Author: Raj

  • गाव मागचा मागे पडला

    ख्रिस स्ट्युअर्ट​ ‘जेनेसिस’ या बॅंडमधला ड्रमर. दोन अल्बम केल्यानंतर संगीताचे क्षेत्र सोडून युरोपमध्ये फिरून मेंढ्यांची लोकर काढणे, प्रवासविषयक पुस्तके लिहीणे अशी कामे केली. अखेर इंग्लंडमधले राहते घर विकून स्पेनमधल्या अन्दालुचिया या चिमुकल्या गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘ड्रायव्हिंग ओव्हर लेमन्स’ ही या प्रवासाची गोष्ट. अन्दालुचियावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली, एका बाजूला बर्फाने आच्छादित पर्वत, घराजवळूनच…

    ख्रिस स्ट्युअर्ट​ ‘जेनेसिस’ या बॅंडमधला ड्रमर. दोन अल्बम केल्यानंतर संगीताचे क्षेत्र सोडून युरोपमध्ये फिरून मेंढ्यांची लोकर काढणे, प्रवासविषयक पुस्तके लिहीणे अशी कामे केली. अखेर इंग्लंडमधले राहते घर विकून स्पेनमधल्या अन्दालुचिया या चिमुकल्या गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘ड्रायव्हिंग ओव्हर लेमन्स’ ही या प्रवासाची गोष्ट. अन्दालुचियावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली, एका बाजूला बर्फाने आच्छादित पर्वत, घराजवळूनच जाणारी नदी, संत्री, लिंबं यांच्या बागा, फळफुलांची शेतं. तरीही शहरातून इथे स्थायिक व्हायचे म्हणजे सोपं काम नाही. नदीवर पूल बांधण्यापासून ते टेकडीवरच्या झर्‍यातून घरापर्यंत पाणी येण्याची व्यवस्था करण्यापर्यंत सगळी कामे स्वत:च करायची. मदतीला शेजारपाजारचे दोमिन्गोसारखे मित्र होतेच. एकदा मूलभूत गरजा भागल्यानंतर ख्रिस आणि त्याची बायको आना यांचे प्रयोग सुरू झाले. कुक्कूटपालन, मेंढ्या-बकर्‍या, डुकरे पाळणे, बागेतील शेती आणि मशागत. काही प्रयोग यशस्वी झाले तर काही सपशेल फसले.

    ख्रिसची लिहीण्याची शैली सरळ आणि प्रामाणिक आहे. आयुष्याकडून फार गडगंज अपेक्षा न ठेवता निसर्गाच्या सान्निध्यात राहून साधं आयुष्य जगायचं ही माफक मागणी. आपल्या निर्णयाबद्दल तो फारसं बोलत नाही. इंग्लंडमधलं आयुष्य का नकोसं वाटलं याबद्दल ‘तिथे विम्याची नोंदणी करत बसण्यापेक्षा हे किती बरं’ असं एखादं मोघम वाक्य येतं. पण टेकडीवरच्या झर्‍यामधून पाचर खोदल्यानंतर येणारा पाण्याचा पहिला प्रवाह बघणे, शेळ्या-मेंढ्या टेकडीवर चरताना त्यांच्या गळ्यातील घंटा झाडाखाली बसून ऐकणे किंवा उन्हाळ्यात रात्री असह्य उकाडा झाल्यावत नदीत डुंबायला जाणे अशा वरकरणी साध्या पण अर्थपूर्ण गोष्टी करताना त्याला मिळणारा आनंद पाहून ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं त्याने म्हटलं नाही तरी आपल्याला ते जाणवत रहातं. “It was a thrill, that first day, watching as the water gathered and swelled and saturated the dry earth. It crept up the bank, pouring into the ant-hills and mole-runs, and little by little turned into a full-blown stream. Seeing it, I would splash through to the head and race around the next corner to await the miracle all over again.”

