे अनेक पदर उलगडत जातात. इतर भाषांबाबत हे सहजपणे होतं कारण नवीन भाषा शिकताना बरेच शब्द परिचित नसतात. पण मराठीच्या बाबतीत काही कळायच्या आतच शब्दांशी मैत्री झाली होती त्यामुळे मराठी शब्दांचं वेगळेपण कळायला त्या शब्दांकडे थोडं लांब उभा राहून, अलिप्तपणे बघावं लागतं.

    असाच एक शब्द आहे मजा. एक ‘म’ आणि एक ‘जा’. या दोन अक्षरांमध्ये कितीतरी अर्थ भरले आहेत. जवळून पाहिलं तर विचित्र वाटतो, पण हे तर काहीच नाही. जेव्हा आपण मजा वापरतो तेव्हा खरी मजा येते. पहिली गोष्ट म्हणजे मजा नेहेमी येते किंवा जाते. ती जेव्हा येत असते तेव्हा ती येतच राहते, मग काहीतरी होतं आणि सगळी मजा जाते. ही कुठून येते आणि कुठे जाते तिलाच ठाउक. मग दुसर्‍या दिवशी लोक विचारतात ‘मजा आली का?’ जेव्हा लोकांना तिच्या येण्याची अपेक्षा किंवा खात्री असते तेव्हा ते इतरांना म्हणतात, “चल ना, मजा येईल.” कधीकधी मजा लुटताही येते.

    पण ही नुसती प्रवासातच असते असं नाही. जेव्हा ती येते तेव्हा लोक मजा करतात. ”लॉंग विकेंडेना, मजा करा लेको.” आणि जे लोक नेहेमी अशी मजा करतात ते मजेत असतात, पण मजेदार किंवा मजेशीर मात्र असू किंवा नसू शकतात. लोकांना ही विशेषणं लागली की थोडी वेगळीच मजा होते. यांचा अर्थ किंचित स्क्रू ढिला किंवा विचित्र स्वभाव असाही होऊ शकतो, “आमचा बॉस ना, मजेशीर प्राणीये एकदम.” म्हणजे बॉस विनोदीही असू शकतो किंवा ज्याचा मोबाईल नेहेमी मिटिंगमध्ये वाजतो असाही असू शकतो. आणि कुणीच मजा न करताही ती आली तर ती होते. लहान मुलांच्या आयुष्यात ही नेहेमी होते पण तेव्हा तिला आणखी एक ज लागतो, “आज किनई शाळेत मज्जाच झाली.” काही लोक मजेचं स्त्रीलिंगी रूप स्वीकारत नाहीत. त्यांना ‘मझा’ येतो. हा मझा म्हणजे आपल्या मजेचा गंभीर काका वगैरे वाटतो. मजा म्हणजे मिलीमधली जया असेल तर मझा म्हणजे गोलमालमधला उत्पल दत्त. बराच शिस्तशीर आहे. मजा गल्लीबोळात कुठेही हुंदडते, हा मझा येतो पण जाताना फारसा दिसत नाही आणि करता येतो की नाही याबद्दल शंका आहे. फक्त बिचारा नेमाने येत राहतो. मझा वापरण्यात तेवढी मजा येत नाही.

    मजा फक्त मराठीत आहे असं नाही. मात्र हिंदीत गेल्यानंतर जांबुवंताचा ‘ज’ जाऊन जहाजाचा ‘ज’ येतो . हिंदीतही मजे लेना, मजे करना, मजे होना, मजे लूटना अशी रूपे आहेत. “जाडों में गर्म चाय की चुस्कीयों के मजे लूटो.” हिंदीत मजेदार बर्‍याच अर्थी वापरला जातो – रोचक, वैविध्यपूर्ण, विनोदी – मजेदार चुटकुले, मजेदार किस्से. मात्र ‘पकोडे बहोत मजेदार बने है’ इथे मजेदारचा अर्थ स्वादिष्ट. जी गोष्ट मजेदार असते तीच मजेकी बातही असते. “मजे की बात यह है की..” अशी वाक्याची सुरूवात बरेचदा दिसते. मजा गुजराथीतही आहे पण तिकडे फारसा वशिला नसल्याने “केम छो? मजा मां” च्या पुढे गाडी जात नाही.

