Author: Raj

  • नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड आणि ओरहान पामुक

    वाचनाचं व्यसन लागलेल्यांसमोर असणारा एक चिरंतन प्रश्न म्हणजे एक पुस्तक वाचून झालं की पुढचं कोणतं हे कसं ठरवायचं? वाचक पट्टीचा असेल तर त्याच्या आजूबाजूला पुस्तकांचा खच पडलेला असतो. ‘बेग, बॉरो किंवा स्टील’ (इथं स्टील याचा अर्थ आंतरजालावरून इ-पुस्तकं मिळवणं असा घ्यावा.) यापैकी कोणत्याही पद्धतीने आणलेली पुस्तकं भोवताली ‘मला वाच, मला वाच’ असं म्हणत फेर धरून नाचत असतात. हा प्रश्न धसास लावण्यासाठी अस्मादिकांनी एका एक-सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीने तातडीने वाचलीच पाहीजेत अशा पुस्तकांची यादी करण्याची उपसूचना मांडली. ही यादी केल्यानंतर तिचा आकार पाहून प्रश्न सुटलेला नाही असं लक्षात आलं. शेवटी समिती बरखास्त केली, सीता भरोसे जे पुस्तक वाचावसं वाटेल ते वाचावं असं ठरवलं आणि समोरच्या पुस्तकात डोकं खुपसलं.

    ओरहान पामुकचा ‘अदर कलर्स’ हा लेख संग्रह मिळाला. त्याची अनुक्रमणिका बघत असताना पामुकनं त्याच्या आवडत्या लेखकांवर आणि पुस्तकांवर काही लेख लिहील्याचं दिसलं. चांगले लेखक जेव्हा इतर लेखकांवर किंवा पुस्तकांवर लिहीतात तेव्हा त्याच्या लुत्फ वेगळाच असतो. गावसकर समालोचन करत असताना मैदानातील वरकरणी साध्या वाटणार्‍या गोष्टींमागची मानसिक कारणं, डावपेच यावरच्या त्याच्या ‘स्पेशल कमेंट्स’ करतो तेव्हा त्या त्याच्या प्रदीर्घ अनुभवामधून आल्याचं जाणवतं आणि म्हणूनच त्याचं समालोचन इतरांपेक्षा वेगळं ठरतं. पामुक दस्तोयेव्स्की, कमू, सलमान रश्दी, व्हिक्टर ह्युगो अशा बर्‍याच लेखकांबद्दल बोलतो. यादी बघत असताना अचानक नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड दिसल्यावर वाचावसं वाटलं, मग त्यासाठी पामुकला काही काळ बाजूला ठेवलं.

    पुस्तक वाचताना लक्षात घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा अनुवाद आहे, साहजिकच अनुवाद वाचताना जे अडथळे येऊ शकतात ते इथे गृहित धरावे लागतात. याचे बरेच अनुवाद उपलब्ध आहेत, मी वाचलेला अनुवाद रिचर्ड पीव्हर आणि लरिसा व्होलोखोन्स्की यांनी केला आहे. याच्या प्रस्तावनेत ते इतर उपलब्ध अनुवादांवर काहीसा टिकेचा सूर लावतात. त्यांच्या मते या आधी आलेल्या अनुवादांमध्ये मूळ कादंबरीचा सूर हरवला आहे. उदा. vygoda या शब्दासाठी आधीचे अनुवाद advantage हा शब्द वापरताअ पण रिचर्ड आणि लरिसा profit वापरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार vygoda मध्ये जो नाद आहे तो profit या अनुवादात कायम राहतो. “And like vygoda, with its strongly accented first syllable, ‘profit’ leaps from the mouth almost with the force of an expletive, quite unlike the more unctuous ‘advantage’ or its Russian equivalent ‘preimushchestvo’…. Thus we arrive at the full music of this underground oratorio. अनुवादकांनी इतका सखोल विचार केलेला पाहून बरं वाटतं. अनुवाद वाचावासा वाटतो.

    दस्तोयेव्स्की सारख्या लेखकांचं एक वैशिष्ट्य हे की पुस्तकामध्ये जे समोर असतं ते फक्त हिमनगाचं टोक असतं. पूर्ण हिमनग बघण्यासाठी लेखक, त्याची पार्श्वभूमी, तत्कालीन परिस्थिती हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे पुस्तक वाचलं, बाजूला ठेवलं असं होत नाही. बहुतेक वेळा ‘क्लासिक्स’ समजल्या जाणार्‍या पुस्तकांमध्ये इतर क्लासिक्सचे संदर्भ असतात. (याच कारणासाठी नायपॉल सध्याच्या कादंबरी (novel) या साहित्यप्रकारातील नाविन्य संपलं आहे असं म्हणतात, प्रत्येक लेखक त्याच्या आधीच्या लेखकांच्या जाणीवा, अनूभूती उधार घेऊन काम चालवतो आहे.) पुन्हा अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये कथा असली तर ती ही अस्वस्थ करणारी असते. या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रत्येक पुस्तकानंतर स्वत:मध्ये किंचित बदल झाल्याची जाणीव होते.

    नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड एका निवेदकाची डायरी आहे. पहिला भाग त्याचा वाचकांशी संवाद. इथे निवेदक म्हणून तोच बोलतो आणि कधी कधी तुम्ही असं म्हणाल असं म्हणून दुसरी बाजूही तोच मांडतो. सुरूवातीला त्याची परिस्थिती स्पष्ट झाल्यावर तो एका सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राहतो आहे असं कळतं. (यालाच तो अंडरग्राउंड असं म्हणतो.) त्या बोलण्यातून त्याचा स्वभाव दिसायला लागतो. एकलकोंडा, जगाविषयी आणि विशेषत: जगातील लौकिकार्थाने यशस्वी लोकांबद्दल त्याचा असूया आणि तुच्छता वाटते. पहिल्या भागातील या प्रदीर्घ संवादामध्ये तो तत्कालीन तत्वज्ञानातील ‘फ्री विल’ अस्तित्वात आहे का किंवा माणूस मुळात चांगला आहे याला काय आधार आहे यासारख्या काही कळीच्या मुद्यांना आव्हान देतो. इथे तेव्हाच्या रशियातील परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. युरोपमध्ये ‘एनलायटनमेंट’चे वारे वाहत होते. रशियातील बुद्धिजीवींना याची भुरळ पडली होती आणि यावर आधारित एका ‘युटोपियन’ समाजाची संकल्पना मांडली जात होती. लेनिनच्या राजवटीची बीजे इथे रोवली गेली. या संकल्पनेचा प्रमुख प्रचारक चेर्निशेव्स्की याला उत्तर म्हणून दस्तोयेव्स्कीने नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड लिहीलं.

    पुस्तकाचा दुसरा भाग कथेच्या स्वरूपात आहे. निवेदकाचे काही वर्गमित्र एका मित्राला पार्टी देणार असतात. निवेदक त्यांची इच्छा नसतानाही तिथे जातो, त्यांचा अपमान करतो. हे सर्व होत असताना आपले निवेदकाबद्दलचे मत बदलत जाते. पहिल्या भागात काही वेळा ज्यांची चुणूक दिसली असे त्याच्या स्वभावातील कंगोरे आता स्पष्टपणे समोर येतात. त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्याला भास होत आहेत. एका त्रासिक माणसापासून मनोरूग्णापर्यंतच्या या प्रवासाचा एक परिणाम म्हणजे कादंबरीच्या शेवटी निवेदक anti hero ठरतो आणि तो स्वत:च हे कबूलही करतो. आपण खोल गर्तेत जात आहोत हे कळूनही स्वत:ला किंवा इतरांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न न करणारा, किंबहुना आपल्या या अध:पतनामधून एक आसुरी आनंद मिळवणारा हा निवेदक दस्तोयेव्स्कीच्या पुढच्या कादंबर्‍यांसाठी एक सुरूवात ठरलाच पण त्याचबरोबर तत्कालीन साहित्यामधील ही बंडखोरी नंतर इतर अनेक साहित्यिकांसाठी प्रेरणा ठरली.
    नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड अस्तित्ववाद (Existentialism) या शाखेची सुरूवात मानली जाते.

    इतकी माहिती पुस्तकाची प्रस्तावना आणि आंतरजालावरून मिळते. नंतर पामुकचा यावरचा लेख वाचल्यावर आणखी एक पदर उलगडला. पामुकनं हे पुस्तक त्याच्या तरूणपणात वाचलं होतं. त्या वेळी त्याला पुस्तकामध्ये हिमनगाचं फक्त वरचं टोक दिसलं होतं. यापलिकडे काहीतरी आहे याची जाणीव झाली मात्र – कदाचित त्यामुळे येणार्‍या अस्वस्थतेच्या भीतीनं – त्यानं याचा पाठापुरावा केला नाही. तीस वर्षांनंतर पुस्तक परत वाचताना त्याला दोस्तोयेव्स्की ‘इन बिटविन द लाइन्स’ काय म्हणतो आहे ते लक्षात आले.

    पुस्तकाच्या पहिल्या भागात बरेचदा तत्कालीन युरोप आणि रशिया यांच्यावर टिप्पण्या आहेत. एकोणिसाव्या शतकातील रशियामधले बुद्धीजीवी खुराकासाठी संपूर्णपणे युरोपमधील एनलायटनमेंट चळवळीवर अवलंबून होते. त्यांच्या विचारांमध्ये आणि त्या विचारांमधून आलेल्या संकल्पनांमध्ये मूळ रशियन असे काहीही नव्हते, सगळ्या कल्पना उधार घेतलेल्या. दस्तोयेव्स्कीला या सगळ्या प्रकाराची चीड आली होती. पण – आणि इथेच पामुकच्या ‘स्पेशल कमेंट्स’चे महत्व स्पष्ट होते – खुद्द दस्तोयेव्स्की कोणत्या विचारांचे आचरण करत होता? त्यालाही बौद्धिक भूक भागवण्यासाठी युरोपकडे वळल्यावाचून गत्यंतर नव्हते. नोट्स फ्रॉम अंडरग्राउंडचा निवेदक जी चीड, असूया आणि आत्मप्रौढी व्यक्त करतो ती तो स्वत: कधीही पूर्णपणे युरोपियन होऊ शकणार नाही या भावनेतून आली आहे. दस्तोयेव्स्कीचा राग एनलायटनेमेंटवर नव्हता, तर हे विचार आपल्याकडे तिकडून येत आहेत आणि आपले बुद्धीजीवी त्यात आनंद मानत आहेत यावर होता. या विचारांचे अवलंबन करण्यात रशियाचा फायदा आहे हे ही त्याला कळत होते पण याच गोष्टीची चीडही येत होती. खूप नंतर आयुष्याच्या शेवटी ‘ब्रदर्स कारामाझॉव्ह’ लिहीताना रशियाच्या परपरांबद्दल आपल्याला किती तुटपुंजी माहिती आहे याबद्दल त्याने खंत व्यक्त केली होती.

