Author: Raj

  • ‘राग दरबारी’चं मर्मभेदी व्यंग

    Rag Darbari book cover
    Rag Darbari by Sri Lal Shukla

    मराठीच्या तुलनेत हिंदी भाषिक अधिक वाचतात आणि लिहितातही. हिंदीतील ब्लॉगलेखन अव्याहतपणे सुरु असतं. जर हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आढळणारा शब्द गूगलला तर बहुतेक सर्व सायटी हिंदीमध्ये असतात. हिंदीमध्ये कवीसंमेलनांची दीर्घ परंपरा आहे आणि ते लोक ती प्रेमाने जोपासतात. त्यांच्या कविता मर्मभेदी व्यंगाने भरलेल्या असतात. आणि हेच व्यंग श्रीलाल शुक्ल यांच्या ‘राग दरबारी’ या कादंबरीतही बघायला मिळतं.

    गोष्ट आहे शिवपालगंज गावातली. रंगनाथ हा इतिहासात एम.ए. केलेला विद्यार्थी. तो काही दिवस आजारी होता. आता बरा झाल्यावर गावाकडच्या ताज्या हवेत प्रकृती सुधारेल या साध्याभोळ्या विचाराने तो शिवपालगंजमध्ये मामाकडे चालला आहे. त्याचे मामा म्हणजे वैद्यजी, शिवपालगंजमधील बडं प्रस्थ. नाही म्हणायला नावाला जागून ते रोग्यांना तपासून पुड्या वगैरे देतात (वीर्यवर्धक पुडी हे त्यांचं खास औषध!) पण त्यांचा खरा व्यवसाय गावातील राजकारण. गावातील छंगामल विद्यालय इंटरकॉलेजच्या प्रबंधसमितीमध्ये त्यांचा दबदबा आहे. कॉलेजचा प्रिंसिपल त्यांना विचारल्याशिवाय कोणतीही गोष्ट करत नाही. शिवाय गावातील कोऑपरेटिव्ह युनियनचे ते मॅनेजिग डायरेक्टरही आहेत.

    साधारणपणे अशा गावातील गोष्टींमध्ये श्रीमंत लोक वाईट, गरीब लोकांना लुबाडणारे वगैरे असतात. गरीब लोक साधेभोळे, सचोटीने वागणारे असतात. बिमल रॉयच्या ‘दो बिघा जमीन’पासून सत्यजित राय यांच्या ‘सद्गती’पर्यंत थोड्याफार फरकाने हेच चित्र दिसतं. ‘राग दरबारी’मधले गावकरी मात्र एकाहून एक इरसाल आहेत, मग ते गरीब असोत वा श्रीमंत.  श्रीलाल शुक्लही एका  पात्राबद्दल म्हणतात की कालिकाप्रसाद प्रेमचंदांच्या नायकाप्रमाणे लगान घ्यायला आलेल्या अधिकाऱ्याला घाबरणारा नव्हता. शिवपालगंजच्या इरसाल गावकऱ्यांसाठी एक खास शब्द इथे प्रचलित आहे – गंजहा. याचा वापर विशेषण म्हणूनही केला जातो उदा. “गंजहापन झाड़ते हो!”

    शेवटची काही प्रकरणे सोडली तर सगळी कादंबरी म्हणजे व्यंगांच्या विविध प्रकारांचा उत्तम नमुना आहे. कादंबरी १९६८ मधली, त्याबद्दल शुक्ल यांना त्या वर्षीचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तेव्हाच्या परिस्थितीशी जितका अधिक परिचय असेल तितके अधिक संदर्भ लागत जातात. अर्थात काही गोष्टी गेल्या सत्तर वर्षात बदललेल्या नाहीतच, उदा. सार्वजनिक स्वच्छतेचा अभाव. शुक्ल यांच्या चौफेर फटकेबाजीचे हे काही नमुने