    शब्द कसे तयार होतात आणि रूळतात हे बरेचदा कोडंच असतं. “टू ऍंड अ हाफ मेन” मालिकेत सात-आठ वर्षांच्या जेकला शाळेत शिक्षिकेला मधलं बोट दाखवल्याबद्दल शिक्षा होते. तो बापाला बाकीची बोटं दाखवतो आणि विचारतो, “फिल एनीथिंग?” बाप नकारार्थी मान हलवतो. जेक मधल्या बोटाकडे बघतो आणि म्हणतो, “आय डोंट गेट इट. हू डिसाइड्स?” मजासारखे शब्द भेटले की मला नेहेमी असाच प्रश्न पडतो. मजा येते आणि जाते, चालत, पळत किंवा धावत का नाही? हू डिसाइड्स? भाषाशास्त्रामध्ये याची उत्तरं मिळणं अपेक्षित असतं आणि मिळत असतीलही. पण भाषाशास्त्रातले निबंध इतके क्लिष्ट असतात की आमच्यासारख्या पामरांना त्याचा काहीच उपयोग नाही.

    स्वत:च्या ब्लॉगवर काही खरडलं तरी चालतं. अपनी गली में टॉमी भी शेर होता है. हे शाळेत लिहीलं असतं तर शिक्षकांनी कान पकडून विचारलं असतं, “निबंध लिहायला सांगितला होता ना? हे काय लिहीलय? अभ्यास म्हणजे काय मजा वाटते का तुला?”

    ———————

    १. चांगला संवादलेखक असेल तर चित्रपट बघताना हे आपोआप होतं. हृषिदांच्या चुपके-चुपके मध्ये गुलजारने ‘परिमल तो तुम्हारा बहोत दोस्त है’ अशी वाक्यरचना वापरली आहे. ‘परिमल और तुम्हारी बहोत दोस्ती है’ असं पुस्तकी वाक्य न टाकता ‘बहोत दोस्त है’ असं म्हटल्यावर त्याला एक वेगळाच टच येतो. या चित्रपटातले बरेच संवाद मस्त आहेत. उदा. “मुझे बॉटनी का बी तक नही आता. कहीं किसी ने पूछ लिया के तितली फूल पर क्यों बैठती है तो क्या जवाब दूंगा?”

    २. याचं एक वेगळं रूप म्हणजे कट्ट्यावरचे लोक ऐश करतात. ऐश करता येते किंवा होते.

    ३. पहिल्यांदा दिल्लीला गेलो तेव्हा एक मुख्य आकर्षण हे होतं की मनसोक्त हिंदी ऐकायला आणि बोलायला मिळेल आणि तसं झालंही. भाषा मनसोक्त ऐकण्यात एक वेगळंच सुख असतं.

  • पुन्हा कधीतरी…

    अखेर आज बातमी आली. साठ्या क्लबचा प्रेसिडेंट झाला. ह्या क्लबसाठी रक्ताचं पाणी केलं पण कुणाला त्याची पर्वा नाही. आणि केलेलं बोलून दाखवायचा माझा स्वभाव नाही. विचार करता करता मन भूतकाळात गेलं… स्वातंत्र्य मिळाल्यावर मला नेहमी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागायच्या. एकदा तीनमूर्तीमध्ये गेलो असताना दार बंद, जवाहर कुणालाच आत येऊ देत नव्हता. पटेल, कृपलानी सगळे बाहेर…

    अखेर आज बातमी आली. साठ्या क्लबचा प्रेसिडेंट झाला. ह्या क्लबसाठी रक्ताचं पाणी केलं पण कुणाला त्याची पर्वा नाही. आणि केलेलं बोलून दाखवायचा माझा स्वभाव नाही. विचार करता करता मन भूतकाळात गेलं…