    पामुकला हा मुद्दा भावला याचे कारण टर्की रशियाप्रमाणेच युरोपच्या काठावर आहे. युरोपमध्ये होणार्‍या वैचारिक मंथनाच्या लाटा रशियाप्रमाणेच टर्कीमध्येही आल्या. टर्कीच्या साहित्यावर युरोपियन विचारवंतांचा मोठा प्रभाव आहे. याच कारणासाठी १९७० च्या दरम्यान नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड चा अनुवाद टर्कीमध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा त्याच्या प्रस्तावनेत दस्तोयेव्स्कीवर प्रखर टीका करण्यात आली.

    आजच्या काळात तेव्हासारख्या कोणत्याही एक किंवा अधिक चळवळींचा पगडा नाही. त्यात भारतासारख्या बहुभाषिक, अनेक संस्कृतींची सरमिसळ असणार्‍या देशामध्ये राहत असताना प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होतात. १८६३ मध्ये लिहीलेले हे पुस्तक आज वाचताना मी या पुस्तकाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पहावे असा एक विचार मनात येतो.

  • संमोहित करणारा अनुभव – नॉरवेजियन वुड

    त्याला दर वेळी हे कसे काय जमते? हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा स्वत:ला विचारतो. वाक्यांकडे, शब्दांकडे निरखून पाहिले तर ते नेहेमीचेच शब्द, नेहेमीचीच वाक्ये असतात. त्यात पुन्हा हे अनुवादित साहित्य, म्हणजे थोडा बदल नक्कीच झाला असणार. तरीही या वाक्यांमध्ये वातावरण निर्मितीची ही जादू कुठून आली? जर मी तेच वाक्य लिहीले तर तोच परिणाम साधेल का?

    Book cover of Norwegian Wood

    प्रश्न, प्रश्न, प्रश्न! असे बरेच प्रश्न पडले त्याचे पुस्तक वाचल्यानंतर. खरे तर पुस्तक वाचले, आवडले की त्याचे साग्रसंगीत परीक्षण करायचे असते. हे उपरोधिकपणे म्हणत नाहिये, मीच आत्तापर्यंत तसे केलेले आहे. पण हे पुस्तक वाचल्यानंतर काय लिहायचे असा प्रश्न पडला. एखाद्या जादूगाराच्या प्रभावाखाली संमोहित झालेल्या प्रेक्षकासारखी अवस्था झाली. त्याची वेगवेगळी पुस्तके म्हणजे वेगवेगळ्या कथा असल्या तरी बरेचदा त्यामुळे फारसा फरक पडत नाही. प्रत्येक लेखकाची काही शक्तीस्थाने असतात. मॉम पात्रांच्या मनोव्यापारातील बारकावे इतके अचूक दाखवतो की दाद दिल्यावाचून राहवत नाही. डिकन्स पात्र दोन मिनिटांसाठी येणार असले तरी त्याचे वर्णन इतके हुबेहूब करतो की ते पात्र जिवंत होते. याचे तसे काहीच नाही. याच्या व्यक्तिरेखा शार्प फोकसमध्ये कधीच येत नाहीत, नेहेमी काहीश्या धूसर रहातात. व्यक्तिरेखा ‘डेव्हलप’ करण्याचे प्रयत्न तो निदान जाणीवपूर्वक तरी करताना दिसत नाही. कारण त्याचे मुख्य उद्दीष्ट तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जाणे असते. हे वातावरण म्हणजे १९७०-८० च्या दशकातील जपान. बीटल्स, रोलिंग स्टोन्स, एरिक क्लॅप्टन, बेथोवन, शूबर्ट, बर्ट बॅकॅरॅक यांचे संगीत. जॉन अपडाइक, एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड, रेमंड शॅंरलर यांची पुस्तके. टोक्योमधील कॅफे, बार. एखादे तरी मांजर, कधी कधी बरीच मांजरे. आणि नायक? एकलकोंडा, वाचनाची आवड असलेला, उत्तम संगीत ऐकणारा, मितभाषी, विवेकी असावा अशी शंका येण्यासारखे वर्तन. बराचसा आत्मचरित्रपर भासावा असा. वूडी ऍलनच्या बहुतेक चित्रपटांमधील नायक जसा स्वत:वरच बेतलेला असतो तसा. पण त्याला एका मुलाखतीत याबद्दल विचारले तर तो म्हणाला, “माझे लेखन आत्मचरित्रपर नसते, जरी तसे वाटले तरीही. आत्मचरित्रपर लिहायचे म्हटले तर पुस्तक पंधरा-वीस पानात संपून जाईल. नायक माझा जुळा भाऊ आहे असे समजा. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वाढल्यामुले काही साम्ये आहेत पण बरेच फरकही आहेत.”

