Author: Raj

  • विनोदनिर्मितीच्या टोकांचा प्रवास : माइक मायर्स आणि ऑस्टीन पॉवर्स मालिका

    रॉबिन विलियम्स एका मुलाखतीत म्हणाला होता, “एखादी गोष्ट विनोदी असते किंवा नसते. यात मधले काही असत नाही. ऍंड इफ इट्स नॉट फनी, देन इट्स अ व्हॉइड.” मग स्टीफन हॉकिंग्जच्या आवाजात, “इव्हन हॉकिंग्ज वुड से, इट्स अ व्हॉइड.” (इथे थांबला तर तो रॉबिन विलियम्स कसला? नंतर – व्हेन यू कॉल हॉकिंग्ज, “धिस इज स्टीफन हॉकिंग्ज”, “आय वुड लाइक टू लीव्ह अ मेसेज..” “नो, धिस इज स्टीफन हॉकिंग्ज.” वगैरे.)

    बरेच विनोदप्रकार आपल्याकडे फारच अभावाने हाताळले जातात किंवा अजिबातच नाही. प्रसिद्ध चित्रपटांचे विडंबन हा त्यातलाच एक प्रकार.
    पाश्चात्य चित्रपटांमध्ये हा प्रकार बराच लोकप्रिय आहे. गॉडफादरवरून बनवलेला स्लाय स्टॅलोनचा ऑस्कर किंवा अपोकॅलिप्स नाऊ, प्लॅटून यावरून बनवलेली हॉट शॉट मालिका असे चित्रपट मनमुराद हसवतात. माइक मायर्सची ऑस्टीन पॉवर्स ही मालिका याच पठडीत बसते.

    विनोदी कलाकारांचे विनोद आणि त्यांचे प्रकार पाहून त्यांच्या क्षमतेबद्दल अंदाज बांधता येतो. वूडी ऍलनचे विनोद ‘सेरेब्रल’ प्रकारात मोडतात तर मार्क्स बंधू कोट्या करण्यात पटाइत. (लेखन, दिग्दर्शनापासून जॅझ वादनापर्यंत सर्व क्षेत्रांमध्ये कार्यरत असणार्‍या वूडी ऍलनची ओळख केवळ विनोदी कलाकार अशी करून देणे हा त्याच्यावर घोर अन्याय आहे याची जाणीव आहे.) माइकच्या बाबतीत या प्रश्नाचे उत्तर सहजासहजी मिळत नाही किंबहुना उत्तर मिळेलच याचीही खात्री नाही. ऑस्टीन पॉवर्स मालिकेत त्याचे विनोद अत्युत्तम ते अत्यंत टुकार अशा सर्व पातळींमध्ये मुक्त संचार करीत असतात. त्यातही टुकार विनोद करताना माइकची खरी पातळी यापेक्षा वर आहे आणि टुकार विनोद हा त्याच्या एका पात्राचा विनोदनिर्मिती करण्याचा दुबळा प्रयत्न आहे हे लक्षात आल्यावर प्रेक्षक हसावे किंवा नाही अशा गोंधळात पडतात. पण त्याला फारसा वेळ मिळत नाही कारण लगेच पुढच्या मिनिटाला नवीन विनोद/कोटी तयार असते.

    ऑस्टीन पॉवर्स मालिका जेम्स बॉंड चित्रपटांचे विडंबन आहे. ऑस्टीन पॉवर्स हा बॉंडप्रमाणेच ब्रिटीश एजंट आहे आणि त्याचा ठरलेला शत्रू म्हणजे डॉक्टर एव्हिल. याबरोबरच डॉक्टर एव्हिलचा उजवा हात म्हणजे एका डोळ्यावर पॅच लावलेला नंबर वन, हेर दॉक्तर म्हणून त्याला हाक मारून दचकवणारी जर्मन आशिष्टन फ्राउ फार्बिसिना इ. पात्रेही आहेत. यात ऑस्टीन पॉवर्स आणि डॉक्टर एव्हिल या भूमिका माइकनेच केल्या आहेत. याशिवाय सर्व चित्रपटांमध्ये आणखी एक-दोन भूमिकाही तो समर्थपणे पार पाडतो. यातील काही श्रेयनामावली वाचल्याशिवाय ओळखताही येत नाहीत.

