Author: Raj

  • … आणि हॅरी पॉटर मेला.

    पुस्तकांच्या दुकानात हॅरी पॉटरचा मराठी अनुवाद दिसला, उत्सुकतेने चाळायला घेतला आणि “जमीन फटने लगी, आसमान टूट पडा और हमारी आंखों के आगे अंधेरा छाने लगा.” असे व्हायचे कारण म्हणजे पुस्तक चाळताना आम्ही जे पान उघडले त्या पानावर नेमका हॅरी आणि व्होल्डेमॉर्ट यांच्यातील अंतिम सामना होता. व्होल्डेमॉर्ट हॅरीवर नेम धरतो आणि ओरडतो, “मृत्युदंश!”

    मृत्युदंश?मृत्युदंश?? हॅरीला त्याच्या आईच्या प्रेमाने संरक्षण दिले होते, पण त्याने जर हा शाप ऐकला असता तर बिचारा जागीच हाय खाऊन आईला भेटायला गेला असता. मृत्युदंश?

    अनुवाद करणारा किंवा करणारी यांच्यावरची जबाबदारी फार महत्वाची आणि नाजुक असते. मूळ कथेतील गाभ्याला कोणताही धक्का न लागू देता, त्या कथेतील संवाद आणि वर्णन आपल्या भाषेत आणायचे असते. इथे प्रत्येक तपशिलाचे रूपांतर करायचे किंवा नाही हा निर्णय क्रिकेटमधील नो बॉलप्रमाणे असतो. पाय थोडा पुढे गेला तर चालून जाते पण अर्ध्याहून अधिक पुढे गेला तर चालत नाही. मृत्युदंश हा सरळसरळ नो बॉल आहे.

    हॅरी राहतो लंडनमध्ये, बोलतो इंग्रजी आणि शाप देताना मात्र त्याच्या तोंडून संस्कृत शापवाणी बाहेर पडते? हे काय लॉजिक आहे? हॅरी पॉटरमधील मंत्र हे त्या कथानाकाचे अविभाज्य भाग आहेत. ते बदलणार असाल तर मग पुढे जाऊन हॅरी पॉटरचे हरी पाठक करा, त्याला मुंबईत आणा, दादरच्या शाळेत घाला (अभिनव जादूविद्यालय?), व्होल्डेमॉर्टचे विक्राळ विंचू (छकुला..छकुला..छकुला!) करा, त्याला धारावीमध्ये टाका. वाटच लावायची आहे तर सगळीच लावून टाका.

    मृत्युदंश हे ज्याचे रूपांतर आहे तो मूळ शाप अव्हादा केदाव्रा (Avada Kedavra) असा आहे. याचे मूळ आरेमैक भाषेत आहे. हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी बघितली तर रिड्डीक्युलस हा एकमेव मंत्र इंग्रजीमध्ये आहे. बाकी बहुतेक सर्व मंत्र लॅटीन किंवा इटालियन भाषांमधून घेतलेले आहेत. फिनिते इनकंटाटम, इंपेडिमेंटा, प्रोतेगो, एक्सपेलियार्मस. रोलिंगबाईंनी असे का बरे केले असेल? त्यांना इंग्रजी भाषेत मंत्र तयार करणे अवघड होते का?

    रोलिंगबाईंनी असे केले याचे कारण त्यांची विविध भाषांची जाण सखोल आहे.

    इंडो-युरोपियन भाषांमध्ये लॅटीनमधून आलेल्या रोमान्स भाषा (इटालियन, फ्रेंच, स्पॅनिश, पोर्तुगीझ, रोमानियन आणि कातालान या मुख्य भाषा) आणि जर्मेनिक भाषा (इंग्रजी, जर्मन, स्विडीश, डॅनिश) असे दोन प्रमुख गट पडतात. या दोन गटात अनेक फरक आहेत, त्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे रोमान्स भाषा, विशेषत: इटालियनमध्ये प्रत्येक शब्दात स्वरांची रेलचेल आहे. ‘के सरा सरा’ गाताना स्वर कितीही वेळ लांबवता येतो. ऑपेराचा जन्म इटलीमध्ये झाला हा अपघात नव्हता, त्याला इटालियन भाषेचा मधुर स्वभाव कारणीभूत होता. याउलट जर्मनसारख्या भाषेत व्यंजनांचा सुळसुळाट आणि तीही इंग्रजीत ज्याला ‘हार्ड’ म्हणतात तशी कठीण व्यंजने. यामुळे जर्मन भाषेत स्वर लांबवता येणे शक्यच नाही, ही खटक्यांची भाषा आहे. परिणामत: जेव्हा जर्मन लोकांनी इटालियन ऑपेरा आपल्या मातृभाषेत नेला तेव्हा त्यांना ते करताना मूलभूत बदल करावे लागले. इटालियन ऑपेरा गाणी आणि गायक यांच्यावर विसंबून असतो, जर्मन ऑपेरामध्ये ते शक्य नव्हते म्हणून वाद्यवृंदाला अधिक महत्व प्राप्त झाले. मोझार्ट आणि वॅग्नर यांच्या ऑपेरांमध्ये जमीन-अस्मानचा फरक आहे त्याचे मूळ या दोन भाषांच्या वेगळ्या स्वभावामध्ये आहे.