    यहाँ सनीचर साँस खींचकर चुप हो गया। रंगनाथ समझ गया कि घटिया कहानी–लेखकों की तरह मुख्य बात पर आते–आते वह हवा बाँध रहा है।

    दारोग़ाजी उनकी बड़ी इज़्ज़त करते हैं। वे दारोग़ाजी की इज़्ज़त करते हैं। दोनों की इज़्ज़त प्रिंसिपल साहब करते हैं। कोई साला काम तो करता नहीं है, सब एक–दूसरे की इज़्ज़त करते हैं।

    सैनिटरी इन्स्पेक्टर को कई तरह के काम करने पड़ते हैं। वे भी जेब में ‘लैक्टोमीटर’ डालकर घूमते और राजहंसों की तरह नीर–क्षीर–विवेक करते हुए नीर–क्षीर में भेद न करनेवाले ग्वालों के मोती चुगा करते।

    तर मध्येच एखाद्या कवीला शोभेल असं वाक्य.

    सन्ध्या का बेमतलब सुहावना समय था।

    कादंबरी मी किंडल ऍपवर वाचली. याचा एक फायदा असा की अडलेला शब्द तर बघता येतोच शिवाय झाड, प्राणी, पक्षी यांचा उल्लेख असेल तर ‘सर्च’ हा पर्याय निवडला तर गुगलल्यानंतर चित्रही दिसतं. उदा. हे वाक्य, “काँसों की फुनगियाँ एक जगह पगडण्डी के आर–पार झूल रही थीं।” इथे ‘काँस’ शब्द हायलाईट करून शोधला तर हे चित्र दिसलं.

    कुश / काँस घास (Thatch grass / Kans Grass)

    मग म्हटलं, अरेच्चा, हे तर ‘पाथेर पांचाली’मधल्या ‘ट्रेन सीन’ मधलं गवत!

    सध्याच्या कादंबऱ्यांमध्ये विस्तृत वर्णनं देण्याची पद्धत आहे. नुकताच ‘देल्ही न्वार’ हा इंग्रजी कथासंग्रह वाचला. कथा चांगल्या आहेत, दिल्लीच्या गुन्हेगारीवर. पण बरेचदा लेखकांना कशाचं वर्णन करावं आणि ते किती करावं याचं भान सुटलेलं दिसतं. मग ते कंटाळवाणं होऊन जातं. किंवा काही लेखक आधुनिकतेची कास घेऊन मला वाटेल ते मी लिहिणार, याचा काय अर्थ लावायचा तो लावा असा पवित्रा घेतात. अशा वेळी मी फारतर शेवटी काय होतं ते बघतो आणि त्या लेखकाला रामराम म्हणतो.

    गेल्या काही वर्षांमध्ये इंग्रजी भाषेत भारतीय लेखक बरंच लिहीत आहेत. विक्रम सेठपासून सलमान रश्दीपर्यंत अनेक गाजलेली नावं. इथे एक मुख्य अडचण ही आहे की भारतात अंदाजे १२% लोक इंग्रजी बोलतात. इंग्रजीत लिहिणारे लेखक साधारणपणे समाजाच्या वरच्या स्तरातून येतात आणि साहजिकच ते त्या जगाबद्दल लिहितात. भारतातील अठरापगड जाती, त्यांच्या भाषा, चालीरीती यांचं अस्सल चित्र उभं करायचं तर लेखकही त्याच मातीतला हवा. शहरी लेखकांना हे जमणे शक्य नाही. म्हणून भारतातील इतर भाषांमधलं साहित्य इंग्रजीत अनुवादित व्हायला हवं. इथे दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे अनुवादही तितका सकस हवा. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे विवेक शानभाग यांची कन्नड भाषेतील कादंबरी ‘घाचर घोचर.’ याबद्दल गिरीश कर्नाड म्हणतात,

    The translation by Srinath Perur unerringly captures the shifting nuances that make Shanbhag’s telling so rich. Having read and admired the original Kannada, I was surprised how quickly Perur made me forget that I was reading a translation.