    व्ही. एस. नायपॉल साहित्यक्षेत्रातील मोठं नाव. ‘ऑन लिटररी ओकेजन्स’ हे त्यांनी वेळोवेळी लिहीलेल्या निबंधांचे पुस्तक, यात त्यांचं नोबेल पारितोषिक भाषणही आहे. नायपॉल बर्‍याच विषयांवर बोलतात, त्यातील एक मुख्य आणि परतपरत येणारा विषय म्हणजे स्वत:चा शोध. त्यांचे बालपण त्रिनिदादमध्ये गेलं, आजोबा मजूर म्हणून भारतातून आल्यानंतर नंतरच्या पिढ्या तिथेच स्थायिक झाल्या. त्यांच्या वडीलांनी लहानपणापासून तुला लेखक व्हायचय असं मनावर बिंबवलेलं. लहानपणी जे वाचायला मिळालं, डिकन्सपासून वेल्सपर्यंत, त्यातील वातावरण, पात्रे नेहेमी परकी वाटत राहीली. एकदा गावात झालेली रामलीला बघितली हाच काय तो भारतीय संस्कृतीचा परिचय. नायपॉल यांच्या शब्दात सांगायचं तर, ‘आम्हाला वाटलं की आम्ही आमच्याबरोबर भारचा एक तुकडा आणला आहे आणि तो एखाद्या गालिच्याप्रमाणे इथे पसरता येईल.’ हिंदी कळत होतं पण बोलता येत नव्हतं. ऑक्सफर्डला स्कॉलरशिप मिळाल्यावर नायपॉलना वाटलं की आता लेखकांच्या या देशात गेल्यावर आपल्या प्रतिभेला जाग येईल. पण तसं काहीच झालं नाही, उलट गोंधळ अजून वाढत गेला. अखेर इग्लंडमध्येच त्यांना स्वत:मध्ये दडलेला लेखक सापडला पण तो त्यांच्या लहानपणी घरासमोर जो रस्ता होता त्या रस्त्याच्या आठवणींमध्ये. रस्ता, घरं, तिथले लोक आठवत गेले आणि ‘मिगेल स्ट्रीट’ हे पुस्तक तयार झालं.

    पहिलं पुस्तक लिहील्यानंतर बाकीची आपोआप येतील ही त्यांची कल्पना फोल ठरली दुसर्‍या पुस्तकाच्या वेळी पाटी परत कोरी होती. योगायोगानं त्यांना त्रिनिदाद आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लिहीण्यासाठी आमंत्रण मिळालं. यासाठी आपण जिथे रहात होतो तिथल्या त्या भागाच्या इतिहासाचा अभ्यास करता आला. अंतर्मनात आणखी एक धागा जुळला आणि हेच प्रत्येक वेळी होत राहीलं. भारतीय वंश असूनही भारत परका होता. नेहरू, टागोर, गांधी किंवा आर. के नारायण यांच्या लेखनातून दिसणारा भारत एकांगी भासत होता. भारतात येऊन प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर भारतावर दोन पुस्तके लिहीली. एका ठिकाणी नायपॉल म्हणतात, “To take an interest in a writer’s work is, for me, to take an interest in his life; for one interest follows automatically the other.” थोडा विचार केल्यानंतर वाक्य पटायला लागतं. हॅम्लेट अनेक अर्थांनी श्रेष्ठ कलाकृती आहे पण शेक्सपिअरने ज्या काळात हॅम्लेट लिहीलं त्या काळातील रेनेसान्सचे युरोपभर उमटलेले प्रतिसाद, कॅथोलिक धर्माविरूद्ध मार्टीन लूथरने सुरू केलेलं बंड आणि प्रोटेस्टंट शाखेचा उदय, एनलायटनमेंटची सुरूवात हे सगळं लक्षात घेतलं तर ‘टु बी ऑर नॉट टू बी’ च्या अर्थाचे निराळे पदर उलगडतात. तसंच नायपॉल यांची पुस्तकं वाचल्यानंतर पुस्तकाच्या विषयापेक्षा नायपॉल यांची वेगळी ओळख पटायला लागते.