    यातील विनोद इतक्या विविध प्रकारचा आहे की त्याचे शब्दांमध्ये वर्णन अशक्य आहे. एक-दोन चित्रपटांमध्ये डॉक्टर एव्हिलला शीतपेटीमध्ये ठेवले जाते आणि तो नसताना नंबर वन स्टारबक्समध्ये पैसे गुंतवून गुन्हेगारी करून मिळाले असते त्यापेक्षा कैक पटींने अधिक पैसे मिळवतो. किंवा ऑस्टीन पॉवर्स हातात सापडूनही डॉक्टर एव्हिल त्याला न मारता जेवायचे आमंत्रण देतो इ. मार्क्स बंधूंप्रमाणे शाब्दिक कोट्या, पीटर सेलर्ससारखे प्रसंगांमधून येणारे विनोद, प्रत्येक पात्राच्या तर्हेवाइक स्वभावाची अतिशयोक्ती केल्यानंतर होणारे विनोद आणि याखेरीज बॉंड पट, टीव्हीवरील टॉक शोज किंवा टर्मिनेटर हॉलिवूडपटांमध्ये येणारे नेहेमीचे प्रसंग या सर्वांचा विडंबनासाठी पूरेपूर उपयोग केलेला आहे. माइकला प्रत्येक चित्रपट लिहीण्यासाठी तीन वर्षे लागतात यावरून त्याच्या तयारीची कल्पना यावी. स्पिलबर्ग, टॉम क्रूझ, ब्रिटनी स्पिअर्स, टिम रॉबिन्स यासारख्या नावाजलेल्या कलाकारांनी त्याच्या चित्रपटात हजेरी लावलेली आहे.

    इतकी स्तुती केल्यानंतर काही इशारे. ज्यांना अश्लील विनोदांचे वावडे आहे त्यांनी या चित्रपटांच्या वाटेला जाऊ नये. द्वयर्थी संवाद, अत्यंत बटबटीत वाटावीत अशी एक्सप्लिसिट दृश्ये, टॉयलेट ह्यूमर या सर्वांची यात रेलचेल आहे. जर कोणत्याही प्रकारचा विनोद पचवण्याची तयारी असेल तरचे हे चित्रपट पहावेत अन्यथा निराशा होईल आणि नंतर आम्हाला दूषणे देऊनही उपयोग होणार नाही. अर्थात या चित्रपटांमधील अश्लीलतेमुळे भारतात हे प्रदर्शित झाले आहेत का याची कल्पना नाही आणि झाले असल्यास भरपूर कात्री लावूनच झाले असणार याची खात्री आहे.

  • इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ

    आपल्याकडे कोणत्याही च्यानेलवरच्या मुलाखती पाहील्या तर मुलाखत घेणे या प्रकाराविषयी एकूणातच प्रचंड अज्ञान, अनास्था दिसते. मुलाखत घेण्याचे उद्देश कोणते, ती कशी घ्यावी, कशी घेऊ नये अशा बर्‍याचशा महत्वाच्या मुद्यांचा विचारही केलेला दिसत नाही. अर्थात याचा अर्थ सगळेच मुलाखत घेणारे एकाच पातळीवर आहेत असा अजिबात नाही. करण थापर किंवा विनोद दुआसारखी मंडळी उत्तम मुलाखत घेतात मात्र त्यांचा उद्देश शोधपत्रकारिता असल्याने मुलाखतीचे क्षेत्र मुख्यत: प्रसिद्ध व्यक्तींना वादग्रस्त विषयांवर बोलते करणे आणि शब्दात पकडणे असा होतो.

    अर्थात परदेशी च्यानेलवरही फारसा वेगळा प्रकार नाही. लॅरी किंगचा ‘सिक्टी मिनिट्स’ उल्लेखनीय होता पण इथेही बरेचदा प्रकाशझोतात असणार्‍या व्यक्ती असायच्या आणि विषय वादग्रस्त, त्यामुळे मर्यादा यायच्या. बाकी ‘एलेन डीजनरेस’ किंवा ‘डेव्ह लेटरमॅन’ वगैरे प्रयत्न चांगले आहेत पण इथे मुलाखत हा एकच उद्देश नाही, दहा-बारा आयटम करायचे, त्यापैकी मुलाखतीला मिळणार सात मिनिटे, त्यात विचारणारा काय विचारणार आणि बोलणारा काय बोलणार.