    श्रीलाल शुक्ल यांची कादंबरीवरची पकड जबरदस्त आहे. कोणतंही वर्णन कंटाळवाणं होत नाही. प्रत्येक पात्राचं बारकाईने अचूक व्यक्तिचित्र उभं करण्यात त्यांचा हातखंडा आहे. वाचताना गोनीदांच्या कादंबर्‍यांमधील कोकणी गावकरी आठवतात. लप्पन हा वैद्यजींचा मुलगा. प्रेमपत्र लिहिताना तो फक्त गाण्यांचे मुखडे लिहितो. किंवा कॉलेजचे प्रिन्सिपल रागावले की हिंदी सोडून अवधीमध्ये बोलतात. लंगडला तहसीलदाराच्या हापिसातून एका दस्तावेजाची नक्कल हवी आहे पण त्यासाठी लाच देणार नाही असा त्याचा  ठाम निश्चय आहे. दर वेळी तो अर्ज देतो आणि कुठल्याश्या कारणावरून अर्ज नामंजूर होतो. हे असंच चालू रहातं.

    सगळं वर्णन नर्मविनोदी, उपहासात्मक शैलीत करणारी ‘राग दरबारी’ शेवटी गंभीर होते. रंगनाथ सुरुवातीला गावातलं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यात काही प्रमाणात सहभागीही होतो. शेवटी मात्र त्याला कळून चुकतं की इथे आपलं जमणं शक्य नाही. इथून लवकरात लवकर निघावं हेच बरं. त्याला प्रिन्सिपल छंगामल विद्यालयात नोकरीची ऑफर देतो ती तो धुडकावून लावतो. त्यावर प्रिन्सिपल म्हणतो, ‘‘बाबू रंगनाथ, तुम्हारे विचार बहुत ऊँचे हैं। पर कुल मिलाकर उससे यही साबित होता है कि तुम गधे हो।’’

  • जपानी बटर राईस? छे! हा तर आपला तूप भात

    ‘सामुराई गॉर्मे’ मालिका सुरू होते तेव्हा ताकेशी कासुमी झोपेतून जागा होतो, घड्याळाकडे बघतो आणि जपानीतल्या ज्या काही शेलक्या शिव्या असतील त्या हासडत बायकोवर कातावतो, “मला लवकर का उठवलं नाहीस? ऑफिसला जायला किती उशीर होईल आता?” बायको शांतपणे टेबलाकडे बोट दाखवते. तिथे एक भला थोरला बुके आणि शुभेच्छा कार्ड पडलेली. मग त्याला आठवतं, आपण तर काल  रिटायर झालो. बायको म्हणते, मला योगा क्लासला जायचंय, दुपारी काहीतरी खाऊन घ्या.

    निवृत्तीचा पहिला दिवस. बाहेर जावं म्हणून निघतो आणि सवयीने रेलवे क्रॉसिंगजवळ पोचतो तेव्हा लक्षात येतं आज तर ऑफिस नाहीये. मग रस्ता बदलतो आणि वाटेवर एक हाटेल दिसतं. रोज त्या वाटेवरुन जायचा पण हे हाटेल इथे आहे हे त्याला ठाऊक नव्हतं. मग एका हाटेलात जाऊन ऑर्डर देतो तर तिथे मेन्यूवर बिअर दिसते. घ्यायची इच्छा होते पण भर दुपारी? तेवढ्यात तिथे एक सामुराई प्रगट होतो आणि भर दुपारी साके मागवून पितो. ते पाहून ताकेशीला धीर येतो आणि तो ही बिअर मागवतो. बहुतेक भागांमध्ये हाच पॅटर्न दिसतो. ऐनवेळी सामुराई प्रगट होऊन मार्ग दाखवतो. सुरुवातीला ताकेशीची ओळख करून देताना निवेदक हा आधुनिक सामुराई नव्हे असं मुद्दाम सांगतो.