    स्वातंत्र्य मिळाल्यावर मला नेहमी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागायच्या. एकदा तीनमूर्तीमध्ये गेलो असताना दार बंद, जवाहर कुणालाच आत येऊ देत नव्हता. पटेल, कृपलानी सगळे बाहेर ताटकळत उभे. मी आत गेलो तर जवाहर एकटाच पेशन्स खेळत बसलेला. मी म्हटलं, अरे देश चालवायचा सोडून हे काय? तर म्हटला, मला नाही इंटरेस्ट. त्याला काही अडचण आली की लगेच डिप्रेस व्हायचा. म्हटलं, असं करू नकोस. काय प्रॉब्लेम आहे? म्हणाला या सिव्हिल सर्व्हिसचं काय करायचं कळत नाहीये. मी त्याला समजावलं, काही झालं तरी आपली माणसं आहेत ती. त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. जवाहरला ते पटलं. त्याची मरगळ दूर झाली. त्यानं तिथल्या तिथे मला गृहमंत्रिपद देऊ केलं. “मला पदाचं आकर्षण नाही,” मी ताडकन उत्तर दिलं.

    च्या मारी, साठ्यानं कुणाचा जॅक लावला कळत नाही.

    असाच एकदा एका पार्टीत जेआरडी भेटला. त्याला विचारलं, सध्या काय चालू आहे? तर म्हटला की मालपुव्याची फ्याक्टरी टाकतो आहे. मी भुवया उंचावल्या तर म्हणाला की मला रोज रात्री मालपुवा खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. मी म्हटलं, जेआरडी असं करू नकोस. तुला हवं तर मालपुव्यासाठी दहा कुक ठेव. आज स्वतंत्र भारताला गरज आहे ती स्वदेशी विमानसेवेची. “व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया!” जे आरडी चित्कारला आणि एअरइंडियाचा जन्म झाला. पहिल्या उड्डाणाला आम्ही दोघेही जातीने हजर होतो. “डिक्रा, आज टू नस्टास टर हे झाला नस्टा.” मोडक्यातोडक्या मराठीत माझे आभार मानताना जेआरडीचा कंठ भरून आल्याचं जाणवलं.

    ६०-६२ च्या काळात जॉनचे सारखे ट्रंककॉल यायचे. मग माझा बराचसा वेळ डीसीतच जायचा. ६२ च्या ‘बे ऑफ पिग्ज’ प्रकरणात आठवडाभर जॉननं मला जागचं हालू दिलं नाही. माझा मुक्काम ओव्हल ऑफिसच्या बाजूच्या खोलीतच होता. अखेर महायुद्ध टळलं तेव्हा कुठे मला परत यायला मिळालं. मी जाण्याआधी जॅकी म्हटली, “मी स्वत: केलेले प्यानकेक खाल्ल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. असा वेंधळ्यासारखा नुसता बघत उभा राहू नकोस, मेपल सिरप वाढ लवकर.” (हे नंतरचं वाक्य जॉनला उद्देशून). मला एअरपोर्टवर सोडायला जॉन आणि रॉबर्ट दोघेही आले होते. एअरपोर्टवर फ्लाइटची वाट बघत असताना बारमध्ये ड्रिंक घ्यायला गेलो तर कुणीतरी जॉन आणि रॉबर्ट दोघांचीही पाकिटं मारली. त्यांचे रडवेले, हिरमुसलेले चेहरे बघवेनात, मग मीच ड्रिंकचे पैसे दिले, आणि घरी जाईपर्यंत असू द्यावेत म्हणून २०-२० डॉलर त्यांच्या खिशात कोंबले.

