Author: Raj

  • बावीस हजार वर्षांचा रोमांचक इतिहास – फाउंडेशन मालिका

    १ ऑगस्ट १९४१. २१ वर्षे वयाचा आयझॅक ऍझिमॉव्ह (Isaac Asimov) कोलंबिया विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पी. एचडी. करत होता. त्याचबरोबर ‘अस्टाउंडींग’ नावाच्या ‘सायन्स फिक्शन’ मासिकामध्ये तो लघुकथाही लिहीत होता. नुकतीच ‘नाइटफॉल’ नावाची कथा इतर पाच कथांसोबत मासिकाचा संपादक – जॉन कॅंपबेल – याने स्वीकारली होती. आज एका नवीन कथेबद्दल चर्चा करण्यासाठी त्याला कॅंपबेलने बोलावलं होतं. फक्त एक…

    १ ऑगस्ट १९४१. २१ वर्षे वयाचा आयझॅक ऍझिमॉव्ह (Isaac Asimov) कोलंबिया विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पी. एचडी. करत होता. त्याचबरोबर ‘अस्टाउंडींग’ नावाच्या ‘सायन्स फिक्शन’ मासिकामध्ये तो लघुकथाही लिहीत होता. नुकतीच ‘नाइटफॉल’ नावाची कथा इतर पाच कथांसोबत मासिकाचा संपादक – जॉन कॅंपबेल – याने स्वीकारली होती. आज एका नवीन कथेबद्दल चर्चा करण्यासाठी त्याला कॅंपबेलने बोलावलं होतं. फक्त एक छोटीशी अडचण होती. नवीन कथा कशावर असणार आहे याचा अझिमॉव्हला अजिबात पत्ता नव्हता. आता कॅंपबेलला काय सांगायचं हा मोठाच प्रश्न होता. शेवटी अझिमॉव्हने गिलबर्ट आणि सलिव्हन यांच्या नाटकाचे पुस्तक उघडले आणि जो विषय समोर येईल त्यावर ‘फ्रि असोसिएशन’ (free association) करण्याचा प्रयत्न केला. त्याने जे पान उघडले त्यावर एका राणीचे चित्र होते. राणी – राज्य – सैनिक – रोमन साम्राज्य – गॅलॅक्टिक एम्पायर! बिंगो! गिबनचे प्रसिद्ध ‘डिक्लाइन ऍंड फॉल ऑफ रोमन एम्पायर’ अझिमॉव्हने दोनदा वाचले होते. त्याच धर्तीवर गॅलॅक्टीक एम्पायरची कथा का लिहीता येऊ नये? कॅंपबेलच्या हापिसात पोचेपर्यंत ऍझिमॉव्हच्या डोक्यात कल्पनांची गर्दी झाली होती. कॅंपबेललाही हे कथानक मनापासून आवडले. पुढच्या तासभर दोघांनी मिळून पहिल्या आणि दुसर्‍या गॅलॅक्टिक एम्पायरच्या हजार वर्षांचा आराखडा पक्का केला. यथावकाश या कथा प्रसिद्ध झाल्या आणि दहा वर्षांनी यांचे एकत्रीकरण करून तीन पुस्तकेही निघाली – फाउंडेशन त्रिधारा (Foundation Trilogy) या नावाखाली त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. जागतिक सायन्स फिक्शन परिषदेतील ह्युगो पारितोषिक टोलकिनच्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ (Lord of the Ring) ला न मिळता फाउंडेशन त्रिधारेला देण्यात आले.