    मालिकेची विशेषता म्हणजे प्रत्येक भागात ताकेशी पुढे असेल तो पदार्थ इतका मन लावून खातो की ते पाहून आपण रोज जे करतो ते फक्त उदरभरण असं वाटायला लागतं. दुर्दैवाने सगळे पदार्थ मांसाहारी आहेत मात्र ते जसे अपेक्षित आहेत तसे समरसून खाल्लेले बघून त्यामागची भावना पोचते. यात अर्थात संस्कृतीचा भाग आहे. क्रोकेट (तळलेले मांसाचे तुकडे) बिअरसोबतच चांगले लागतात. इथे परत ताकेशीला लहानपणी तो मित्रांबरोबर क्रॉकेट खायला जायचा ते आठवतं.

    एक जगप्रसिद्ध समीक्षक याला ‘फूड पॉर्न’ म्हणतात. म्हणोत बापडे. आम्ही याला आयुष्यातील साध्या गोष्टींचा निर्भेळ आनंद घेणे म्हणतो. जिवाजीराव म्हणतात तसं “असतो एकेकाचा दृष्टिदोष.”

    दुसरी जपानी मालिका आहे ‘मिडनाईट डायनर : टोकियो स्टोरीज.’ दुसऱ्या एका समीक्षकांना (हे ही जगप्रसिद्ध बरं का!) ही मालिका बघून मुराकामी आठवला. ते वाचून आम्हाला आमची आणि बिचाऱ्या हारुकीची वायली वायली दया आली. मूळ पुस्तक न वाचता नुसते पुस्तकावरचे लेख वाचून मतं बनवली की असे वांधे होतात, असो. हे डायनर म्हणजे एक लहानसं हाटेल वजा बार. उघडतो रात्री १२ ला आणि बंद होतो सकाळी ७ ला. रात्रपाळी करणारे, पोलीस, चोर, याकूझा माफिया, बारामधल्या नर्तक्या अशी इथली नेहेमीची गिऱ्हाईकं. डायनर चालवणारा मास्टर (जपानीत ‘मास्ता’) तुम्हाला जो पदार्थ हवा तो बनवून देतो जर त्याच्याकडे सामग्री असेल तर. मग कधीकधी गिऱ्हाईकं येताना सामग्री घेऊन येतात.

    Japanese butter rice
    जपानी बटर राईस

    प्रत्येक भागात एक किंवा अधिक पात्रांची गोष्ट, बरेचदा गुंतागुंतीची आणि भावनोत्कट. मालिकेची खासियत ही की ज्या कथानकावर तीन तास चित्रपट ओढता येईल किंवा साताठशे भागांची ‘कुणालाही काहीच कळेना’ टाइप​ मालिका सहज खपेल ते इथे वीस मिनिटात संपतं. प्रत्येक कथानकाशी निगडित एक पदार्थ, पात्रे तो खात असताना कथा पुढे सरकते. शेवटी पदार्थाची कृती. दोन ताटातूट झालेले भाऊ किंवा कधीही ना भेटलेले बाप आणि मुलगी वीस मिनिटात आपल्या अडचणी सोडवतात आणि आवडत्या पदार्थावर यथेच्छ ताव मारतात.’मिडनाईट डायनर : टोकियो स्टोरीज’च्या एका भागात एका सुप्रसिद्ध खाद्य समीक्षकाला त्याचा चेला डायनरमध्ये घेऊन येतो. नेहेमी पंचतारांकित हाटेलात जेवणारा समीक्षक या जागेकडे काहीश्या तुच्छतेने बघत असतो. मग एक गिऱ्हाईक येतं आणि बटर-राईस मागतं. बटर-राईस म्हणजे गरम भातावर लोण्याचा गोळा सोडायचा. लोण्यात मीठ असतं त्यामुळे वरून घालायची गरज नाही. वाटल्यास थोडं सोया सॉस. ते पाहून मी म्हणालो, “हा तर आपला तूप-भात!” ते गिऱ्हाईक ज्या तन्मयतेने तो बटर-राईस खातं ते पाहून समीक्षकाला जाग येते आणि तोही तीच डिश मागवतो.या दोन्ही मालिकांमध्ये जपानी संस्कृती, विशेषतः त्यांची आस्वाद घेण्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवते. आपली भारतीय खाद्यसंस्कृतीही समृद्ध आहे पण आपल्याकडे अशी मालिका किंवा चित्रपट बनल्याचे आठवत नाही. जर कुणी बनवलाच तर त्यात इतर फाफटपसारा इतका असतो की पदार्थाचा आस्वाद घ्यायचे कुठेतरी राहून जाते.