    ही दोन पुस्तकं कुठल्याही दुकानात एका भागात सोडाच, एका खोलीतही दिसणार नाहीत कदाचित. ही एकामागून एक वाचली म्हणून त्यांच्यातला एक समान धागा लक्षात आला, नाहीतर ते ही झालं नसतं. ख्रिस किंवा नायपॉल दोघेही आपल्या सद्यस्थितीवर संतुष्ट नाहीत. दोघांनाही अस्वस्थ वाटतय, दोघांनाही आपल्या अस्वस्थतेवर आपापल्या परीने मार्ग शोधले आहेत. ख्रिसचा मार्ग ‘दिल से’ मार्ग आहे, जास्त विश्लेषण न करता (किंवा जास्त विश्लेषण केलं आहे असं न दाखवता कारण ब्रिटीश माणसं विचार न करता असा निर्णय घेतील यावर विश्वास बसणं कठीण. त्या जागी एखादा इटालियन किंवा स्पॅनिश असता तर गोष्ट वेगळी.) नायपॉल आत्मपरिक्षण आणि काहीसा कॅथार्टीक म्हणता येईल असा मार्ग शोधतात. प्रत्येक पुस्तक लिहील्यानंतर त्यांना स्वत:च्याच एका पैलूची ओळख होते.

    ख्रिसला जे हवंय ते वरकरणी सरळ आहे असं वाटतं पण तसं नसावं. शेतीच करायची तर ती इंग्लंडमध्येही करता आली असती पण त्याला स्पेन आवडतं. तिथे राहताना पहिल्यांदा एक ब्रिटीश जोडपं भेटतं तेव्हा ‘हे इथे कशाला आले’ असा विचार त्याच्या मनात चमकून जातो. ब्रिटीश संस्कृतीबद्दल नावड आणि दक्षिण युरोपमधील मोकळ्या-ढाकळ्या वातावरणाचं आकर्षण असा काहीसा हा पेच आहे असं वाटतं. जे इंग्लंड ख्रिसला नकोसं झालं त्याबद्दल नायपॉल यांना सुप्त आकर्षण होतं. (इथे ‘कलोनियल’ म्हणून जी ओळख जन्मत:च मिळाली त्याबद्दल ते विस्ताराने बोलतात.) पण त्यांच्यातला लेखक प्रगट झाला तो मात्र त्रिनिदाद आणि भारतातच. म्हणूनच ते म्हणतात, “To become a writer, that noble thing, I had thought it necessary to leave. Actually, to write, it was necessary to go back. It was the beginning of self-knowledge.”

    माणसाला नेमकं काय हवय यावर भल्याभल्यांनी लिहीलय. ख्रिसला अन्दालुचियामध्ये आपलं गाव सापडलं, नायपॉलना त्यासाठी आपल्या भूतकाळात दडलेली पाळंमुळं शोधावी लागली तर कुणाला टोक्योमधला चांगला चालणारा बार बंद करुन कादंबरी लिहायला घ्यावीशी वाटली. इथे बरोबर किंवा चूक असं काही नसतं.

    To each his own.

  • ये सब क्या हो रहा है, बेटा दुर्योधन?

    अमेरिकन फिजिकल सोसायटी ही संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार यांच्याशी निगडित एक नावाजलेली संस्था आहे. एपीएसचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे ते पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी मासिके गेली १०० वर्षे चालवत आहे. या मासिकांमध्ये अत्युच्च दर्जाचे निबंध प्रकाशित होत असतात, यांत प्रकाशित झालेल्या शोधांना बरेचदा नोबेल पारितोषिकही मिळालेलं आहे. हेच नेचर, एल्सेव्हिअर किंवा अमेरिकन असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ…

    अमेरिकन फिजिकल सोसायटी ही संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार यांच्याशी निगडित एक नावाजलेली संस्था आहे. एपीएसचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे ते पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी मासिके गेली १०० वर्षे चालवत आहे. या मासिकांमध्ये अत्युच्च दर्जाचे निबंध प्रकाशित होत असतात, यांत प्रकाशित झालेल्या शोधांना बरेचदा नोबेल पारितोषिकही मिळालेलं आहे. हेच नेचर, एल्सेव्हिअर किंवा अमेरिकन असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स (सायन्स मासिक) यांच्याबद्दलही म्हणता येईल. थोडक्यात, विज्ञानासाठी या संस्था आणि कंपन्या करत असलेलं काम उल्लेखनीय आहे. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी की दिवसेंदिवस या सर्व संस्था धंदेवाईक होत चालल्या आहेत आणि त्यामुळे विज्ञानाच्या संशोधनामध्ये जी सचोटी आणि पारदर्शकता अपेक्षित आहे ती नाहीशी होत चालली आहे.