    Book cover for Foundation

    फाउंडेशन मालिकांच्या मुळाशी अनेक रोचक कल्पना आहेत. मालिकेचा नायक हरी सेल्डन एक गणितज्ञ आहे. त्याने सायकोहिस्टरी (Psychohistory) नावाची गणिताची एक नवीन शाखा शोधून काढली आहे. सायकोहिस्टरीच्या सहाय्याने आकाशगंगेतील विविध साम्राज्यांचे भविष्य वर्तवता येते. समाजशास्त्राला गणिताचे पाठबळ मिळाले तर जे तयार होईल त्याला सायकोहिस्टरी म्हणता येईल. सायकोहिस्टरीची भाकिते अचूक येण्यासाठी जितकी लोकसंख्या जास्त तितके चांगले. इथे स्टॅटिस्टीकल मेकॅनिक्स (Statistical Mechanics) या पदार्थविज्ञानातील शाखेचा आधार घेतला आहे. शिवाय साम्राज्याला काही कारणांमुळे धोका निर्माण होणार असेल तर तो कसा टाळता येईल यासाठीही सेल्डनने काही तरतुदी करून ठेवलेल्या असतात. या तरतुदींची अंमलबजावणी करता यावी यासाठी त्याने आकाशगंगेच्या दोन टोकांना संस्था निर्माण केलेल्या असतात. सगळ्या आकाशगंगेचे भविष्य ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा या संस्था – फाउंडेशन. सुरूवातीला या कथांचा आवाका इनमिन पाचशे वर्षे होता, वाढता वाढता तो वीस हजार वर्षे झाला. या दीर्घ कालखंडामध्ये अनेक ग्रहांवर अनेक राज्ये आली आणि गेली, नवीन शत्रू निर्माण झाले, अनपेक्षित घटना घडल्या – मात्र सर्व पुस्तकांमध्ये एक दुवा समान राहीला – हरी सेल्डन आणि त्याने केलेली भविष्यवाणी.

    अझिमॉव्हची स्वत:ची अशी एक वेगळी शैली आहे. पात्रांचे मानसिक व्यवहार किंवा गुंतागुंती यामध्ये तो फारसा शिरत नाही. तसेच त्या दिवशी हवा कशी होती, कुणी कोणते कपडे घातले होते यांची पानेच्या पाने वर्णनेही नाहीत. त्यामुळे ज्यांना ‘कॅरॅक्टरायझेशन’ सारख्या गोष्टींची अपेक्षा असते त्यांना ही पात्रे उथळ वाटू शकतात. गंमत अशी आहे की अझिमॉव्हच्या कथांमध्ये मुख्य पात्रे माणसे नाहीत तर अभिनव कल्पना (Ideas) असतात. ‘सायन्स फिक्शन’ आहे म्हणून तीन डोकी आणि चार पाय असलेल्या अफाट जीवांच्या अचाट करामती असले प्रकार नाहीत. किंबहुना युद्ध किंवा मारामारी यांचीही फारशी वर्णने नाहीत. या कथांमध्ये जे सर्व घडते ते आपल्याला फक्त पात्रांच्या संवादांमधून कळते. आणि हा संघर्ष बहुतेक वेळा कल्पनांचा असतो. कुठली कल्पना शास्त्रीय दृष्टीने अधिक व्यापक आहे, कोणती शास्त्रीय संकल्पना तार्किक दृष्टीने परिस्थितीचे अचूक वर्णन करू शकते यावर कथानकाचा सगळा डोलारा अवलंबून असतो. मग कधी ही कल्पना टुरिंग मशीनची असते तर कधी यंत्रमानव विशिष्ट परिस्थितीमध्ये एका माणसाचे हित बघेल की मानवजातीचे असा पेच असतो.ही अझिमॉव्हची खासियत आहे. त्याच्या सर्व कथांचा शास्त्रीय आधार पक्का असतो. ‘सायन्स फिक्शन’ या प्रकारातील सायन्सचा भाग अचूक आणि अभिनव असेल याची तो पूर्ण काळजी घेतो. त्याच्या जादूच्या कथांमध्येही भले राक्षस किंवा ड्रॅगन असोत, पण ते शास्त्रीय नियमांचे उल्लंघन करीत नाहीत.