  • मिर्झापूर सिझन २

    ‘मिर्झापूर सिझन २’ चा पहिला भाग जरा कंटाळवाणा वाटला.

    तीच ती गुंडगिरी, प्रत्येक दोन शब्दानंतर माता-भगिनी स्मरण​, डास​-चिलटे मारावीत तशी माणसे मारणे – हे सगळे कथानकाच्या ओघात आले तर ठीक वाटते. हे सोडून दुसरे काही कथानकच नसेल तर कंटाळा यायला लागतो. एक भाग बघितला आहे आता बहुधा फास्ट फारवर्ड करून शेवटी कोण मरतो आणि कोण राहतो ते बघावे आणि मुक्ती मिळवावी.

    पुढचे भाग बघितल्यावर अगदी सोडून देण्याइतकी वाईट आहे असे वाटत नाही. अभिनय चांगला आहे त्यामुळे एकदा बघू शकतो. पण आधीचा मुद्दा आत्ताही ग्राह्य आहे. सगळ्या सीझनचा एकच हेतू आहे – बदला. त्यामुळे हिंसाचार अती झाला आहे. हिंसाचार असणेही गैर नव्हे पण​ तो कसा दाखविला आहे यावर बरेचसे अवलंबून असते. ‘गॉडफादर’ हा गुन्हेगारीवरचा अजरामर चित्रपट​. पण त्यात पडद्यावर फारच कमी हिंसा दाखवली आहे. तरीही तो परिणामकारक आहे. मिर्झापूरमधली हिंसा बटबटीत आहे त्यामुळे ती बघायचा कंटाळा येतो. उघड हिंसा कलात्मक रीतीने दाखवणे फार कमी लोकांना जमते. टेरेन्टीनोची ‘किल बिल‘ मालिका ठळक अपवाद.

    पंकज त्रिपाठी हा या मालिकेचा आधारस्तंभ. त्याचा अखंडा त्रिपाठी लक्षात राहतो. त्याची मुलाखत बघितल्यावर त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी किती समृद्ध हे लक्षात येतं.

    ‘गॉडफादर’वरून आठवले. सहाव्या एपिसोडमध्ये गोलू आणि गुड्डू बिहारमध्ये बोलणी करायला जातात तो प्रसंग गॉडफादरवरून जसाच्या तसा उचलला आहे. तिथे डॉन कोर्लिओने सोलोझ्झोबरोबर बोलणी करताना कोकेन व्यापाराला नकार देतो. इथे दद्दा अफीम व्यापाराला नकार देतो. आणि दद्दाचं पात्र ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या टायरियन लॅनिस्टर​वर बेतलेलं आहे.

    या सिझनची एक खासियत म्हणजे स्त्रियांना समान हक्क दिले आहेत​. त्यामुळे गुंडांबरोबर गुंडिणीही बघायला मिळतात​. (यक्ष : यक्षिणी, गुंड : गुंडिणी). ह्याआधी हे ‘सुबुर्रा : ब्लड इन रोम‘ या इटालियन मालिकेत बघितले होते.