    या मासिकांमध्ये लेख कसे प्रकाशित होतात? जगभरातील शास्त्रज्ञ त्यांच्या सरकारांकडून किंवा खाजगी कंपन्यांकडून संशोधनासाठी निधी जमवतात. शास्त्रज्ञ आणि त्यांचे विद्यार्थी रात्रीचा दिवस करून एखाद्या विषयावर संशोधन करतात आणि त्याचे निष्कर्ष लेखांमधून या मासिकांना पाठवतात. हे निष्कर्ष बरोबर आहेत की चूक हे कुणी ठरवायचं? यासाठी या मासिकांनी शेकडो परीक्षक किंवा रेफरी निवडलेले असतात. हे रेफरी म्हणजे त्याच विषयात काम करणारे इतर शास्त्रज्ञ. आपल्या संशोधनातून किंवा विद्यापीठात असतील तर संशोधन आणि शिकवणे यांच्या रामरगाड्यातून वेळात वेळ काढून हे शास्त्रज्ञ त्यांना पाठवलेले लेख तपासतात, त्यातील चुका शोधून काढतात आणि लेख प्रकाशित करायचा की नाही यावर निर्णय देतात. प्रत्येक लेख कमीत कमी दोन किंवा तीन रेफरींकडे जातो आणि त्यांचे अनुकूल मत असेल तर प्रकाशित केला जातो. हे करण्यासाठी या शास्त्रज्ञांना एक कपर्दीकही दिला जात नाही, केवळ विज्ञानासाठी हे लोक हे काम करतात.

    लेख प्रकाशित झाल्यावर काय होतं? तो लेख तात्काळ पे वॉलमागे जातो. आता एखाद्याला वाटेल की निदान जे लोक एक पैसुद्धा न घेता रेफरी म्हणून काम करतात त्यांना तरी यात काही सवलत मिळेल? नो सर. पैसा फेको, तमाशा देखो. मी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स’चा रेफरी आहे पण मला एखादा लेख वाचायचा असेल आणि मी वर्गणीदार नसेन तर मला किती दमड्या मोजाव्या लागतील माहीत आहे का? $२५ फक्त म्हणजे आजच्या दराने झाले १३५० रुपये फक्त. नीट लक्षात घ्या, ही त्या मासिकाच्या एका अंकाची किंमत नाहीये, अंकातल्या एका लेखाची किंमत आहे. एका लेखासाठी एखादा डॉलर असता तर प्रश्न नव्हता. हे तर हिमनगाचं टोक झालं. जर तुम्ही तुमचा एखादा लेख पाठवला आणि तो प्रकाशित करायला मान्यता मिळाली तर त्यासाठीही तुम्हाला पैसे मोजावे लागतात. त्यात परत त्यातल्या आकृत्या रंगीत हव्या असतील तर पैसे जास्त. हे पैसे बहुतेक वेळा तीन आकडी डॉलरच्या पटीत असतात. पुणे विद्यापीठात काम करत असताना अशी वेळ आली तर आम्ही मासिकाच्या संपादकांना ‘आम्हाला पैसे माफ करा’ असं पत्र पाठवीत असू (दे दान छुटे गिरान) आणि तेही उदार मनाने ही सवलत देत असत.