    एकदा डीसीवरून येताना मध्ये लंडनला हॉल्ट होता. डाउनिंग स्ट्रिटवर डोकावलो तर मॅगी ‘दोन उलटे, एक सुलटा’ करत बसली होती. म्हटलं, हे निवृत्तीनंतरचे उद्योग आताच कशाला? तर म्हटली, या फॉकलंड प्रश्नाचं काय करायचं कळत नाहीये. मग मी तिला आपल्याकडच्या दोन-चार शौर्याच्या गोष्टी सांगितल्या, झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई वगैरे. ते ऐकून ती सावरल्यासाखी वाटली. दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर बाईंनी डायरेक्ट अर्जेंटीनावर हल्लाच केलेला. नंतर बकिंगहॅमलाही जाऊन आलो. एलिझाबेथला नाचणीच्या धिरड्याची रेसिपी हवी होती. तिथेच फिलीपही होता. त्याच्या क्यारेजमध्ये राजवाड्याला एक चक्कर मारून आलो.

    मुंबईला गेलो की मनोहर गावसकरांकडे माझं नेहमी येणंजाणं असायचं. असाच एकदा गेलो असताना खाली सुनील एकटाच खेळत होता. त्याला एक ओव्हर टाकली. कसाही बॉल टाकला तरी त्याच्या बॅटने सरळ रेषा सोडली नाही हे माझ्या चाणाक्ष नजरेनं टिपलं. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन वर गेलो तर सामानाची बांधाबांध चाललेली. हे काय म्हणून विचारलं तर मनोहर म्हटला की नवीन जागा मिळते आहे. तिथे सुनीलला खेळायला प्रशस्त ग्राउंडही आहे. मी लगेच त्याला थांबवलं, म्हटलं, “मनोहर, ही चूक करू नकोस. त्या पोराचा स्ट्रेट ड्राइव्ह इथे दोन्ही बाजूच्या बिल्डिंगांमुळे आपसूक तयार होतो आहे. त्यात खोडा घालू नकोस.” मनोहरला ते पटलं. त्यानं बेत क्यान्सल केला. यथावकाश सुनीलचा स्ट्रेट ड्राइव्ह जगप्रसिद्ध झाला. आजही सुनील भेटला की मिस्कीलपणे हसून स्ट्रेट ड्राइव्हची ऍक्शन करून दाखवतो. असाच सचिनच्या पुल शॉटचाही किस्सा आहे, त्याविषयी पुन्हा कधीतरी.

    आता तर काय, जेटसेटिंगचं युग. कालच मॉस्कोची आठवड्याची ट्रीप उरकून परत आलो. पुतिन म्हणत होता, सगळ्या पत्रकारांना जेलमध्ये टाकतो. त्याला म्हटलं, “वालोजा, वालोजा, असं करू नकोस. पत्रकारांची अशी सरळसरळ मुस्कटदाबी केलीस तर तुझ्यात आणि बराकमध्ये फरक काय राहिला?” “तसाही फरक कुठे आहे?” पुतिनचा बिनतोड वकिली मुद्दा. परत येऊन बूड टेकतोय तर लगेच ओबामा स्काइपवर. पुतिन काय म्हणत होता? म्हटलं, तू रेकॉर्ड केलंच असशील की सगळं. मध्येच मिशेल डोकावून गेली. स्वस्तात प्लंबर कुठे मिळेल म्हणून विचारत होती. मग बराक तिच्यावर उखडला, “माझं इथे महत्त्वाचं बोलणं चालू असताना तुझं काय मध्येच?” “साधा प्लंबर आणता येत नाही आणि देश चालवायला निघालेत.” अनपेक्षितपणे घरचा आहेर मिळाल्यावर बराक कळवळला. त्यांना वाटेला लावलं तर सारकोझीचा फोन – परत चान्स मिळेल का म्हणून विचारत होता. म्हटलं, मस्य, इतकं सोपं असतं का ते? तर म्हटला सोपं नाहीये म्हणून तर तुला फोन केला. म्हटलं अरे बाबा, मला बर्रर्र लावून काही उपयोग नाही, झ स्वी देझोले.

    हे सगळं चालू असताना क्लबकडे दुर्लक्ष झालं आणि साठ्यानं डाव साधला. चालायचंच. असंच एकदा व्हॅटिकनमध्ये पोप जॉन पॉलच्या बाबतीतही झालं होतं, त्याविषयी पुन्हा कधीतरी.