    हे जे सगळे निष्कर्ष आहेत मुलाखत कशी असावी याचा आदर्श बघायला मिळाल्यानंतरचे आहेत. जपानमध्ये असताना एखादा इंग्रजी च्यानेल सापडतो का हे बघण्याच्या प्रयत्नात हा कार्यक्रम सापडला. एकदा सापडल्यावर त्याकडे पाठ फिरवणे अशक्य होते. मुलाखत कशी असावी याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ब्राव्हो च्यानेलवरचा ‘इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ’ हा कार्यक्रम.

    ‘इनसाइड द ऍक्टर्स स्टुडिओ’ आणि वर उल्लेख केलेले आणि न केलेले कार्यक्रम यांच्यामध्ये बरेच मूलभूत फरक आहेत. या कार्यक्रमचा सह-निर्माता आणि होस्ट जेम्स लिप्टन हा स्वत: एक अभिनेता आहे. या मुलाखती पेस युनिव्हर्सिटी आणि मायकेल शिमर सेंटर फॉर आर्टस यांच्या सहयोगाचे फलित आहेत. पेस युनिव्हर्सिटी इथल्या ऍक्टर्स स्टुडिओ ड्रामा स्कूलच्या विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रातील दिग्गज कसे काम करतात हे बघायला मिळावे हा या मुलाखतींचा मुख्य उद्देश आहे. मुलाखतींंचे शूटींग करताना वेळेचे बंधन नसते, नंतर यातून साधारण एक तास (किंवा जास्त) असा भाग संपादित केला जातो. मुलाखतीमध्ये कोणतेही वैयक्तिक प्रश्न विचारले जात नाहीत. मुलाखतीच्या आधी जेम्स लिप्टन ज्याची मुलाखत घ्यायची आहे त्याच्याबद्दल सर्व माहिती गोळा करतो. बरेचदा अभिनेते ‘हे तुला कसे माहीत?’ असे म्हणून आश्चर्यचकित झालेले दिसतात. पण इथेही अभिनेत्याला अवघडल्यासारखे वाटेल अशा गोष्टींचा उल्लेख चुकूनही केला जात नाही.

    जेम्स लिप्टन स्वत: कमीत कमी बोलतो आणि पाहुण्याला बोलतं करतो. हे करताना वातावरणात कुठेही उत्तरे मिळण्याची घाई दिसत नाही. एखाद्या प्रश्नाला पूर्ण उत्तर मिळाले नाही तर एखाद्या गुन्ह्याच्या मागावर असलेल्या डिटेक्टीव्हप्रमाणे त्याचा पाठपुरावा करणे असले प्रकार अजिबात नाहीत. कोणताही औपचारिकपण न बाळगता दिलखुलास गप्पा पण त्यातही अवांतर टाइमपास न होऊ देता कलाकाराचे काम, त्याची त्याकडे बघण्याची दृष्टी, त्यामागची त्याची विचारसरणी अशा अनेक गोष्टी या गप्पांमध्ये सहजपणे समोर येतात. मधून-मधून कलाकाराच्या उल्लेखनीय चित्रपटांचे तुकडे दाखवले जातात, त्याच्या अनुषंगाने आणखी चर्चा होते. हे सगळे नेहेमीपेक्षा वेगळे आहे हे कलाकारांनाही जाणवते आहे हे स्पष्ट दिसते. टॉम हॅंक्स दुसर्‍यांदा या कार्यक्रमात आल्यावर उस्फूर्तपणे म्हणाला, “इथे यायला मला नेहेमी आवडतं. इतर कार्यक्रमांमध्ये बोलावल्यावर आमच्यावर स्टार म्हणून वागाण्याचं दडपण असतं. तीन मिनिटात हायपर होऊन आमच्या नवीन चित्रपटाबद्दल सांगायचं असतं. इथे तसं कोणतही दडपण नसतं.”