    संशोधनाचे पैसे जनतेचे, ते प्रकाशित करायला यांना पैसे द्यायचे, मात्र त्याचं परीक्षण विज्ञानाच्या नावाखाली फुकट करायचं आणि लेख प्रसिद्ध झाल्यावर तो वाचायला परत जनतेकडूनच अवाच्यासव्वा पैसे घ्यायचे? इतकी लुटालूट तर चंबळचे डाकूसुद्धा करत नव्हते. बरं, संस्था किंवा विद्यापीठ यांच्यासाठी असलेले घाऊक वर्गणीचे दर इतके जास्त आहेत की हार्वर्डसारख्या विद्यापीठानेही हे परवडत नाही असं कबूल केलं आहे. हार्वर्डचा यासाठीचा वार्षिक खर्च आहे $३५ लाख फक्त. यातील काही मासिकांच्या वार्षिक वर्गणी $४०,००० हून जास्त आहे.

    मागच्या शतकात आंतरजाल येण्याच्या आधी माहिती प्रसरणाचे सगळेच मार्ग कासवाच्या वेगाचे होते. सुदैवाने आता हे बदललं आहे आणि याचा परिणाम म्हणून आंतरजालाच्या माध्यमातून अशा प्रकारांना तोंड फोडणं सोपं झालं आहे. टिम ग्रोवर ऑक्सफर्डमधील एक गणितज्ञ. त्याला या सगळ्या प्रकाराचा वीट आला आणि त्याने एल्सेव्हिअर या प्रकाशन कंपनीवर  बहिष्कार घालण्याचं ठरवलं. त्याला अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला, त्यातून http://thecostofknowledge.com/ ‘कॉस्ट ऑफ नॉलेज‘ ही साईट उघडली गेली आणि त्यात आतापर्यंत १३,००० शास्त्रज्ञांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. प्लॉससारखी काही मासिकं सर्वांसाठी खुली आहेत. अर्थातच या कंपन्या याबाबत अनुकूल नाहीत आणि अमेरिकन सिनेटमध्ये याला प्रतिबंध करण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत. सोपा-पिपाचं बिल याच जातकुळीतलं. सर्व देशातील, सर्व नागरिकांसाठी ज्ञान मोफत उपलब्ध असायला हवं या अपेक्षेपोटी ऍरन स्वार्ट्झचा बळी गेला.

    हे सर्व विचार आता आठवायचं कारण मला काल अमेरिकन फिजिकल सोसायटीची मेल आली. तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहीत आहे, याडा, याडा. ‘मला परीक्षण करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मासिकांना फुकट प्रवेश देत असाल तर करतो’ असं उत्तर त्यांना पाठवलं आहे.

    —-

    १. अल्ला के नाम पे दे दे बाबा, ये पेपर मुफत में पब्लिश कर दे बाबा, आज मंगलवार है बाबा, जर्नल का स्पेशल इशू निकलेगा बाबा, तेरे जर्नल का इंपॅक्ट फॅक्टर बढेगा बाबा, पेपर को नोबेल मिलेगा बाबा इ. इ.

  • आनंदी आनंद गडे

    गेला महिनाभर जागतिक बुद्धीबळस्पर्धेमध्ये भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्त्राइलचा बोरिस गेलफांड यांच्यात विश्वविजेतेपदासाठी अटीतटीचे सामने सुरू होते. एका बंद खोलीत दोन लोक तीन तास डोक्याला हात लावून गप्प बसून राहणार. साहजिकच वृत्तपत्रांच्या दृष्टीने या लढतीची ‘न्यूज व्हॅल्यू’ फारच कमी होती, तिला पाचव्या-सहाव्या पानावरच्या एखाद्या कोपर्‍यात जागा मिळत होती. मूठभर खंदे बुद्धीबळ चाहते मात्र या लढतींकडे…

    गेला महिनाभर जागतिक बुद्धीबळस्पर्धेमध्ये भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्त्राइलचा बोरिस गेलफांड यांच्यात विश्वविजेतेपदासाठी अटीतटीचे सामने सुरू होते. एका बंद खोलीत दोन लोक तीन तास डोक्याला हात लावून गप्प बसून राहणार. साहजिकच वृत्तपत्रांच्या दृष्टीने या लढतीची ‘न्यूज व्हॅल्यू’ फारच कमी होती, तिला पाचव्या-सहाव्या पानावरच्या एखाद्या कोपर्‍यात जागा मिळत होती. मूठभर खंदे बुद्धीबळ चाहते मात्र या लढतींकडे डोळे लावून बसले होते. याआधी आनंदने २००८ आणि २०१० मध्ये अनुक्रमे क्रामनिक आणि टोपोलोव्हला हरवून विश्वविजेतेपद मिळवलं आणि राखलं होतं.