    जर्मन लोकांनी इटालियन ऑपेराची नक्कल करून त्यांच्या ऑपेरात तसेच गायचे ठरवले असते तर काय झाले असते? त्यांचा मृत्युदंश झाला असता. अव्हादा केदाव्रा या दोन्ही शब्दांचा शेवट आ मध्ये होतो. म्हणून व्होल्डेमॉर्ट ‘अव्हादाsssss केदाव्राsssss’ असे ओरडतो तेव्हा त्याला शेवटचा आ कितीही वेळ लांबवता येतो. ज्याच्यावर कोणताही उपाय नाही असा शाप म्हणायची पद्धतही तितकीच प्रभावी असायला हवी. असे ‘मृत्युदंश’मध्ये करून बघा करता येते का? एकतर या शब्दामध्ये कठीण व्यंजने आहेत, स्वरांचा पत्ता नाही आणि शेवटचा श संपला की पुढे काही नाही. हा शाप न वाटता रेलवे स्टेशनवर ‘दोन दादर’ असे म्हटल्यासारखे वाटते. इतर शापांची काय वाट लावली आहे हे बघण्याचे धैर्य झाले नाही हे इथे नमूद करावेसे वाटते.

    नवीन शब्द शोधताना संस्कृतकडे धावणे या अगम्य सवयीची परिणिती मृत्युदंशमध्ये झाली आहे. आपली भाषा म्हणजे २४ क्यारट सोन्यासारखी शुद्ध, त्यात परकीय शब्द म्हणजे भेसळ असे समज जोपर्यंत कायम आहेत तोपर्यंत असेच होत रहाणार. खरे तर संपूर्णपणे लोकशाही पद्धतीने चालणार्‍या ज्या काही थोड्या पद्धती अस्तित्वात आहेत त्यात भाषा येतात. मारून मुटकून भाषेचा प्रवाह बदलण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे एकही उदाहरण इतिहासात नाही. १९८४ सारखे ‘थॉट पोलिस’ असतील तर गोष्ट वेगळी पण प्रत्यक्षात असेही प्रयत्न टिकत नाहीत हे १९९१ मध्ये दिसलेच.

    शेक्सपियर किंवा तुकाराम यांनी भाषेला भरपूर दिले, समृद्ध केले पण हे करताना त्यांचा हेतू भाषा सुधारणे हा नव्हता. त्यांनी भाषा हे संवादाचे एक माध्यम आहे हे जाणले आणि त्यात गरज पडली तसे बदल केले. ते करण्याची प्रतिभा त्यांच्याकडे होती. एका भाषेतील शब्दा-शब्दामागे त्या समाजाचे आर्थिक, सामाजिक, नैतिक संचित उभे असते. लोकांमुळे भाषा घडते, हस्तिदंती मनोर्‍यात बसून तिचे स्वरूप कसे असावे हे ठरवणारे पंडित भाषेचे स्वरूप ठरवत नाहीत, ठरवू शकत नाहीत. म्हणूनच प्रत्येक भाषेच्या व्याकरणाच्या नियमांमध्ये अपवादच जास्त असतात. ‘यू वॉज’ न होता ‘यू वेअर’ होते. लोक जशी भाषा वापरतात तसे व्याकरणाला बदलावे लागते आणि यामुळेच प्रत्येक भाषेला तिचा स्वभाव येतो. नाहीतर कोबोलपासून जावापर्यंत दिले ते काम चोख करणार्‍या भाषा आहेतच की. पण त्या भाषांमध्ये ‘जब कि तुझ बिन कोई नही मौजूद, फिर ये हंगामा ऐ खुदा क्या है?’ लिहीता येईल का? भाषा प्रवाही असते. नायगाराला (किंवा तेवढेही परकीय उदाहरण नको असेल तर गंगा) बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला तर बांध फोडून तो कुठूनही बाहेर पडतो.

    हॅरी पॉटर कधी मेला या प्रश्नाचे उत्तर आहे, ‘मृत्युदंश ऐकल्यावर.’