    बहुतेक कथा गूढतेच्या अंगाने जाणार्‍या. पण या कथेमध्ये त्याने मुद्दाम तो मार्ग चोखाळण्याचे टाळले. संपूर्णपणे वास्तववादी कथा आपल्याला लिहीता येते का हे त्याला बघायचे होते. त्यामुळेच या कथेत कोणतीही रहस्यमय पात्रे नाहीत, स्थल-कालाच्या सीमा धूसर होत नाहीत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा नायक नेहेमी दोन जगांमध्ये वावरत असतो, खरे जग आणि आभासी -ज्याला तो स्पिरिचुयल जग म्हणतो. या कथेमध्ये या दोन जगांमध्ये विशेष संघर्ष होत नाही, पण तरीही शेवट थोडासा धूसर रहातोच. (आणि शेवट नेमका काय आहे यावर आंतरजालावर चर्चांच्या फैरी झडतात.) माझ्या मते शेवट महत्वाचा आहे पण नेहेमीच्या कथांमध्ये असतो तितका नाही. कारण त्या शेवटापर्यंत तुम्ही कसे गेलात हे ही तितकेच महत्वाचे आहे आणि इथेच वाचकांच्या अनूभूतीचा प्रश्न येतो. कारण पुस्तक वाचण्यापूर्वी वाचक कुठे आहे, पुस्तकातील वातावरणाला तो कसा सामोरा जातो यावर बरेचसे अवलंबून आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे मला जो संमोहित करणारा अनुभव आला तो सर्वांनाच येईल याची खात्री मी पामर कशी देणार?

    वेगवेगळ्या ऋतूंचे, त्या ऋतूंमध्ये होणार्‍या सूर्यप्रकाशाच्या खेळांचे, सावल्यांचे, सकाळ-संध्याकाळ-रात्रींचे, पावसांचे, वार्‍यांचे, झाडांचे-पानांचे, त्याने केलेले नेटके वर्णन इतके चपखल असते की काही वाक्यांमध्येच आपल्याला त्या वेळेचा, त्या परिस्थितीचा ‘फील’ येतो. आणि त्याला लगडून येतात अनेक भावना. एकटेपणा किंवा इंग्रजीत bereft म्हणता येईल अशा ठळक भावना आहेतच पण याचबरोबर शब्दांच्या रकान्यांमध्ये चपखल न बसणार्‍या, किंवा भाषेच्या मर्यादेमुळे ज्यांच्यासाठी रकानेच नाहीत अशाही भावना आहेत. कदाचित यामुळेच त्यांचे अस्तित्व नायकलाही बरेचदा नीटसे जाणवत नाही. आपल्यालाही तसेच होते, शब्द मेंदूपर्यंत जातात, अनूभूती येते.

    मी त्याची पुस्तके पुरवून पुरवून वाचतो आहे. नॉर्वेजियन वुडवर टिकमार्क केला. आता सातच कादंबर्‍या शिल्लक आहेत.

  • पाब्लो नेरुदा

    मी शक्यतो आत्मचरित्रे वाचायचं टाळतो. त्यात बहुतेक वेळा ‘मै ही मै हूं, मै ही मै हूं, दूसरा कोई नही’ अशीच परिस्थिती असते. पण काही नावं अशी असतात की जी पाहिल्यावर वाचण्याचा मोह आवरत नाही. यातलं एक नाव – गार्सिया मारक्वेझने ज्याचं वर्णन “The greatest poet of twentieth centuary – in any language” या शब्दांत केलं तो पाब्लो नेरुदा.

    Book Cover of Memoirs by Pablo Neruda

    कधीकधी पाश्चात्त्य लेखकांच्या तुलनेत दक्षिण अमेरिकेतील लेखक आणि कवी अधिक जवळचे वाटतात. याला काही प्रमाणात आपलं भौगोलिक आणि ऐतिहासिक साम्य कारणीभूत असावं. नेरुदा दोनदा भारतात येऊन गेला. पहिल्यांदा आला तेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. इथे आल्यावर त्याने काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला. मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, गांधीजी या सर्वांशी भेट झाली. भारताचं पहिलं दर्शन घडताच त्याला इथल्या पारतंत्र्यात असलेल्या लोकांवर कोणती बंधने आहेत ते सर्वात आधी दिसलं. हा दृष्टीतला फरक आहे. किपलिंगसारख्या लेखकांना हे कधीही जमणार नाही. दुसरी भेट भारत स्वतंत्र झाल्यानंतर होती पण तो अनुभव फारच वाईट होता. आल्याबरोबर कस्टमवाल्यांनी नको इतका त्रास दिला. गुप्त पोलिस सारखे मागे. दिल्लीला नेहरूंची भेट घ्यायला गेल्यानंतर चिलीच्या राजदूताकरवी भारत सरकारने निरोप पाठवला की काम झाल्यानंतर इथून लगेच निघून जा. नेहरू भेटले पण त्यांचं वागणं इतकं तुटक, कोरडं होतं की नेरुदाला इथून कधी जातो असं झालं. भेट झाल्यानंतर त्याने तडक विमान पकडलं आणि भारत सोडला. नेरुदाशी आणखी एक जवळचा धागा म्हणजे पाऊस. चिलीमधला पाऊस आपल्या पावसासारखाच बदाबदा कोसळणारा असतो. (“The southern rain is patient and keeps falling endlessly from the gray sky.”) लहानपणापासूनच नेरुदाचं निसर्गाशी आणि या पावसाशी घट्ट नातं तयार झालं. त्याच्या कवितेमध्ये निसर्ग, प्राणी, पक्षी यांना महत्त्वाचं स्थान आहे. मरण समोर उभं आहे, हा क्षण शेवटचा की पुढचा हे माहीत नाही असे प्रसंग नेरुदाच्या आयुष्यात अनेकदा आले. एकदा उरुग्वेमध्ये नेरुदाचं कवितावाचन चालू होतं आणि पहिल्याच रांगेत एक उच्चपदस्थ पोलिस अधिकारी बसला होता. सर्वात मागच्या रांगेत चार लोकांनी नेरुदावर मशीनगन रोखून धरलेल्या. कार्यक्रम संपल्यावर त्याला सांगितलं की जर तो अधिकारी मध्येच उठून गेला असता तर गोळ्या सुटल्या असत्या. रोजच्या रोज मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून बघितल्यानंतर निर्माण होणारी कविता लखलखत्या विजेसारखी असली तर त्यात नवल ते काय?