  • माझे आवडते इटालियन पदार्थ

    . पहिला पदार्थ अर्थातच पिझ्झा. इटलीला जाण्याआधी मी डॉमिनोजचा पिझ्झा खाल्ला होता. इटलीला जो पिझ्झा मिळतो त्यात आणि डॉमिनोज पिझ्झामध्ये फारसं साम्य नाही. मला बहुतेक पिझ्झ्यांचं भारतीय रूप आवडत नाहीम्हणजे पनीर किंवा इतर भारतीय मसाले घालून केलेलं. इटालियन पिझ्झा दिसायला ओबडधोबड असतो, त्यात टॉपिंग नावाचा प्रकार नसतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पिझ्झा भट्टीत केलेला असतो त्यामुळे कधीकधी थोडासा जळालेला असतो. समजा म्याकडोनाल्डने झुणका-भाकरीची फ्रॅंचाईझ घेतली आणि निर्जंतुक वातावरणात यंत्राने भाकऱ्या केल्या तर त्यात आणि बायजाबाईने केलेल्या चुलीवरच्या भाकऱ्यांच्या चवीत जो फरक असेल तोच इथेही आहे. इटलीमध्ये प्रत्येक भागात मिळणाऱ्या पिझ्झाची चव वेगळी असते. नेपल्स ही पिझ्झाची जन्मभूमी. तिथला पिझ्झा अवर्णनीय असतो. बहुतेक वेळा इटालियन पिझ्झा कापू देत नाहीत त्यामुळे सुरीने आपल्यालाच कापावा लागतो.

    Neapolitan pizza
    नेपल्सचा पिझ्झा मार्गारिटा

    याखेरीज तिथे दुकानात पिझ्झाचे चतकोर तुकडेही विकतात. वेगवेगळ्या चवीचे दोन-तीन तुकडे घेतले तर मजा येते.

    २. इटलीच्या लिगुरिया भागात​ (पश्चिम इटली) फोकाच्या (Focaccia) नावाचा पदार्थ मिळतो. फोकाच्या हा ब्रेडचाच एक प्रकार आहे. पीठ, ऑलिव्हचं तेल आणि वेगवेगळ्या प्रकारचं मीठ. ताजा खाल्ला तर नरम, वाळलेलाही छान लागतो. हा सँडविचसाठीही वापरता येतो.

    Focaccia
    फोकाच्या

    ३. रिझोत्तो आल फुंगी (Risotto al funghi) म्हणजे मश्रूम आणि भात. इटालियन जेवणाचं एका वैशिष्ट्य म्हणजे मसाले फारसे नसतात त्यामुळे बहुतेक पदार्थ त्यांच्या मूळ चवीनुसार लागतात. इथे मश्रूम आणि कांदा ऑलिव्हच्या तेलात आणि/किंवा लोण्यात परतून घेतात. कधी थोडी व्हाइट वाईनही घालता. मग त्यात चिकन किंवा इतर ब्रॉथ घालून तांदूळ घालतात आणि शिजवतात. नंतर वरून पार्मेजान चीज.

    risotto al funghi
    रिझोत्तो आल फुंगी

    ४. तिरामिसु (Tiramisu). यात कॉफी, अंडी, साखर आणि मस्कारपोने चीज यांचं मिश्रण. मग वरून कोकोची पावडर पेरायची. मला गोड फारसं आवडत नाही पण तिरामिसु आवडतं.

    Tiramisu
    तिरामिसु

    ५. एखाद्या वाईनची चव कशी आहे हे नेमकं सांगण्यासाठी इग्रजीत खास वेगळे शब्द आहेत. मराठीत हे शब्द नसताना वाईनची चव सांगणं अशक्य आहे. मला दोन वाईन आवडतात – कियांती क्लासिको (Chianti Classico) आणि प्रिमितिव्हो (Primitivo). दोन्ही रेड वाईन आहेत.

    Chianti Classico
    कियांती क्लासिको (Chianti Classico)

    सर्व चित्रे विकी/गूगलवरुन साभार.