    या कार्यक्रमात हॉलीवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली आहे. कपोला, स्पिलबर्ग, जीन हॅकमन, रॉबर्ट रेडफर्ड, मेरील स्ट्रीप.. यादी मोठी आहे. सिंपसन किंवा एव्हरीबडी लव्हज रेमंड यासारख्या लोकप्रिय मालिकांचे कलाकारही इथे येऊन गेले आहेत. मार्लन ब्रॅंडो आणि कॅथरीन हेपबर्न यांनी मात्र बरेचदा विनंती करूनही येण्यास नकार दिला तर ग्रेगरी पेक यांनी अखेर विनंती मान्य केली पण त्यानंतर थोड्याच काळात त्यांचा मृत्यू झाला. कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलाखत संपल्यावर लिप्टन पाहुण्यांना एका प्रश्नावलीत असलेले दहा प्रश्न विचारतो. ही प्रश्नावली फ्रेंच मुलाखतकार बर्नार्ड पिव्हू यांनी लेखक मार्सेल प्राउस्ट यांच्या प्रश्वालीला आधार मानून तयार केली आहे. तुमचा आवडता आणि नावडता शब्द कोणता, आवडता आणि नावडता आवाज कोणता या प्रकारचे हे प्रश्न असतात. यांची उत्तरे व्यक्तीमत्वाचे काही पैलू समोर आणतात असे मानले जाते. सर्वात शेवटी ड्रामा स्कूलचे विद्यार्थी पाहुण्यांना प्रश्न विचारतात.

    सगळ्याच मुलाखती बघण्यासारख्या आहेत. मला सर्वात जास्त आवडलेल्या मुलाखतींपैकी एक रॉबिन विलियम्सची होती. हा एकमेव पाहुणा असा होता की ज्यापुढे लिप्टनचे काहीही चालले नाही. याचे कारण आल्यापासूनच रॉबिन जो सुटला तो थांबायचे नावच घेईना. स्टॅंड अप कॉमेडी आणि इम्प्रॉव्ह साठी लागणारी विनोदबुद्धी, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा यावर तासभर बोलूनसुद्धा जे सांगता आले नसते ते त्याने करून दाखवले. हा कार्यक्रम दोन भागात सादर केला गेला. याखेरीज कपोला, डस्टीन हॉफमन, क्लिंट इस्टवूड, केव्हिन स्पेसी अशा अनेक मुलाखती अनेकदा बघण्यासारख्या आहेत.

    कोणताही बडेजाव न करणारा साधा सेट, अगदी मोजके असे पार्श्वसंगीत, टीआरपी, प्रायोजक यांची फिकीर न करता ‘कंटेंट इज किंग’ हे सूत्र मध्यवर्ती ठेवून तयार करण्यात आलेली ही मालिका खरे तर प्राइम टाइमला दाखवायला हवी. आपल्याकडच्या च्यानेलवर हा कार्यक्रम कुठे दिसतो का हे बघण्याचा प्रयत्न केला, शेवटी एका दुर्लक्षित च्यानेलवर सापडला. वेळ होती शनिवारी सकाळी ८.३०! सुदैवाने युट्यूबवर याचे बरेच भाग आहेत. ग्लॅमरच्या मुखवट्यामागे दडलेला कलाकार, त्याचा प्रवास, कलेच्या साधनेमध्ये अत्युच्च पातळी गाठण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न हे सर्व बघायचे असेल तर ही मालिका जरूर पहावी.