    दक्षिण अमेरिकेतील परिस्थिती कशी होती आणि कशी आहे याची कल्पना करणं अशक्य आहे. एक अर्जेंटिनाचा मित्र होता, योगायोगानं त्याचं नावही पाब्लो होतं. एकदा इंग्लंडमध्ये फुटबॉल मॅचनंतर चेंगराचेंगरी झाली आणि काही लोक मेले. पाब्लो ते वाचून हसायला लागला. मी कारण विचारलं तर म्हटला, “ही लुटूपुटीची लढाई आहे. अर्जेंटिनात मॅचला जाताना दोन्ही बाजूचे लोक पिस्तूल आणि रायफली घेऊन जातात. भांडण झालं तर दोन्हीकडून गोळ्या सुरू.” कमालीचं दारिद्र्य, लोकशाही, सरकार फक्त नावाला आणि त्यातही सरकारच्या विघातक कारवायांना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा पाठिंबा. अशा परिस्थितीत तिथले लोक कम्युनिस्ट झाले यात फारसं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. नेरुदा उघड उघड कम्युनिस्ट आणि सोशालिस्ट होता. आयुष्यभर कम्युनिस्ट विचारसरणीच्या तत्त्वांचं त्याने कसोशीने पालन केलं. (आणि यासाठी आयुष्यभर सीआयए आणि एफबीआय त्याच्या पाळतीवर राहिले.) त्याचा हा प्रवास बघताना कम्युनिस्ट विचारसरणीला त्या काळात, त्या खंडात का पर्याय नव्हता हे कळतंच, पण त्याचबरोबर डाव्या विचारसरणीचे मूलभूत दोषही समोर येतात. पोलिटब्युरोला सर्व सत्ता देताना सर्वोच्च अधिकारी सचोटीने वागतील हे गृहीत धरलेलं असतं, पण तसं झालं नाही तर काय करायचं याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. नेरुदा रशियातील नेत्यांची भरपूर स्तुती करतो मात्र स्टालिनने जे असंख्य निरपराध लोक मारले त्यांच्याबद्दल अवाक्षरही काढत नाही. चीनमध्ये ‘कल्चरल रिव्होल्युशन’ झाल्यानंतर जी मुस्कटदाबी झाली त्याबद्दल मौन पाळतो. फक्त शेवटी स्टालिनबद्दल बोलताना ‘आमच्या काही चुका झाल्या आणि कठोर आत्मपरीक्षणानंतर आम्हाला त्या सुधारता येतील’ अशी मोघम कबुली देतो. हे वाचून नवल वाटतं. इतर सर्व बाबतीत इतका सच्चा असणारा माणूस या बाबतीत अचानक ‘नरो वा कुंजरोवा’ का होतो?

    दुसरं महायुद्ध सुरू होण्याआधी स्पेनमधील यादवी युद्धानंतर जवळजवळ पाच लाख लोक जीव वाचवून फ्रान्समध्ये पोचले. फ्रेंच सरकारने या लोकांना तुरुंगात आणि कॉन्सन्ट्रेशन कॅंपमध्ये टाकलं. यात स्त्रिया आणि मुलंही होती. तुरुंगातील लोकांना चिलीमध्ये घेऊन येण्यासाठी चिली सरकारने नेरुदाला फ्रान्सला पाठवलं. फ्रेंच अधिकाऱ्यांनी नेरुदाच्या मार्गात शक्य तितके अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनंतर अखेर नेरुदा ‘विनिपेग’ या जहाजाद्वारे निर्वासितांना चिलीला पाठविण्यात यशस्वी ठरला. याच काळात भेटलेल्या असंख्य लोकांच्या अशक्य वाटणाऱ्या घटनांपैकी काही त्याने नोंदवल्या आहेत. स्पेनमध्ये जनरल फ्रॅंकोने सरकारविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर एका पायलटला रोज रात्री काळोखात विमान घेऊन बॉम्ब टाकण्याचे काम दिलं होते. काही दिवस गेल्यानंतर तो कंटाळला. मग त्याने ब्रेल भाषा शिकून घेतली. त्यात नैपुण्य आल्यानंतर बॉम्ब टाकायला जात असताना तो एका हाताने ब्रेलमध्ये लिहिलेली पुस्तके वाचत असे. अशा रीतीने एकीकडे बॉम्ब टाकत असताना त्याने ‘काउंट ऑफ मॉन्ते ख्रिस्तो’ वाचून संपवलं आणि ‘थ्री मस्केटियर्स’ वाचत असताना सरकारचा पराभव झाला. दुसरा किस्सा याहून भारी आहे. स्पेनच्या अन्दालुशियाचा एक कवी जीव वाचवून स्कॉटलंडमध्ये पोचला. त्याला इंग्रजीचं अक्षरही येत नव्हतं. रोज तो एका बारमध्ये जाऊन शांतपणे एका कोपऱ्यात बिअर पीत बसायचा. एक दिवस सगळे गेल्यावर बारच्या मालकाने त्याला बोलावलं आणि दोघं एकत्र प्यायला बसले. हे प्रत्येक रात्री व्हायला लागलं. हळूहळू ते बोलायला लागले, हा स्पॅनिशमध्ये, तो इंग्रजीत. दोघांना एकमेकांचं अक्षरही कळत नव्हतं. शेवटी एक दिवस याला परत स्पेनला जावं लागलं तेव्हा ते एकमेकांना मिठ्या मारून रडले. नंतर तो कवी नेरुदाला म्हटला, “जरी मला त्याचा एक शब्दही समजत नव्हता तरीही मला नेहमी असं वाटायचं की तो काय म्हणतो आहे हे मला कळत होतं आणि मी काय म्हणतो आहे हे त्याला.”