    बुद्धीबळ हे नाव चेस पेक्षा अधिक समर्पक आहे. अर्थात इथे प्रश्न फक्त बुद्धीचा नसतो. अशक्य कोटीतील मानसिक ताणाखाली कोण जास्त वेळ टिकून राहतो यावरही बरंच अवलंबून असतं. बुद्धीबळामध्ये कला आणि शास्त्र यांचा सुरेख संगम बघायला मिळतो. बुद्धिबळाच्या कोणत्याही डावात तीन भाग असतात. ओपनिंग, मिडल गेम आणि एंड गेम. अशा अत्युच्च पातळीवरील खेळांमध्ये सुरवातीच्या खेळ्या आणि या खेळ्यांचे वेगवेगळे उपप्रकार ठरलेले असतात. यांना स्टॅंडर्ड ओपनिंग्ज म्हणतात. उदा. सिसिलियन डिफेन्स किंवा किंग्ज इंडियन डिफेन्स इ. पांढर्‍याने पहिली खेळी केली की तिला कसे उत्तर द्यायचे हे काळा या स्टॅंडर्ड ओपनिंग्जमधून ठरवतो.

    यावरून एखाद्याला वाटेल की सुरूवातीच्या खेळ्या ठरलेल्याच आहेत तर मग त्यात मजा काय राहीली? परिस्थिती एकदम उलटी आहे. अगदी पहिल्या खेळीवरूनही कसलेले खेळाडू बरेच अंदाज बांधू शकतात. उदा. पांढर्‍याने प्यादे डी चार घरात सरकवून सुरूवात केली तर तो विजयासाठी प्रयत्न करणार आहे हे स्पष्ट होते. याउलट त्याने घोडा एफ ३ घरात देऊन सुरूवात केली तर त्याला कोणताही धोका न पत्करता बरोबरीची अपेक्षा आहे असे मानले जाते. या सगळ्या ओपनिंग्ज आणि त्यांचे शेकडो उपप्रकार हे खेळाडू कोळून प्यालेले असतात. त्यामुळे कोणती ओपनिंग खेळली जात आहे हे एकदा निश्चित झालं की खेळ्या झटपट होतात. मग काळा किंवा पांढरा कुणीतरी पुस्तकात दिलेल्या खेळीपेक्षा वेगळी (आणि कधीकधी अत्यंत दुर्मिळ अशी) खेळी – नॉव्हेल्टी – करतात. इथे खरा डाव सुरू होतो. आतापर्यंत बहुधा खेळ मिडल गेममध्ये आलेला असतो. अर्थात कधीकधी पहिल्या पाच-दहा खेळ्यांमध्येच नॉव्हेल्टी दिसते. उदा. आनंदने बाराव्या डाव्यात सहावी खेळी करताना बी ३ घरात प्यादे सरकवून बोरिसला बराच वेळ गुंतवून ठेवले होते. अर्थात बोरिसनेही याचे अचूक उत्तर दिले.