    फाउंडेशनच्या तीन कादंबर्‍या प्रकाशित झाल्या, गाजल्या आणि अझिमॉव्हवर यावर आणखी लिहा असा दबाव यायला लागला. वाचकांनी विनवण्या, आर्जवे केली, काहींनी तर ‘यावर आणखी लिहीले नाहीत तर परिणाम चांगले होणार नाहीत’ अशा धमक्याही दिल्या. पण कॉनन डॉयलला जसा होम्सचा वीट आला होता तसाच अझिमॉव्हला फाउंडेशनचे नावही ऐकावेसे वाटत नव्हते. हळूहळू प्रकाशक – डबल्सडे सुद्धा याची मागणी करू लागले. अझिमॉव्ह प्रत्येक वेळी काहीतरी सबब काढून टाळायचा. एकदा म्हणाला फाउंडेशनऐवजी मी आत्मचरित्रही लिहायला तयार आहे. ते म्हणाले लिही. या पठ्ठ्याने लिहीलंसुद्धा. १९७३ ते १९८१ अशी आठ वर्षे हुलकावणी दिल्यावर शेवटी डबल्सडेची सहनशक्ती संपली. एके दिवशी त्यांनी अझिमॉव्हला बोलावलं आणि हातात $२५,००० चा चेक ठेवला (इतर पुस्तकांसाठी त्याचा ऍडव्हान्स $३,००० असायचा.) आणि सांगितलं, ‘हे नवीन फाउंडेशन कादंबरीसाठी. बाकीचे पंचवीस कादंबरी झाल्यावर.’ अझिमॉव्ह म्हणाला, ‘पैसे पाण्यात जातील.’ ते म्हणाले, ‘फिकिर नाही.’ बरीच हमरीतुमरी झाल्यावर अखेर त्याने कादंबरी लिहायला घेतली. ‘फाउंडेशन्स एज’ ही चौथी कादंबरी तीस वर्षांनंतर प्रसिद्ध झाली. नंतर आणखी तीन कादंबर्‍या आल्या. १९९२ मध्ये अझिमॉव्हच्या मृत्यूनंतर इतर लेखकांनीही या मालिकेत भर घातली. ‘हिचहायकर्स गाइड टु द गॅलक्सी’ ही डग्लस ऍडम्सची प्रसिद्ध कादंबरी फाउंडेशन मालिकेचे उत्कृष्ट विडंबन आहे.

    ‘सायन्स फिक्शन’ या प्रकाराखाली नेमक्या कोणत्या प्रकारच्या कथा यायला हव्यात याबद्दल बरेचदा संदिग्धता असते. डोरिस लेसिंग किंवा मार्गारेट ऍटवूडसारख्या लेखिकांनी भविष्यकाळातील कथा लिहील्या आहेत, त्याही उत्तम प्रकारे. पण या कथांमध्ये ‘सायन्स’ हा प्रकार चवीपुरताच असतो. या कथा भविष्यकाळात घडतात म्हनून यांना सायन्स फिक्शन म्हणायचं, इतकंच. म्हणूनच कधीकधी अशा कथांना ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ असेही म्हटले जाते. फरक इतकाच की शास्त्रशुद्ध ‘सायन्स फिक्शन’ लिहीणार्‍या अझिमॉव्ह किंवा आर्थर सी. क्लार्कसारख्या लेखकांना उच्च साहित्यिक वर्तुळांमध्ये प्रवेश मिळत नाही. शास्त्रीय संकल्पनांना मध्यवर्ती ठेवून लिहील्या गेलेल्या साहित्याला तितकी प्रतिष्ठा मिळत नाही हे विदारक सत्य आहे. अर्थात या लेखकांचा आणखी एक दोष असा की हे धो-धो लोकप्रिय आहेत. यांच्या कादंबर्‍यांवर वाचकांच्या उड्या पडतात. याचा अर्थ सरळ आहे. हे लेखक इतके लोकप्रिय आहेत म्हणजे नक्कीच यांचा दर्जा फारसा चांगला नसणार. अर्थात अझिमॉव्हची मुलाखत पॅरिस रिव्ह्यू किंवा न्यूयॉर्करमध्ये आली किंवा नाही आली तरी वाचकांना काहीही फरक पडत नाही. आणि ते बरंच आहे.

    परत फाउंडेशन मालिका लिहायला सुरूवात केल्यावर अझिमॉव्हने सायकोहिस्टरीचा उगम कसा झाला आणि आधी काय झालं याच्याविषयी लिहीलं. प्रत्यक्षात बर्‍याच उशिरा लिहीलेली ‘प्रिल्यूड टू फाउंडेशन’ (Prelude to Foundation) ही कादंबरी क्रमाने पहिली येते. खरं सांगायचं तर मी अजूनही मालिकेतील सर्व पुस्तके वाचलेली नाहीत कारण सातच पुस्तके आहेत, पुरवून पुरवून वाचत होतो. आता उरलेलीही वाचून टाकायला हवीत असं वाटायला लागलं आहे. एक मात्र खात्री आहे, अझिमॉव्हची शैली कितीही परिचित असली तर शेवटी तो धोबीपछाड टाकणार आणि आपली त्यात सपशेल मात होणार. त्याने हुशारीने कथानकाला दिलेल्या या कलाटण्या या मालिकांचा उच्च बिंदू ठराव्यात.