  • अणूंचा चित्रपट – अ बॉय ऍंड हिज ऍटम

    विज्ञानाची पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचे संशोधनाबद्दल बरेच गैरसमज असतात. आईन्स्टाईनसारखे केस वाढलेले, विक्षिप्त स्वभाव आणि नेहमी विश्वाचा उगम कसा झाला यासारख्या गूढ आणि रहस्यमय प्रश्नांची उत्तरे शोधण्यात गुंतलेले लोक म्हणजे वैज्ञानिक. यात एक गृहीतक दडलेलं आहे ते म्हणजे संशोधनाच्या विषयांबद्दल. कृष्णविवर, विश्वाचा आरंभ, बिग बॅंग, पॅरेलल युनिव्हर्स, स्ट्रिंग थिअरी किंवा नुकताच प्रसिद्धीला आलेला हिग्ज बोझॉन – यासारखे विषय सामान्य जनतेमध्ये बरेच लोकप्रिय असतात. किंबहुना पुणे-मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागातील शास्त्र शाखेतील बऱ्याच मुलांचे स्वप्न खगोलशास्त्रज्ञ व्हायचे असे असते. (यात एकेकाळी लेखकाचाही समावेश होता.) आणि यामागे त्या काळात सकाळच्या पुरवण्यांमध्ये येणाऱ्या लेखांचा बराच प्रभाव आहे असे वाटते. यात अर्थातच गैर काहीच नाही, उलट विज्ञानाची गोडी लागत असेल तर चांगलेच आहे. मुद्दा हा की विज्ञान म्हणजे फक्त हे ‘सायन्स फिक्शन’मध्ये नेहमी येणारे विषय नव्हेत, विज्ञानाच्या छत्रीखाली असंख्य शाखा आणि विषय येतात. त्यातले सर्व ‘कृष्णविवरात पडलं तर काय होईल?’ असे ‘ऑस्सम’ प्रश्न विचारत नसले तरी जाणून घेतलं तर बरेचदा रोचक माहिती मिळू शकते. मागच्या लेखात आलेलं ‘बटरफ्लाय इफेक्ट’चं उदाहरण ‘नॉन-लिनियर डायनॉमिक्स’ या शाखेखाली येतं. या शाखेतील परिणाम बरेचदा इतके विस्मयकारक असतात की शास्त्रज्ञांना या शाखेला विज्ञान म्हणून स्वीकारायला बराच वेळ लागला. किंवा ‘कंडेन्स्ड मॅटर फिजिक्स’ या वेगळ्या शाखेमध्ये ‘सुपरकंडक्टिव्हिटी’ किंवा बोस-आईन्स्टाईन कन्डेन्सेट सारखे अनेक रोचक गुणधर्म बघायला मिळतात. याखेरीज काही शाखा अशा आहेत की ज्यांच्या संशोधनावर या शतकाचं भवितव्य अवलंबून आहे, उदा. सौर उर्जा आणि इतर पर्यायी मार्गाने उर्जा मिळवण्यावर चाललेलं संशोधन.

    मिडियामध्ये विज्ञानाच्या सगळ्या शाखांना सारखी प्रसिद्धी मिळत नाही हे इतर शाखांमधील वैज्ञानिकांच्या लक्षात येऊ लागलं आहे. या दिशेने एक प्रयत्न म्हणून आयबीएमच्या शास्त्रज्ञांनी एक लघुचित्रपट तयार केला. फक्त चित्रपट केला असता तर फारसं काही आश्चर्यकारक नव्हतं. हा चित्रपट बनवण्यासाठी शास्त्रज्ञांनी चक्क अणू वापरले. अणूंच्या साहाय्याने चित्रे काढून त्याचा चित्रपट बनवण्यासाठी स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोपचा (एसटीएम) वापर करण्यात आला. एसटीएमबद्दल आधी एक लेख आला आहे. यात अत्यंत टोकदार अशा सुईमार्फत पृष्ठभागावर असणारे अणू किंवा रेणू हवे तसे नियंत्रित करणे शक्य होते. तांब्याच्या पृष्ठभागावर कार्बन मोनॉक्साइडचे १३० अणू ठेवण्यात आले. या अणूंच्या रचनेमधून एक चित्र तयार झाले. नंतर अणूंची स्थिती बदलून या चित्रात बदल केले गेले आणि त्यांची चित्रे घेऊन त्यापासून चित्रपट तयार करण्यात आला. यासाठी २४२ फ्रेम्स चित्रित करण्यात आल्या. तांब्याच्या पृष्ठभागाचे तपमान -२६८ C इतके होते कारण नेहमीच्या तपमानामध्ये अणू पृष्ठभागावर स्थिर राहणे अशक्य असते.