    नेरुदाच्या प्रवासात असंख्य प्रसिद्ध व्यक्ती येऊन जातात. फिडेल कॅस्ट्रो, गार्सिया मारक्वेझ, वॉल्ट व्हिटमन, आर्थर मिलर. चे गिव्हाडाशी त्याची फार गाढ मैत्री नव्हती पण मरताना गिव्हाडाच्या टेबलावर नेरुदांच्या कवितेचं पुस्तक उघडलेलं होतं. एकदा चिलीमध्ये पोलिस पाठलागावर असताना बनावट पासपोर्ट वापरून नेरुदा फ्रान्सला आला. तिथे पोचल्यावर काय करावे हा प्रश्न होता. तेवढ्यात त्याला पिकासो भेटला. तो नुकताच नेरुदावरच व्याख्यान देऊन आला होता. पिकासोने त्याची मदत करण्यासाठी अनेक लोकांना फोन केले आणि त्याला कागदपत्रे मिळवून दिली. आणि हे सगळं होत असताना केवळ आपल्यामुळे पिकासोचा वेळ वाया जातो आहे, त्या वेळात त्याने किती सुंदर चित्रे काढली असती या विचाराने नेरुदाला वाईट वाटत होतं.

    नेरुदाला हस्तिदंती मनोऱ्यात राहून काव्य करणारा कवी नव्हता. नेहमी समाजाच्या सर्वात दुर्लक्षित वर्गाबरोबर राहून, त्यांचं सुखदु:ख जाणून घेणं त्याला आवडे. आणि हे करताना त्याला त्याच्या कवितेचा फार मोठा फायदा झाला. एकदा एका ठिकाणी त्याला कवितावाचनासाठी बोलावलं, पन्नासएक लोक बसले होते. सर्वांचे चेहरे दगडासारखे, कोणतेही भाव नाहीत. त्या लोकांकडे बघून यांच्यासमोर काय बोलायचं असा त्याला प्रश्न पडला. पण आता बोलावलंच आहे तर एक-दोन कविता वाचू आणि सटकू असा त्याने विचार केला. कविता वाचायला सुरुवात केल्यावर लोकांचे चेहरे बघून त्यांच्यापर्यंत हे पोचतं आहे ही त्याला जाणीव झाली. तासाभरापेक्षा जास्त वेळ कवितावाचन केल्यावर तो थांबला. प्रेक्षकातला एकजण उठून उभा राहिला – फाटके कपडे, कमरेला एक पोतं गुंडाळलेलं – आणि म्हणाला,”आजपर्यंत हृदय हेलावून टाकणारं असं काही आम्ही ऐकलं नव्हतं. आमच्या सर्वांकडून अनेक धन्यवाद.” त्याला हुंदका आवरेना, इतर लोकही रडत होते. नेरुदा जिथे गेला तिथे त्याच्या शब्दांनी लोकांना जिंकून घेतलं. नेरुदाच्या कवितेमध्ये ही अभूतपूर्व ताकद आहे याचं एक कारण त्याच्या भाषेबद्दलच्या दृष्टिकोनात सापडतं. “Using language like clothes or the skin on your body, with its sleeves, it’s patches, it’s transpiration, and it’s blood and sweat stains, that’s what shows a writer’s mettle.”

    आत्मचरित्र काहीसं विस्कळीत आहे आणि याचं कारण म्हणजे याचं संपादन करायला नेरुदाला वेळ मिळाला नाही. शेवटच्या पानावर तो लिहितो, “I am writing these quick lines for my memoirs only three days after the unspeakable events took my comrade, President Allende, to his death. His assassination was hushed up, he was buried secretly, and only his widow was allowed to accompany that immortal body.” यानंतर दहा-बारा दिवसातच नेरुदाचाही मृत्यू झाला. त्या वेळी मृत्यूचं कारण कॅन्सर असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र नेरुदाचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असल्याचा आणि यात एका सीआयएच्या डबल एजंटचा हात असल्याचा संशय नुकताच व्यक्त करण्यात आला. यासाठी त्याची शवपेटी पुन्हा उघडण्यात येऊन डीएनए परीक्षण करण्यात येणार असल्याचं वृत्त आहे.

    नेरुदा मनस्वी कवी होता. त्याची कविता व्याकरणाच्या नियमांमध्ये कधीच बंदिस्त झाली नाही. समीक्षक त्याची कविता वास्तववादी आहे की गूढवादी आहे याची चर्चा करत बसतात. तो उत्तर द्यायच्या भानगडीत कधीच पडला नाही. आणि कविता करताना सामाजिक बांधिलकी तो कधीही विसरला नाही. ‘पार्टी’ मध्ये महेश एलकुंचवारांनी कलाकाराची सामाजिक जबाबदारी काय असावी हा मूलभूत प्रश्न विचारला आहे. याचं एक उत्तर आपल्याला नेरुदाच्या आयुष्यातून मिळतं. नेरुदासाठी कविता ही केवळ अभिव्यक्ती न राहता सामाजिक परिवर्तनाचं एक प्रभावी साधन होतं. आणि याच कारणासाठी त्याला आयुष्यभर वेगवेगळ्या शत्रूंशी लढा द्यावा लागला. त्याची कविता दाबून टाकण्याचे, तिला मुळापासून नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न झाले पण त्यांना न जुमानता आजही त्याची कविता जिवंत आहे.