    —-

    तळटीपा

    [१] गेल्या हजार वर्षात इंग्रजी भाषेचे स्वरूप किती बदलले याचे उदाहरण रोचक आहे. हजार वर्षात परकीय शब्द, व्याकरण यांचा अर्थ किती संकुचित होतो हे इथे दिसते.

    1000 AD:

    Wé cildra biddaþ þé, éalá láréow, þæt þú taéce ús sprecan rihte, forþám ungelaérede wé sindon, and gewæmmodlíce we sprecaþ…

    2000 AD:

    We children beg you, teacher, that you should teach us to speak correctly, because we are ignorant and we speak corruptly…

  • द आयर्न लेडी

    चित्रपट बघताना अपेक्षा ठेवू नयेत हेच बरं म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. तरीही चित्रपटाचं नाव, कलाकार यांच्याबद्दल कळल्यानंतर नकळत काही अपेक्षा निर्माण होतातच. चित्रपटानं त्याही पूर्ण केल्या नाहीत तर मात्र विरस होतो. अर्थात हे गणित इतकं सरळ नसतं. बरेचदा दिग्दर्शक काही तरी वेगळंच सांगायचा प्रयत्न करत असतो आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचतच नाही.

    The Iron Lady movie poster

    ‘द आयर्न लेडी’ हा मार्गारेट थॅचर यांच्यावर आधारित चित्रपट.  ‘आयर्न लेडी’चे निर्माते ब्रिटीश आहेत, याचा एक फायदा म्हणजे चित्रपटात बराच वेळ शांतता आहे. तरीही जिथे पार्श्व संगीत दिलं आहे तिथंही बरेचदा अति झाल्यासारखं वाटतं. थॅचर यांचं आत्मचरित्र वाचलेलं नाही त्यामुळे चित्रपटात दाखवलेल्या घटना कितपत वास्तवाला धरून आहेत याची कल्पना नाही. (पुस्तक यादीत टाकलं आहे पण तो हजार पानांचा ठोकळा आहे त्यामुळे त्याला वेळ लागेल.)

    पटकथा हा या चित्रपटाचा सर्वात मोठा शत्रू आहे. चित्रपट सुरू होतो वर्तमानकाळात आणि मग फ्लॅशबॅकने याची कथा उलगडत जाते. हे ठीक आहे, बर्‍याच चित्रपटात असं केलय. पण एकदा भूतकाळात गेलो की किती वेळा परत यायचं आणि जायचं याला काही मर्यादा? इथे होतं काय की सध्याच्या थॅचर घरात फिरत असताना प्रत्येक वस्तू बघतात, मग त्या वस्तूशी निगडीत भूतकाळाचा तुकडा त्यांना आठवतो. हे आठवणं अर्थातच क्रमवार होतं आणि त्यामुळं अधिक कृत्रिम वाटतं. थॅचर यांच्या कारकीर्दीतील महत्वपूर्ण घटनांचेही काही तुकडे दाखवले आहेत, नंतर गाडी परत वर्तमानकाळात भोज्ज्याला शिवायला येतेच. मग प्रश्न पडतो की दिग्दर्शिकेचा फोकस काय आहे? सध्या थॅचर आजारी असतात, त्यांना बरेचदा विस्मृती होते. वर्तमानकाळावर फोकस ठेवल्यामुळे थॅचर यांची सध्याची परिस्थिती हाच चित्रपटाचा केंद्रबिंदू बनून जातो. त्यामुळे हा एका महत्वपूर्ण व्यक्तीमत्वाच्या कारकीर्दीवरचा चित्रपट आहे असं न वाटता ‘एकेकाळी शक्तीशाली असणार्‍या बाईला सध्या काय दिवस काढावे लागत आहेत, हाय रे ये फूटी किस्मत!’ असं दाखवणारा चित्रपट होऊन जातो. पैकी त्या राजकारणात आल्या तेव्हा स्त्रिया आणि राजकारण म्हणजे मासा आणि सायकल अशी परिस्थिती होती. या काळात त्यांना करावा लागलेला संघर्ष चांगला दाखवला आहे, पण इथेही तुकडे-तुकडे असल्याने एकसंध परिणाम साधता येत नाही. सुरूवात करूण, नंतर मध्येच थॅचर पंतप्रधान होण्याची तयारी करत असताना हलकंफुलकं वातावरण, मग परत वतमानकाळात करूण. यामुळे दिग्दर्शिकेला चित्रपटाचा टोन कसा ठेवायचा आहे हे स्पष्ट होत नाही. असं केल्यामुळे थॅचर यांच्यासारख्या चतुरस्त्र आणि धडाडीच्या व्यक्तीमत्वाला चित्रपट न्याय देऊ शकत नाही. असंच दिग्दर्शिकेला दाखवायचं असेल तर ठीके. पण मग त्याला थॅचर कशाला हव्यात, कुणीही चाललं असतं की!?