    आयबीएमसाठी पृष्ठभागावरील अणू हवे तसे नियंत्रित करणे नवीन नाही. एसटीएमचा शोध आयबीएममध्येच लागला आणि त्यासाठी १९८४ साली नोबेल पारितोषिकही देण्यात आले. मात्र एखादी कथा सांगणारा चित्रपट – मग भले ती कथा कितीही साधी असो – अणूंच्या मार्फत चित्रित करणे ही गोष्ट विस्मयकारक आहे आणि केवळ मनोरंजन हा यामागचा उद्देश नाही. अणूंवर हवे तसे नियंत्रण मिळवता येणे नवीन प्रकारचे ‘मेमरी डिव्हाइस’ बनविण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. याखेरीज या तंत्रज्ञानाचे अनेक उपयोग वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये वापरले जात आहेत.

  • विनोदाच्या शोधात

    विनोदी लेखकांना नेहमीच कमी दर्जाचं स्थान मिळालेलं आहे. दरबारात विदूषकाचं जे स्थान तेच साहित्यात विनोदी लेखकाचं. विनोद निर्माण करायला फारसे कष्ट पडत नाहीत असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ज्या निष्काळजीपणे लोक विनोदनिर्मिती करतात त्यात हे दिसून येतं. इथे गैरसमज नको. रोज आपण बोलताना ज्या चकाट्या पिटतो त्या काळजीपूर्वक पिटाव्यात असं म्हणणं नाही. पण विनोदी चित्रपट, मालिका किंवा विनोदी लेख यात कोणत्याही प्रकारचा विनोद थोड्या तरी प्रमाणात असावा ही अपेक्षा गैर नाही. बरेचदा लेख वाचल्यानंतर ह्यात विनोद कुठे होता असा प्रश्न पडतो. पुलंच्या ‘गाळीव इतिहासातील’ कोणतंही पान उघडून वाचावं. उच्च पातळीचा विनोद कसा असावा, ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत प्रतिभावंत कवींवर किंचितही ओरखडा न येऊ देता त्यांचं विडंबन कसं करावं अशा अनेक गोष्टी यात ज्या सफाईने साधलेल्या आहेत त्याला तोड नाही. (“ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम वगैरे संतमंडळींचे महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी लिहिले नसते आणि संत व्हायचे सोडून भलत्या नादाला लागले असते तर ‘ओल्ड मराठी’च्या पेपरचे वांधे झाले असते.” “नामदेव पंजाबात लोकप्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजूनही मराठी लेखकाला अन्य भाषेत लोकप्रियता मिळाली तरी तेच होते.”) पण हे सगळं करण्यासाठी प्रतिभा लागते हेच मान्य नसतं. विनोद काय, कुणीही, कधीही करू शकतं.

    पुलंवर भरपूर टीका झाली आणि होते आहे. पण त्यांचे टीकाकार एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. त्यांना इतकी लोकप्रियता मिळण्यामागे मूलभूत कारण त्यांचा विनोद जातिवंत होता हे आहे. इथे लगेच आक्षेप येतो की आजच्या काळात त्यांचा विनोद शिळा झाला आहे. असा आक्षेप घेण्यामागे विनोदाच्या कार्यकारणभावाबद्दल अज्ञान दिसतं. कोणताही विनोद पहिल्यांदा ऐकताना जो परिणाम होतो तो परत ऐकताना होत नाही. विनोदाचं बलस्थान हे त्याच्यामध्ये जी अनपेक्षित कलाटणी असते तिच्यात असतं. ती कलाटणी एकदा कळली की विनोदाचं अर्धं आयुष्य संपतं. परत ऐकताना हसू येऊ शकतं पण कमी प्रमाणात येतं आणि तरीही लोक त्या विनोदाला ऐकत-वाचत राहिले तर त्यामागे दाद देण्याचा हेतू असतो. दुसरा मुद्दा – काही वेळा विनोद हा ‘ऑब्झरव्हेशनल कॉमेडी’ – आजूबाजूला जे दिसतं आहे त्यातील विसंगती शोधून त्यावर विनोद करणे – या प्रकारात येतो. जिम कॅरीपासून साइनफेल्डपर्यंत सर्व ‘स्टॅंड-अप’ कमेडियन्स या प्रकाराचा अवलंब करतात. पुलंच्या विनोदाचा काही भाग या प्रकारात मोडतो. साहजिकच या प्रकारच्या विनोदाला स्थल-कालाची बंधने असतात. त्या काळच्या पोस्ट खात्यावर केलेला विनोद आज जर ते पोस्ट खातं अस्तित्वातच नसेल तर कळायला कठीण जाणार. पण याचा अर्थ त्या विनोदाचा दर्जा कमी आहे असा होत नाही. आणि तरीही त्यात शाब्दिक कसरती, कोट्या वगैरेंची इतकी रेलचेल असते की त्या काळचं पोस्ट खातं बघितलं नसेल तरी आनंद लुटता यावा. पुलंचा इतर विनोद माणसांच्या स्वभावातील विसंगती (विसंगत्या?), भाषेच्या गमतीजमती यामुळे आनंद देऊन जातो.