    जागतिक स्पर्धेसाठी हे खेळाडू जेव्हा तयारी करतात तेव्हा कोणती ओपनिंग वापरायची आणि कोणती नाही यावर बराच वेळ विचार केला जातो. यासाठी सहाय्यक म्हणून दोघांकडेही कसलेल्या ग्रॅंडमास्टरांची टीम असते. यांना ‘सेकंड्स’ म्हणतात. सेकंड्स म्हणून आपला प्रतिस्पर्धी कुणाची मदत घेतो आहे याकडेही दोघांचे बारीक लक्ष असते कारण बरेचदा सेकंड्सने त्यांच्या कारकीर्दीत खेळलेल्या डावांचाही उपयोग केला जातो. याहूनही महत्वाचे म्हणजे या खेळाडूंना पडद्यामागून काही लोक मदत करत असतात. यांची नावे स्पर्धा संपल्याशिवाय समोर येत नाहीत. २०१० च्या टोपोलोव्हविरूद्धच्या सामन्यांसाठी आनंदला माजी विश्वविजेते कास्पारोव्ह आणि क्रामनिक यांनी मदत केल्याचे नंतर समोर आले तर यावेळी फिडे रेटींगप्रमाणे पहिल्या क्रमांकावर असलेला मॅग्नस कार्लसन त्याचा ‘पडद्यामागचा सेकंड’ असल्याची चर्चा जोरात आहे. प्रत्येक खेळाडू प्रतिस्पर्ध्याला किती आणि कसा चकित करू शकतो हे त्याच्या टीमच्या प्रिपरेशनवर अवलंबून असते. मिडल आणि एंड गेममध्ये खेळाडूंची कसोटी लागते कारण इथे टीमसोबत केलेली तयारी फारशी कामी येत नाही. प्रत्येक डाव वेगळा असतो.

    यावेळच्या बारा डावांमध्ये सुरूवातीचे डाव सावधपणे एकमेकांचा अंदाज घेण्यात गेले. सुरूवातीला गेलफांडने काही डावांमध्ये आनंदला बुचकळ्यात पाडले होते. एकदा तर आनंद वेळेमध्ये मागेही होता. सातव्या गेममध्ये आनंदने काळ्या मोहर्‍यांकडून खेळताना निर्णायक खेळण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या अंगाशी आला. गेलफांडने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. पण दुसर्‍याच दिवशी आनंदने केवळ १७ खेळ्यांमध्ये विजय नोंदवून याची सव्याज परतफेड केली. आनंदने जो कट रचला होता तो इतका कुशल होता की गेलफांडच्या तर लक्षात आलाच नाही पण समालोचकांच्याही यावर दांड्या उडाल्या. शेवटच्या खेळीपर्यंत काळा वजीर अडचणीत येतो आहे याचा कुणाला पत्ताही लागला नाही. बाराव्या डावात आनंदला वेळेचा भरपूर फायदा असूनही त्याने बरोबरीचा प्रस्ताव का मांडला हे समालोचक क्रामनिकलाही कोड्यात टाकणारे होते.

    सहाव्या डावात समालोचक म्हणून कास्पारोव्हने केलेल्या काही कमेंट्स बर्‍याच लोकांना आवडल्या नाहीत. हल्लीच्या जागतिक स्पर्धा उत्कृष्ट खेळाडूंमध्ये खेळल्या जात नाहीत हा त्याचा टोमणा गेलफांडला उद्देशून होता कारण गेलफांडचं रेटींग कमी आहे. हल्ली आनंद पूर्वीसारखा खेळत नाही असंही तो म्हटला. यात तथ्य असावे कारण या स्पर्धेमध्ये बरेचदा संधी असूनही आनंदने पूर्वीसारखा आक्रमक खेळ केला नाही. (कास्पारोव्हच्या टिप्पणीनंतरचे दोन्ही डाव निर्णायक झाले हा योगायोग रोचक आहे.) कास्पारोव्हकडे बघताना मला बरेचदा व्हिव्ह रिचर्ड्स आठवतो. दोघांमध्येही ऍरोगन्स ठासून भरलेला आहे पण याच्या मुळाशी त्यांच्याकडे असलेल्या असामान्य प्रतिभेवर असलेला विश्वास आहे. (कास्पारोव्हचा आयक्यू आहे १९०!.) मुद्दाम हीन लेखण्याचा हेतू यात असेल असे वाटत नाही. शिवाय कास्पारोव्हने ज्या कठीण परिस्थितीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले त्याच्या तुलनेत या स्पर्धा त्याला फारच सोप्या वाटत असणार.