    फ्लॅशबॅक अनेक दिग्दर्शकांनी परिणामकारक रीत्या वापरला आहे. एक चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे गांधी. संपूर्ण चित्रपट फ्लॅशबॅकमध्येच होतो पण कुठेही संगती खंडित होत नाही. थॅचर यांच्या आयुष्यातही ‘सिनेमॅटीक’ म्हणाव्यात अशा भरपूर घटना होत्या. त्यांचा राजकारणात प्रवेश, त्यासाठी प्रेरणा ठरलेल्या व्यक्ती, त्यांचे सहकारी, लोकशाहीकडून एकाधिकारशाहीकडे झालेला त्यांचा प्रवास, आयर्लॅंडच्या स्वातंत्र्याचा प्रश्न, फोकऍंडवरून अर्जेंटिनाशी झालेले युद्ध – अशा कितीतरी घटना प्रभावीपणे मांडता आल्या असत्या. पण इथे दिसतं काय तर आताच्या थॅचर सुपरमार्केटमध्ये दूध आणायला जातात आणि त्यांना कुणीच ओळखत नाही. किंवा स्वत:ची कपबशी स्वत:लाच विसळावी लागते आहे. हे म्हणजे सचिन तेंडुलकरवर चित्रपट काढायचा, त्यात ७०-८०% वेळ तो मॉडेलिंग करतोय, कार विकत घेतोय असं दाखवायचं आणि मधून मधून त्याच्या म्याचेसचे तुकडे दाखवायचे. मान्य आहे, सचिन या इतर गोष्टीही करतो पण महत्वाचं काय?

    काही दिग्दर्शक व्यावसायिक अभिनेत्यांना मुद्दामहून टाळतात. निओरिअलिझ्म चळवळीतील इटालियन दिग्दर्शक व्हित्तोरियो डि सिका हे यातलं महत्वाचं नाव. बायसिकल थीव्ह्ज मध्ये निर्मात्यांच्या विरोधांना न जुमानता त्याने अभिनयाचे कुठलेही प्रशिक्षण नसणारे लोक घेतले आणि चित्रपट यशस्वी करून दाखवला. याचं दुसरं टोक म्हणजे यक्ष्ट्रा कलाकारही व्यावसायिक अभिनेतेच हवेत असा हट्ट धरणारे काही दिग्दर्शक. हॅरिसन फोर्डच्या ‘द फ्युजिटिव्ह‘ चित्रपटात शेवटी हाटेलात जो कॉन्फरन्सचा प्रसंग आहे त्यात बसलेले सर्व प्रेक्षकही व्यावसायिक अभिनेते आहेत. बरेच दिग्दर्शक या दोन टोकांचा सुवर्णमध्य निवडतात. गॉडफादरमध्ये कपोलाने महत्वाच्या भूमिकांसाठी व्यावसायिक अभिनेते निवडले, पण किरकोळ भूमिका चक्क आपल्या नातेवाईकां दिल्या. सुरूवातीच्या लग्नाच्या प्रसंगातील बरेच लोक त्याच्या घरची मंडळी आहेत तर कोनीची भूमिका करणारी अभिनेत्री त्याची सख्खी बहीण आहे. याचं मुख्य कारण म्हणजे गॉडफादर १ चं बजेट अत्यंत कमी होतं, स्टूडियोचा कपोलावर अजिबात भरवसा नव्हता आणि चित्रपट कधी बंद पडेल याचा नेम नव्हता . गांधी, थॅचर अशा ऐतिहासिक भूमिका असोत किंवा रोजच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या भूमिका – रेन मॅन मधला डस्टीन हॉफमन किंवा ‘डेड मॅन वॉकिंग’मधला विषारी इंजेक्शनची वाट बघणारा शॉन पेन हा कैदी आणि त्याला दिलासा देणारी सूझन सॅरॅंडन ही सिस्टर यांची अंगावर काटा आणणारी कथा – अशा वेळी व्यावसायिक अभिनेत्यांना पर्याय नाही असं वाटतं .

    अशी निराशा झाली तर मी बरेचदा चित्रपट किंवा पुस्तक अर्ध्यातून सोडून देतो. किंवा फाष्ट फारवर्ड करून शेवटी काय होतं ते बघतो. (लाइफ इज टू शॉर्ट टू वेस्ट ऑन यू – साइनफेल्ड.) इथं मात्र तसं नाही केलं कारण एकच. मेरिल स्ट्रीप. हिच्याबदल जिम कॅरी एकदा म्हणाला होता, ‘देअर इन नो बॅड फिल्म ऑन धिस वुमन.’ यात अतिशयोक्ती असेल कदाचित पण सत्याचा अंशही बराच आहे. पटकथेने पांढरं निशाण दाखवल्यानंतर या बाईनं एकटीनं सगळा चित्रपट तारून नेला आहे. मेरिल स्ट्रीपच्या अनेक गुणांपैकी एक म्हणजे कोणत्याही प्रकारचे उच्चार ती लिलया आत्मसात करते. इथेही ब्रिटीश इंग्लिश बोलताना ही बाई अमेरिकन आहे असा संशयही येत नाही. ही भूमिका तिचा कस पाहाणारी होती आणि ती या कसोटीवर पुरेपूर उतरली आहे.