    विनोदाची एक गंमत असते. विनोदाचं सोंग घेता येत नाही. एखादी गोष्ट विनोदी असते किंवा नसते. असली तर लोकांना हसा म्हणून सांगावं लागत नाही, ते आपणहून मनमुराद हसतात. पण विनोदी नसेल तर त्या गोष्टीचं अस्तित्वच धोक्यात येतं. गंभीर लेख जमला नाही तर त्याचं खापर लोकांच्या माथी मारून सुटका करून घेता येते. विनोदी लेखाला लोक हसले नाहीत तर तो विनोदी नाही हे सिद्ध होतं, आणि मग त्याचं स्वरूप केविलवाणं होतं. अशा लेखातल्या तथाकथित ‘पंचेस’वर (असले तर – काही लेखांना पंच, बोलर, बॅट्समन काहीच नसतं.) हसू येत नाही, लेख विनोदी आहे हे सिद्ध करण्याची पराकाष्ठा केल्यामुळे आता तो गंभीरही होऊ शकत नाही. शांती न मिळालेल्या अतृप्त आत्म्याप्रमाणे बिचारा मध्येच कुठेतरी लटकत राहतो. जेरी साइनफेल्डनं यावर अनेकदा टिप्पणी केली आहे. (“It’s hard being a standup comic- sometimes they don’t laugh.” – Elaine Benes) एकदा जेरी अर्धवट झोपेत असताना त्याला एक विनोद सुचतो आणि तो लिहून ठेवतो. उठल्यावर त्याला काय लिहिलं आहे ते वाचता येत नाही. पूर्ण एपिसोड तो डॉक्टरांपासून नर्सपर्यंत सर्वांना काय लिहिलं आहे ते वाचायला सांगतो. शेवटी जेव्हा उलगडा होतो तेव्हा त्यात काहीच विनोदी नसतं. त्या वेळेला त्याला जे विनोदी वाटलं तो नंतर फुसका बार निघतो.

    गंभीर लेखकांवर ‘एक्सपायरी डेट’ नसते. शंभर वर्षांनंतरही त्यांच्या लिखाणातील सखोलता वगैरेंवर लोक चर्चा करतात. बिचाऱ्या विनोदी लेखकाला मात्र लगेच कालबाह्य व्हावं लागतं. एकदा हसून झालं की लोक नवीन काय म्हणून विचारतात. पण गंभीर लेखकाइतकेच कष्ट विनोदी लेखकालाही घ्यावे लागतात याचा सोईस्करपणे विसर पडतो कारण विनोदी लेखकांना उच्चभ्रू वर्तुळात प्रवेश नाही. एखादा वुडी ऍलन अपवाद. हेच थोड्याफार फरकाने मनोरंजन करणाऱ्या लेखकांबद्दलही दिसतं. अगाथा ख्रिस्तीच्या कथा एकाच साच्यामधून आलेल्या आहेत अशी तिच्यावर टीका होते. पण इतक्या कथा लिहूनही लोकांना त्यात अजूनही रस आहे त्याअर्थी त्यात काहीतरी रंगतदार आहे आणि ते निर्माण करण्यासाठी कौशल्य लागत असेल हे मान्य होत नाही.