    “But poetry has not died, it has cat’s nine lives. They harass it, they drag it through the streets, the spit on it and make it the butt of their jokes, they try to strangle it, drive it into exile, throw it into prison, pump lead into it, and it survives every attempt with a clear face and a smile as bright as grains of rice.”

    —-

    १. दोन वर्षं झाली पॉल थरूचं ‘द एलेफंटा स्युट’ आणल्याला. मुखपृष्ठावरचा संडे टाइम्सचा ब्लर्ब आहे, “A terrific teller of tales and conjurer of exotic locales.” आणि कथा घडते कुठे तर मुंबईत. शिरां पडलां त्यांच्या तोंडार तो! दीडशे वर्षं इथे राहून खजिने लुटून इंग्लंडला नेले आणि अजूनही मुंबई ‘एक्झॉटीक लोकॅल’ वाटते? मुंबईतले लोक काय दिवसभर डुकरांची शिकार केल्यानंतर रोज रात्री दादरला शेकोटी पेटवून त्याभोवती भाले फिरवत नाचतात का? अर्थात यात थरूची चूक नाही, पण ब्लर्ब वाचून पुस्तक अजून तरी उघडावंसच वाटलं नाही.

    २. आपण अमेरिका हा शब्द किती निष्काळजीपणे वापरतो हे पुस्तक वाचल्यानंतर लक्षात आलं. पुस्तकात नेरुदा नेहमी अमेरिका असा उल्लेख करतो पण एकदाही याचा अर्थ यूएसए असा नसतो. हाच अनुभव दक्षिण अमेरिकेतील लोकांशी बोलताना येतो. आपण निष्काळजीपणे अमेरिका म्हणतो आणि ते दुरुस्ती करतात, “यु मीन द यूएस?” अमेरिका या खंडात यात दक्षिण आणि उत्तर अमेरिका दोन्ही येतात. अमेरिकेने इराकवर हल्ला केला असं म्हणताना आपण दक्षिण अमेरिकेच्या चिली, अर्जेंटीना, मेक्सिको, ब्राझील यासारख्या सगळ्या देशांचं अस्तित्व नाकारतो, त्यांना खिजगणतीतही धरत नाही. पूर्वीच्या काळात युरोपमधल्या जेत्यांनी जे प्रत्यक्ष केलं तेच आज आपण शब्दांमधून करत आहोत.

  • आषाढस्य प्रथम दिवसे

    आषाढस्य प्रथम दिवसे

    आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं।
    वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।

    आषाढाच्या पहिल्या दिवशीं बघतो शिखरीं मेघ वांकला,
    टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणूं ठाकला!

    (अनुवाद : शान्ता शेळके)

    आशिया खंडातील मान्सून गेल्या ५० ते ८० लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. चार महिन्यांच्या कडक उन्हाळ्यामध्ये जमिनीवरची हवा तापून वर जाते. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि या जागेत समुद्रावरची थंड आणि ओली हवा येते. भारताच्या तापलेल्या जमिनीवर हे थंड वारे वाहू लागतात. जसजसे हे वारे वर-वर जातात, तसतसं त्यांचं तपमान कमी होतं, वाफेचं पाणी आणि कधीकधी बर्फ होतो आणि पाऊस येतो, गाराही पडतात. महाराष्ट्रात सह्याद्री आणि उत्तरेकडे हिमालय या वार्‍यांना अडवण्यासाठी भिंतीचं काम करतात. इथे पोचण्यासाठी पावसाच्या प्रत्येक थेंबानं हजारो मैलांचा प्रवास केलेला असतो. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र यांच्यामधलं हजारो टन पाणी वाफेच्या रूपानं हा प्रवास करतं. महाराष्ट्रात हे वारे अरबी समुद्रावरून पश्चिमेच्या दिशेने येतात तर उत्तर भारतात बंगालच्या खाडीवरून पूर्व दिशेने येतात. ‘चुपके चुपके चल री पुरवैय्या’ मधली पुरवैय्या म्हणजे हे पूर्व दिशेने येणारे वारे. पुरवैय्या म्हणजे उन्हाळ्यापासून सुटका देणारी शीतलता.