    तळटीपा :
    [१] गॉडफादरचे अनेक किस्से ऐकायचे असले तर त्याच्या ‘डायरेक्टर्स कट डीव्हीडी’ मधली कपोलाची कमेंट्री ऐका. सुरूवातीला ब्रॅंडोच्या मांडीवर जे मांजर आहे, ते असंच सेटवर फिरत होतं. शॉट घ्यायच्या आधी कपोलानं काही न बोलता ते ब्रॅंडोच्या मांडीवर ठेवलं, ब्रॅंडोनं अजिबात न बिचकता मांजरासकट शॉट दिला. टॉम हेगनला ओलिस ठेवतात त्या प्रसंगाच्या वेळी वादळ सुरू होतं, हवा इतकी खराब होती की शूटींग होईल की नाही याची खात्री नव्हती. शेवटी सोसाट्याचा वारा, बर्फ यांच्यासकट कपोलानं शूटिंग केलं. नंतर तेच वातावरण प्रचंड परिणामकारक ठरलं. अशा अनेक तडजोडी ऐकल्या आणि पाहिल्यावर अप्रतिम कलाकृती १००% परिपूर्ण असावी लागते हा गैरसमज दूर होतो.

    [२] हे विषयांतर होतय हे मान्य आहे. पण कारण म्हणून कणेकरांचा एक किस्सा. लता मंगेशकर एका गायिकेच्या कॅसेट उद्घाटनाला गेल्या होत्या. तिथं बोलताना त्यांनी ती गायिका घर सांभाळून गाणी गाते वगैरे कौतुक केलं, तिच्या गाण्याविषयी काही बोलल्या नाहीत कारण बोलण्यासारखं काही नव्हतंच. इथेही मेरिल स्ट्रीप सोडून बाकी काही बोलण्यासाखं नाही.

  • महात्मा बसवेश्वर आणि बेन यिशु

    प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे ‘प्रेरणा’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. पुस्तक मुलांसाठी आहे. प्राचार्यांच्याच शब्दात हे पुस्तक म्हणजे पराक्रमांच्या शिखरांचे दर्शन आहे. यातील आइनस्टाइन, मेरी क्युरी पासून टॉलस्टॉय आणि कार्ल मार्क्सपर्यंत बरीच नावे सर्वश्रुत आहेत. इंदिरा गांधीसारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्वांचाही यात समावेश आहे. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीबद्दल लिहीताना प्राचार्यांना थोडी कसरत करावी लागली आहे असे जाणवते. प्राचार्यांची इंदिराजी आणि त्यांची कारकीर्द याबद्दलची परखड मते काय असतील आणि प्रोत्साहनपर ओळख करून द्यायची असे बंधन नसते तर त्यांनी हा परिचय कसा करून दिला असता असा एक विचार मनात येऊन गेला. असा लेख वेगळा झाला असता असे मानायला जागा आहे कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिचय करून देताना, आपल्या विशेष जिव्हाळ्याच्या अशा शिक्षणक्षेत्राबद्दल बोलताना प्राचार्य म्हणतात, “अकारण चार-दोन महाविद्यालये काढणे हा काही मंडळींचा छंद आहे. त्यांना त्यामुळे सहज शिक्षणमहर्षी पद मिळण्याची शक्यता वाढते.”