    बारा डावांमध्ये बरोबरी झाल्यानंतर प्रत्येकी २५ मिनिटांचे चार टाय ब्रेकर सामने खेळण्यात आले. यातील दुसर्‍या डावात आनंदने अखेर गेलफांडला नमवण्यात यश मिळवले. बाकीचे सामने बरोबरीत सुटले असले तरी गेलफांडने आनंदला सहजासहजी जिंकू दिले नाही. बरेचदा त्याचे पारडेही जड होते. टाय-ब्रेकरमध्ये गेलफांडची मुख्य अडचण वेळेची होती. आनंद जलद खेळण्यात वाकबगार आहे, गेलफांडला त्या गतीने खेळणे अशक्य झाले आणि तेच त्याच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. तरीही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आनंदचा खेळ थोडा दबावाखाली असल्यासारखा वाटला. हे तात्पुरते आहे किंवा कसे ते यथावकाश कळेलच.

    परकायाप्रवेश शक्य असता तर मला या खेळाडूंच्या शरीरात जावून त्यांना बुद्धीबळाचा पट कसा दिसतो हे बघायला आवडलं असतं. प्रत्येक खेळीनंतर होणार्‍या आठ ते दहा खेळ्या ते सहज बघू शकतात. शिवाय समोर पट नसेल तरी यात फारसा फरक पडत नाही कारण आख्खा पट प्रत्येक सोंगटीसहीत त्यांना लख्ख दिसत असतो आणि खेळले गेलेले हजारो डावही त्यांच्या लक्षात असतात.

    शेरलॉक होम्सच्या यशाचं एक मुख्य कारण होतं त्याची प्रखर बुद्धीमत्ता. खर्‍या आयुष्यात अशाच बुद्धीमत्तेचे काही आविष्कार या चौसष्ट घरांच्या मैदानावर बघायला मिळतात. आनंद जिंकला याचा ‘आनंद’ अर्थातच आहेच, पण गेलफांडनेही त्याला साजेशी टक्कर दिली याबद्दल त्याचेही हार्दिक अभिनंदन.

    ——–

    १. एक कसलेला आणि एक नवशिका खेळाडू असा डाव असेल आणि नवशिक्याचे फंडे पक्के नसतील तर त्याची कशी अमानुष कत्तल होऊ शकते याचे एक उदाहरण कास्पारोव्ह आणि फेडोरोव्ह यांच्या डावात दिसतं. (डाव दिसत नसेल तर PGN viewer – pgn4web(Javascript) ला सेट करावा.) फेडोरोव्हने कसलाही विचार न करता केलेल्या आक्रमणाकडे कास्पारोव्ह तुच्छतेने दुर्लक्ष केले आहे, एखाद्या लहान मुलाच्या चापट्या असाव्यात त्याप्रमाणे. या डावाबद्दल कास्पारोव्ह म्हणतो, “If what he played against me had a name, it might be called the ‘Kitchen Sink Attack.’”

    २. कास्पारोव्हला कार्पोव्ह आणि तत्कालीन रशियन सत्ताधारी दोघांचाही सामना करावा लागला. १९८४ च्या जागतिक स्पर्धेमध्ये तब्बल ४८ डाव खेळल्यानंतर (४० बरोबरी, पाच विजय, तीन पराभव) कार्पोव्ह हरतो आहे असे दिसल्याबरोबर प्रचंड ताणामुळे दोन्ही खेळाडूंचे मानसिक आरोग्य धोक्यात आहे असे कारण देत फिडेने स्पर्धा रद्द केली. हा निर्णय दोघांनाही मान्य नव्हता पण यामुळे विजेतेपद कार्पोव्हकडेच राहीले. यानंतर फिडेने स्पर्धेचे नियम बदलले. याखेरीज स्पर्धांमधील वातावरण जवळजवळ युद्धासारखेच होते. मारक्या म्हशींप्रमाणे एकमेकांकडे टक लावून बघणे, उशिरा येणे असे अनेक प्रकार केले जात असत. त्या मानाने गेलफांड आणि आनंद स्पर्धा चालू असतानाही एकमेकांकडे फारसे बघत नाहीत आणि दोघेही एकमेकांचा आदर करतात. तुलनाच करायची झाली तर कार्पोव्ह-कास्पारोव्ह म्हणजे भिकू म्हात्रे आणि गुरू नारायण यांची मांडवली आहे तर आनंद-गेलफांड म्हणजे चिदंबरम आणि जेटली यांची लोकसभेतील वादावादी आहे.