    भारतीय शेतकर्‍यासाठी मान्सून एक वरदान आहे. सिंधू संस्कृतीचा उत्कर्ष होत असताना पर्जन्याला देवतेचं स्थान मिळालं ते याच कारणासाठी. आजही भारतीय कृषीव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. पण मान्सून नेमका कधी येईल ते सांगणं हवामानशास्त्रज्ञांनाही अवघड जातं. याचं कारण मान्सून राजस्थानमधलं तपमान किंवा सिंगापूरमध्ये १० किमी उंचीवर वार्‍याची गती अशा दूरवर पसरलेल्या घटकांवर अवलंबून असतो आणि या सर्व घटकांचं एकमेकांशी असलेलं नातं गुंतागुंतीचं असतं. मान्सून १ जूनला केरळमध्ये येणार असं ढोबळमानाने म्हणता येतं पण कधीकधी तो मे महिन्यातच दाखल झाल्याची उदाहरणं आहेत तर कधी या वर्षी येतो आहे तसा उशिराही येतो. मध्येच एखादं चक्रीवादळ वगैरे आलं तर हे सगळं वेळापत्रक कोलमडूही शकतं. पण तो येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच आपल्या हवामानखात्याचं ब्रीदवाक्य आहे – आदित्यात् जायते वृष्टी: – जोपर्यंत सूर्य आकाशात आहे तोपर्यंत मान्सून येणारच. हे ब्रीदवाक्य काय किंवा ‘नेमेचि येतो पावसाळा’ सारखी म्हण काय – एखादी नैसर्गिक घटना त्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग कसा बनते हेच यातून दिसतं.

    युरोपात पहिल्यांदा गेल्यावर ज्या अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावं लागलं त्यातली एक होती, ‘पाऊस कधीही येऊ शकतो’ हा नियम. खरं सांगायचं तर हे काही झेपलं नाही पण सांगता कुणाला? रोज बीबीसी नाहीतर कुठल्यातरी अशाच सायटीवर हवामानाचा अंदाज बघायचा, स्क्रीन ओला दिसला तर छत्री घ्यायची. पण याहीपेक्षा अवघड म्हणजे त्यांची आणि आपली चांगल्या हवेची कल्पना यात जमीन-अस्मानचा फरक आहे. दहा-बारा महिने कडाक्याची थंडी, मध्येच वादळ, पाऊस, बोचणारे गार वारे हे सगळं सहन केल्यावर निरभ्र आकाश आणि सूर्याची उब हवीशी वाटली नाही तरच नवल. हे शरीराला चांगलं वाटतं, पण मनाला मात्र पटत नाही. लहानपणापासून वर्षातले दहा महीने तीस-चाळीस डिग्रीमध्ये काढणार्‍या भारतीयांना सूर्याचं काय कौतुक असणार? आपली चांगल्या हवेची कल्पना म्हणजे चार महिने ‘तेजोनिधी लोहगोलाने’ खरपूस भाजून काढल्यानंतर येणारा मान्सून.

    हा जो कल्पनांमधला फरक आहे त्याचं प्रतिबिंब बर्‍याच ठिकाणी दिसतं. पाश्चात्य साहित्यामध्ये किंवा चित्रपटांमध्ये औदासिन्यापासून दु:खापर्यंत कोणतीही नकारात्मक भावना दाखवायची असेल तर काळे ढग, वादळ, पाऊस यांचा वापर हमखास केला जातो. म्हणूनच हॅरी पॉटरच्या शेवटच्या दोन चित्रपटांमधलं राखाडी आकाश आणि पाऊस – पुढे येणार्‍या ‘grim’ घटनांची पूर्वसूचना देतात. याउलट हिरो, हिरविण आणि कंपनीचा ईजय झाला की ढग निवळतात आणि सूर्य डोकावतो. ‘यू आर माय सनशाइन’ टाइपची गाणी तिकडे किलोंनी सापडतील. हा न्याय आपल्याकडे लावायचा म्हटला तर आपण सदासर्वदा सुखीच असयला हवं. याउलट इथे पाऊस म्हणजे दिलासा, सुटका, आशा. आपल्याकडच्या चित्रपटांमध्ये सूर्य आशेचं प्रतीक म्हणून फारच मोजक्या ठिकाणी वापरला गेला आहे. चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे सत्यजित रेंचा ‘कांचनजंघा.’ यात शेवटी ढग जाऊन सूर्याची किरणे कांचनगंगा शिखरावर पडतात. अर्थात कथा दार्जिलिंगमध्ये घडत असल्याने हा शेवट कथानकाला साजेसाच आहे. हिंदी चित्रपटांमध्ये सावन किंवा बरखा हे प्रतीक किती वेळा वापरलं गेलं आहे त्याची गणतीच नाही. इथे एक मजेदार कल्पना सुचली. समजा बाकी सगळ्या गोष्टी समान ठेवून युरोप आणि आशिया खंडातील फक्त हवामानाची अदलाबदल झाली असती तर आज काय चित्र दिसलं असतं? गन्स ऍंड रोझेस नी ‘नोव्हेंबर रेन’ ऐवजी काय गायलं असतं? अंतोनियो विवाल्दीने ‘फोर सीझन्स’मध्ये मान्सूनसाठी कोणतं संगीत दिलं असतं? आपल्या अनामिक पूर्वजांनी मल्हार रागाऐवजी बर्फाळ हिवाळ्यासाठी कोणता राग निर्माण केला असता?

    आज महाकवी कालिदास दिन. सुमारे सोळाशे वर्षांपूर्वी लिहीलेल्या मेघदूताच्या सुरूवातीलाच आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख आहे. रामगिरीमध्ये असलेल्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशाकडे बघताला एक काळा ढग दिसतो. कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नसल्यामुळे या श्लोकाचा आधार घेऊन आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासाचा यक्ष ज्या रामगिरीवर होता ते ठिकाण आजच्या नागपूरमधल्या रामटेक गावाजवळ असावे असे मानले जाते. गंमत आहे, कालिदासाला सोळाशे वर्षांपूर्वी आजूबाजूला जे दिसलं असेल त्यातलं आज फार थोडं शिल्लक असावं, पण त्याला जे आकाश दिसलं असेल तेच आपल्यालाही दिसतं आहे.