    तर पुस्तकातील बहुतेक सर्व नावे ओळखीची होती, काही अतिपरिचयाची तर काही त्या मानाने कमी परिचयाची. मात्र एका नावापाशी अडखळायला झाले. हे नाव शाळेत इतिहासाचा अभ्यास करताना कानावर पडले असेल तर माहीत नाही. (आणि पडले असेल तर विस्मरण होण्यास कारण शाळेतील वातावरण की आमची अभ्यासाविषयीची अनास्था हे ही माहीत नाही.) हे नाव होते महात्मा बसवेश्वर (इ. स. ११३१ ते इ. स. ११६१) यांचे. आपल्या देशात संत, महात्मा यांची कमी नाही. आजच्या काळात गूगल पांडित्यामुळे हवी ती माहीती चुटकीसरशी उपलब्ध आहे. बहुतेक वेळा कुणी नवीन विचार मांडला तर त्यामागे चौफेरवाचन आहे हे जाणवते पण त्यात मनन किंवा विचारमंथन असेलच अशी खात्री नसते. ‘कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन’ – माहितीचे साठवण ही एक गोष्ट झाली आणि माहितीचा उपयोग करून त्यातून नवीन विचार मांडणे ही दुसरी गोष्ट झाली. एक करण्यासाठी स्मरणशक्ती पुरेशी असते, दुसर्‍या गोष्टीसाठी प्रतिभा लागते. ज्या काळात कुणी मेल्याची बातमी यायलासुद्धा महीने-वर्ष लागत असे, त्या काळात माहितीचे स्त्रोत फारच कमी होते. ‘सर्व माणसे सारखी, सर्व व्यवसाय समान योग्यतेचे, सगळ्या जाती समान. वर्णभेद, जातिभेद हे अनैसर्गिक आहेत. मठांची उठाठेव आवश्यक नाही.’ हे विचार आज आपल्याला फारसे क्रांतिकारी वाटणार नाहीत, पण बाराव्या शतकात हे विचार किती आधुनिक होते हे लक्षात आल्यावर महात्मा बसवेश्वर यांचे वेगळेपण विशेष जाणवते आणि त्यांची ओळख इतक्या उशिरा झाल्याबद्दल खंतही वाटते.

    लोकांनी तत्वचिंतन आणि आत्मशोधन करावे हा हेतू मनात धरून बसवेश्वर यांनी ‘अनुभव मंडप’ या विद्यापीठाची स्थापना केली. ज्या काळात विद्यार्जन ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, त्या काळात अनुभव मंडपामध्ये चांभार, लोहार, सुतार, व्यापारी हे सर्व लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करीत होते. स्त्रीशिक्षण हा विचार ज्या काळात लोकांच्या कुवतीबाहेर होता तेव्हाच इथे नगम्मा, सत्यक्का अशा अनेक स्त्री सभासद होत्या. आंतरजातीय विवाह इथे खुलेपणाने होत होते. ‘कायक वे कैलास’ – कायेने आचरलेले व्यवसायकर्म निष्ठेने करावे – हे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनसूत्र होते. ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्याप्रमाणेच बसवेश्वर यांनी कवितेमधून समाजसुधारणा केली. त्यांनी कन्नडमध्ये लिहीलेल्या या कविता ‘वचन साहित्य’ या नावाने ओळखल्या जातात. समाजसुधारक, विचारवंत आणि साहित्यिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या महात्मा बसवेश्वर यांना कर्नाटकाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.

    योगायोगाने बाराव्या शतकातील जीवनावर आधारित आणखी एक पुस्तक नुकतेच वाचनात आले ते म्हणजे अमिताव घोष यांचे ‘इन ऍन ऍंटीक लॅंड’. हे पुस्तक म्हणजे खरेतर मानवशास्त्रावरील एक निबंध आहे पण एखादा चित्रकार साधी घराची भिंत रंगवतानाही त्यात आपला वेगळा ठसा उमटवून जाईल तसेच अमिताव घोष यांनी त्यांची साहित्यिक प्रतिभा वापरून या निबंधाला एक वेगळे रूप दिले आहे. अमिताव घोष ऑक्सफर्डमध्ये मानवशास्त्रामध्ये पी. एच. डी करत असताना संशोधनासाठी त्यांना इजिप्तमध्ये काही काळ घालवावा लागला. या पुस्तकात त्यांनी आपले संशोधन आणि इजिप्तमध्ये आलेले अनुभव यांची सुरेख गुंफण केली आहे. यामुळे पुस्तक तथ्यांची माहिती असलेला एक रूक्ष निबंध न राहता त्याला भावनिक मिती प्राप्त होते.

    पुस्तक आहे अब्राहम बेन यिशुबद्दल. बेन यिशु हा ट्युनिशियामध्ये जन्माला आला, मात्र नंतर इजिप्त, भारत, येमेन इ. ठिकाणी त्याने प्रवास आणि वास्तव्य केले. भारतात त्याचा मुक्काम मंगलोर इथे होता. बेन यिशु याने इ. स. ११३२ मध्ये मंगलोरमधून लिहीलेले एक पत्र घोष यांना योगायोगाने मिळाले आणि नंतरची काही वर्षे त्यांनी भारतात वास्तव्य केलेल्या या व्यापार्‍याची पत्रे शोधणासाठी रशिया, अमेरिका, इंग्लंड इ. ठिकाणी जाऊन पुराणवस्तूसंग्रहालय आणि विद्यापीठांमध्ये शोध घेतला. या पत्रांमधून आणि त्याच्या अनुषंगाने त्यावेळची भाषा, समाज, रीती इ. लक्षात घेऊन घोष बेन यिशुच्या आयुष्याचे एक चित्र उभे करतात. बेन यिशु मंगलोरला आल्यावर त्याने आशु नावाच्या एका भारतीय गुलाम स्त्रीला विकत घेतले, गुलामगिरीतून मुक्त केले आणि नंतर तिच्याशी विवाह केला. बेन यिशुने इजिप्त आणि आसपासच्या इतर व्यापार्‍यांना पाठवलेल्या पत्रांमधून त्या काळातील मंगलोरमधील औद्योगिक उलाढालींची कल्पना येते.