    विनोदी लेखनाच्या शोधात असताना एक जुनं पुस्तक सापडलं. कव्हर अर्धं फाटलेलं, पिवळी पानं, आत “GODFREY ATUDO 23RD MAY 1981” असं नाव आणि सही होती. अशा पुस्तकांचा प्रवास इतका झालेला असतो की आपल्या हातात ते नेमकं कसं आलं हे कळणं अशक्य असतं. पुस्तक होतं, वुडहाऊसचं “Leave it to Smith.” वाचायला सुरुवात केली आणि बरेच दिवसांनी मनमुराद हसण्याचा आनंद मिळाला. कथानक कोणत्याही मसाला चित्रपटाची कथा म्हणून शोभून दिसेल. ब्लॅंडींग्ज कॅसलच्या मालकिणीचा मौल्यवान हार आणि तो चोरण्यासाठी आलेले हौशे, नवशे आणि गवशे. वुडहाऊसच्या शाब्दिक कसरती अफलातून आहेतच, शिवाय प्रसंगनिष्ठ विनोदही लाजबाब आहे. वुडहाऊस, पुलं यासारख्या लेखकांचं एक वैशिष्ट्य हे की विनोदनिर्मितीसाठी त्यांनी वापरलेले शब्द अगदी अचूक असतात. उदा. कथेतील मुख्य पात्र स्मिथ – याला मासे अजिबात आवडत नसतात. त्यासाठीच तो मासेमारीच्या कंपनीतील नोकरी सोडतो. नंतर वर्तमानपत्रात नोकरीसाठी तो एक जाहिरात देतो. याबद्दल बोलताना तो सांगतो, “I am confidently expecting shoals of replies.” शोल चा अर्थ आहे माशांचा थवा. इथे वुडहाऊस इतर कोणताही शब्द वापरू शकला असता पण मग ते वाक्य सामान्य झालं असतं. शोल हा शब्द वापरल्यामुळे आधीचा माशांचा संदर्भ इथे अचूकपणे येतो.

    वर्षानुवर्षे पुस्तकं वाचत असाल तर आपल्या आवडीनिवडींमध्ये कसा बदल होत जातो हे बघणं मनोरंजक असतं. आवडीनिवडींमागे असलेले छुपे पूर्वग्रह प्रभावी असतात. वुडहाऊस वाचणं सोडून दिलं होतं – कथानकात येणारा तोचतोपणा हे कारण असावं. फार मोठी चूक. वुडहाऊसची सूक्ष्म ते स्थूल अशी विनोदनिर्मिती किंवा अगाथा ख्रिस्तीचं ‘वॉटरटाइट प्लॉट’ अशा अनेक गोष्टी लक्ष दिल्या तर दाद देण्यासारख्या असतात. पण त्याऐवजी आपण आपल्याला काय हवं आहे ते शोधत बसलो तर हातात काहीच पडत नाही.
    —-
    १. बरेचदा इंग्रजी पुस्तकांच्या पहिल्या दोन-तीन पानावर अवघड शब्दांचे अर्थ मराठीत लिहिलेले आढळतात. इथे पुस्तक विद्रूप होणे ही बाब सोडली तर कुणीतरी प्रयत्नपूर्वक इंग्रजी वाचन करत आहे ही गोष्ट चांगली असते. दुर्दैवाने चार-पाच पानातच हा उत्साह संपलेला दिसतो. आजवर एकाही पुस्तकात सुरुवातीपासून शेवटापर्यंत शब्दांचे अर्थ लिहिलेले आढळलेले नाहीत. असं का झालं याचं उत्तर लगेच मिळतं. इंग्रजीत वाचायला सुरुवात करताना जर नायपॉल किंवा अमर्त्य सेन पासून सुरुवात केली जर अडचण दुहेरी होते. भाषेचा अडसर असतोच, शिवाय विषयही दुर्लभ असतो. त्याऐवजी वुडहाऊस, अगाथा खिस्ती किंवा हॅरी पॉटर यापासून सुरुवात केली तर सोपे जावे. किंवा कॉमिक्स याहूनही उत्तम. दुसरा मुद्दा – वाचताना प्रत्येक अडलेला शब्द बघण्याची गरज नाही. तसं केलं तर अर्ध्या तासातच शीण येईल. उलट अडलेले शब्द सोडून संदर्भावरून किती आकलन होते ते बघावे. एखादा शब्द परतपरत येत असेल तर बघायला हरकत नाही.