    कथा वाचताना ही म्हण लक्षात ठेवावी, ‘दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं.’ अर्थात उपयोग होणार नाहीच. 🙂

    —-

    १. ‘गॅलक्सी’ साठी मराठीत दोन शब्द आहेत. आकाशगंगा आणि दिर्घिका. मात्र गॅलॅक्टीक साठीही दिर्घिका शब्द दिला आहे जो बरोबर वाटत नाही. शिवाय ‘दिर्घिका साम्राज्य’ कैच्याकै वाटते. तीच गत ‘गांगेय’ ची. ‘गांगेय साम्राज्य’ म्हटलं तर इ.स.पू. ४९७ मध्ये पाटलीपुत्रच्या आसपास एखाद्या मठात पिवळी वस्त्रे नेसून काही गंभीर चेहरे महासीहनाद सुत्तावर चर्चा करत आहेत असं दृश्य डोळ्यासमोर येतं.

    २. यालाही दोन प्रतिशब्द आहेत आणि दोन्ही बोजड आहेत. सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र आणि सांख्यिकी यामकी. समजा या विषयात एखादा लेख लिहायचा आहे आणि त्यात हे शब्द पन्नास वेळा वापरले तर वाचायला कसं वाटेल? सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र… चार वेळा म्हणता म्हणता माझा ‘कच्चा पापड पक्का पापड’ झाला.

    ३. फाउंडेशन मालिकेनंतर अझिमॉव्हची यंत्रमानव मालिका (Robot Series) सर्वात गाजली. यंत्रमानवांसाठी त्याने मांडलेले चार नियम प्रसिद्ध आहेत.

  • दो काफी

    मला चहाचे व्यसन आहे. चेटकिणीचा जीव जसा दूर ठेवलेल्या पोपट किंवा तत्सम पक्ष्यात असायचा तसा माझा जीव चहाच्या एका कपात आहे. दिल्लीला जाताना रात्री दोन वाजता, मध्यप्रदेशात कुठेतरी नकाशावर अस्तित्व नसलेल्या एका गावातल्या टपरीवर, अर्धवट झोपेत असलेल्या भैयाच्या हातचा चहा पिताना जे वाटलं त्यालाच ज्ञानी लोक ब्रम्ह वगैरे म्हणत असावेत. अशी ‘मागची बॅकग्राउंड’ असताना, इटलीत…

    मला चहाचे व्यसन आहे. चेटकिणीचा जीव जसा दूर ठेवलेल्या पोपट किंवा तत्सम पक्ष्यात असायचा तसा माझा जीव चहाच्या एका कपात आहे. दिल्लीला जाताना रात्री दोन वाजता, मध्यप्रदेशात कुठेतरी नकाशावर अस्तित्व नसलेल्या एका गावातल्या टपरीवर, अर्धवट झोपेत असलेल्या भैयाच्या हातचा चहा पिताना जे वाटलं त्यालाच ज्ञानी लोक ब्रम्ह वगैरे म्हणत असावेत. अशी ‘मागची बॅकग्राउंड’ असताना, इटलीत आल्यावर पंचाईत झाली. इटालियन लोकांना ज्या गोष्टींचा अभिमान आहे त्यातल्या काही म्हणजे वाईन, कुझीन, सॉकर, अरमानी आणि कफ्फे. मला आपली वर्षा-सहा महिन्यातून एकदा कधीतरी हाटेलात ‘दो काफी’ चा ओरडा झाल्यावर मिळते, त्या गोड, सौम्य ‘काफी’ची सवय. पण इटालियन कफ्फेची गोष्टच निराळी.