    याला समांतर असे कथानक घोष यांच्या इजिप्तमधील वास्तव्याचे. त्यांना तेथे ‘दोक्तोर-अल-हिंद’ – भारतीय डॉक्टर अशी हाक मारत असत. इजिप्तमधील तेव्हाचे तरूण इराकमध्ये जाऊन पैसे कमवण्याची स्वप्ने पहात होते. इराक म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्ग होता. घोष १० वर्षांनी परत गेले तेव्हा त्यांना आठवत असलेली बरीचशी मुले इराकमध्ये मिळेल त्या कामावर गेली होती, पहिले इराक युद्ध सुरू असल्याने इराकमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा होता. त्यामुळे आलेल्या सुबत्तेच्या खुणा त्यांच्या घरात दिसत होत्या. इजिप्तमधील कट्टर मुस्लीम संस्कृती, त्यांचे हिंदूंविषयीचे गैरसमज आणि त्यामधून उद्भवणार्‍या कधी गमतीदार तर कधी गंभीर अडचणी हे सर्व नोंदतानाही त्यांच्यातील मानवशास्त्रज्ञ दक्ष असल्याचे जाणवते.

    जवळजवळ दोन टोकाच्या दोन पुस्तकांमधून आठ-नऊशे वर्षांपूर्वी राहणार्‍या एकाच राज्यातील दोन व्यक्ती भेटाव्यात हा योगायोग रोचक वाटला, म्हणून हा लेखन प्रपंच.

  • फेसबुक – हळव्या भावनांच्या हळव्या आविष्काराची हळवी अभिव्यक्ती

    हाय फ्रेंड्स,
    मी नीना हळवे. सकाळी उठल्याबरोबर मी सगळ्यात आधी काय करत असेन तर फेसबुकवर लॉगैन होते. माझ्या स्टेटसला किती फ्रेंडसनी लाइक केले, कोण वीकेंडला काय करणार आहे, कुणाचा ब्रेक अप झाला इतक्या सगळ्या न्यूज असतात. फेसबुक माझ्या रूटीनचा इंपॉर्टंट भाग बनले आहे हे नक्की. माझ्या रेग्युलर फेसप्रमाणेच माझा व्हर्चुअल फेसही फ्रेश असावा याची मी काळजी घेते.

    पण फेसबुकवरचे सगळे फ्रेंड्स चांगले आहेत असे नाही बर का? बरेचदा रिअल फ्रेंडस फार कमी असतात आणि व्हर्चुअल फ्रेंडस जास्त. पण काय करणार? तुमची फ्रेंड लिस्ट किती मोठी यावरून तुमचे स्टेट्स ठरते ना!

    तुम्हाला फार्मिंग करायला आवडते का? मग आता त्यासाठी हात मातीत डर्टी करायची गरज नाही. कारण फेसबुकने व्हर्चुअल शेती तुमच्या घरात आणली आहे. फार्मव्हिले या गेमचे सध्या जगात ३८२९८७४ युझर्स आहेत.

    फेसबुकमुळे आपल्या रोजच्या जीवनात किती बहार आलीये म्हणून सांगू. हेच पहा,

    मुलगी : डाड, इथे आल्यापासून कपड्यांच्या घड्या मलाच कराव्या लागतात. हात दुखतायत.
    डाड : अगं तू गेल्यापासून घर आवरलच नाही, सगळं कसं जागच्या जागी, व्यवस्थित आहे.

    एका बापलेकीचा दोनच ओळींचा संवाद. पण यातून त्यांच्या हळव्या अनुभवविश्वाची झलक बघायला मिळते.

    आणि हे फक्त मराठीपुरतेच नाही काही. या हळव्या भावना भाषा, धर्म यांची कुंपणे जंप करून जातात. हे दुसरे उदाहरण पहा.

    जमिला : अब्बाजान, तुम्हारे हाथ का बैदा खानेकू जी करता हय.
    अब्बाजान : तू गई तबसे बनायाच नै.

    किती हळवे आहेत हे आविष्कार. पण याचबरोबर याला एक काळीकुट्ट कुळकुळीत बाजूही आहे बरं का!!. फेसबुकवर तुमची माहिती सुरक्षित नाही! तुमच्या पपी पूकीचे स्टमक अपसेट आहे किंवा तुमच्या बेस्ट फ्रेंडला तुम्ही अनफ्रेंड केले यासारखी अमूल्य माहिती लोकांच्या हातात पडू शकते!! तेव्हा जरा जपून!!!

    पण काही असो, फेसबुकमुळे आपण एकमेकांच्या जवळ आलो आहोत हे नक्की.

    —-

    ओ हळवे काकू, तुमचे हळवे पुराण संपले का नै? — सुशांत पवार, ठाणे

    हाय नीना, फालतू कमेंट्सकडे लक्ष देऊ नको. फार सुंदर लेख. वपुंची आठवण आली. — स्मिता जोशी, दहीसर.

    अगदी खरे आहे. श्रीमती हळवे यांनी आधुनिक जगतातील एका महत्वाच्या घडामोडीचा उहापोह केला आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात दोन घटका विरंगुळा मिळणे शक्य झाले आहे ते या आधुनिक तंत्रज्ञानामुळेच. या अभूतपूर्व शोधामुळे श्री. मार्क झुकेरबर्ग हे आइस्टाइन, स्टीफन हॊंकिंग यांच्या रांगेत जाऊन बसले आहेत याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही. — त्रिं. स. लेले (रिटायर्ड), पुणे.

    ओ लेले काका, काही काय? आइनस्टाइन कुठे, झुक्या कुठे? आइनस्टाइनचे टेबल पुसायची तरी लायकी आहे का त्याची? — सनी

    सनी, जाऊ दे ना भौ, फुल्ल टू टैमपास चालू आहे इथे. संध्याकाळी आहेस का सॅमच्या पार्टीला? — विकी

    काय नं एकेक लोक. इतक्या इंटेन्स लेखाच्या चर्चेत पर्सनल मॅटर्स डिस्कस करतात. सो इरिटेटींग. — पूजा

    ओ पूजा काकू, तुम्हाला हवे तर तुम्ही या पार्टीला. उगीच टेंशन कशाला घेताय? — सनी

    आजच्या डिजिटल युगामध्ये अनवट भावनिक आंदोलनांची कनवट मखमली पैरण हलक्या हातांनी उलगडून दाखवणारा सनवट लेख. मनातील हळव्या आविष्कारांचा धांडोळा घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत व्हावी यातील
    विरोधाभास रोचक आहे. इथे मुराकामी आठवला. विंड अप बर्ड क्रॉनिकलचा नायक अशाच प्रकारच्या आंदोलनातून गेल्यावर त्याच्या सुप्त भावनांचा आविष्कार त्याला भौतिक जगतात अनुभवास येतो. अधिक माहिती इथे. (पाच लिंका) — आरागॉर्न

    आरागॉर्न भौ, मराठीत सांगा न काय ते. खिक खिक.. — विशाल

    विश्या, स्कोअर काय झाला रे? – अभि

    FACEBOOK IS SO AMAZING. I LUUUUV IT. — PAYAL.

    फेसबुकच्या डिजिटल फेसमुळे माणुसकीचा चेहेरा हरवत चालला आहे. — जयंत अहिरे, हडपसर.

    खुप चान महीति दिली. मला मराथी तायपिम्गची सवै नाइ त्यामुले चूका होतात. — सदाशीव

    श्री. मार्क झुकेरबर्ग अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एक जागतिक क्रांती घडवून आहेत. याच प्रकारची क्रांती १९३० च्या दशकात प्लांक, हायसेनबर्ग यांनी घडवून आणली होती. यासाठी त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीले जाईल. — त्रिं. स. लेले (रिटायर्ड), पुणे.

    Whats’ really important here is that the user should be aware
    of the privacy concerns and their local as well as global implications. Unfortunately, most of the common users do not have the slightest idea about privacy protocols and their implementation
    strategies. This unfortunate fact is exploited by the greedy corporate
    giants such as Facebook and Google to make profits. We will be
    adressing these issues with special emphasis on the LDAP9A protocol in the upcoming version of Microsoft Edge. — Amit, Microsoft, Redmond.

    ithe marathit kase lihitat? mala sangal ka please? — Sayali

    सायली काकूंना बालवाडीत घाला रे कुणीतरी.. खिक — विशाल

    Dude, that protocol has long been scrapped. Microsoft sucks! LOL! — Jayant, CA.

    फेसबुकवर तुमची माहिती सगळ्यांना कळते का? बापरे, भीतीदायकच प्रकरण दिसते. — सौ. अंजली