    कफ्फेचे एकूण प्रकार मी अजूनही मोजतो आहे. सर्वात पहिला कफ्फे नोर्माले : बोटभर उंचीच्या कपात जेमतेम अर्धा कप कडू कॉफी. नोर्मालेलाच एसप्रेस्सोही म्हणतात. यात किंचित वाफाळलेले दूध घातले तर माकियातो पण दुधावरचा फेस घातला तर माकियातो कॉन स्क्यूमो. याउलट आधी दूध घेऊन त्यात एक विशीष्ट रंग येईपर्यंत कॉफी टाकून तयार होते लात्ते मकियातो. यालाच कफ्फे लात्तेही म्हणतात. नोर्मालेमध्ये फेसाळलेले दूध घालून मोठया कपात सर्व्ह केले बनते कापुचो. कापुचो नेहेमी ब्रेकफ़ास्टसाठी घेतात, पण लंच किंवा डिनरनंतर कधीच नाही. फेसाळलेले, पण छोट्या कपभर दूध घालून, वर कोकोची फोडणी दिली तर होते स्पेचाले किंवा मोरोक्कीनो. याउलट कफ्फेमध्ये विविध प्रकारची लिकर्स घालून बनते ‘कोरेत्तो’. आणि कमी पाणी घालून केलेली अजून तीव्र नोर्माले म्हणजे स्त्रेत्तो.

    बार्लीपासून बनवलेल्या कॉफीला म्हणतात कफ्फे द्’ओर्झो. ह्याची चव म्हणजे, थंडी, ताप, खोकला आणि शिवाय पोटही बिघडले आहे, असे ऐकल्यावर पाटणकर वैद्य जो काढा देतील त्याच्याशी मिळतीजुळती असते. हे झाले बेसिक प्रकार. याशिवाय इंडियन करी जशी प्रांतानुसार बदलते, तशाच इटलीमध्ये प्रांतानुसार कॉफी बीन्स आणि बनवण्याच्या पद्धती बदलतात.

    मी पहिल्यांदा दिवसाला २ कफ्फे घेत असे. सकाळी कापुचिनो, दुपारी कफ्फे नोर्माले. पण रात्री घुबडाप्रमाणे टक्क जागे रहायची वेळ आल्यावर लक्षात आले की धिस इज नॉट माय कप ऑफ कफ्फे. पण कापुचिनोची चव आवडायची. मग एका मित्राने उपाय सांगितला…डीकॅफ. तेव्हापासून मी ‘कापुचो देका’ घ्यायला लागलो आणि झोप परत आली.

    याउलट अनुभव आला तो अमेरिकन स्टारबक्समध्ये. अमेरिकन लोकांनी ज्या गोष्टींची वाट लावली आहे, त्याला कॉफी अपवाद नाही. तिथे कॉफी मागितल्यावर त्याने सढळ हाताने बनवलेल्या कॉफीचा सुपरमग हातात दिला. एक कप कॉफीएवजी, पहेलवानाला देतात तसा पावशेर दुधाचा खुराक पाहून मी सर्द झालो. मग पुढचा पाऊण तास मी मोजलेल्या युरोंशी प्रामाणिक रहात, त्या क्षीरसागराशी झटापट करीत होतो. शेवटी सदुसष्ट बॉल खर्ची घालून अकरा धावा काढल्यावर, सेकंड स्लिपला प्रॅक्टीस कॅच देऊन, फलंदाज जसा मान खाली घालून परततो, तसा तिथून बाहेर पडलो.

    कुणाला कुठल्या गोष्टीतून समाधान मिळेल हे सांगणे महाकठीण. उत्तर इटलीकडच्या द्राक्षांपासून बनवलेल्या ‘ब्लड रेड’ कियांती क्लासिकोचा पेला, बरोबर ब्रेडचे तुकडे, जोडीला पूर्ण न शिजवलेला, टोमॅटो सॉस आणि मोझ्झारेल्ला चीज घातलेला पास्ता, ऑलीव्हच्या तेलात तळलेले मीटचे तुकडे (शाकाहारी असाल तर बटाट्याचे काप) आणि शेवटी चविष्ट असे तिरामिसू, अशी जंक्शान मेजवानी झाल्यानंतर एक कप कफ्फे घेतली की इटालियन माणूस देह ठेवायला मोकळा होतो.

  • ऑल द प्रेसिडेंट्स मेन

    चित्रपट पांढर्‍या पार्श्वभूमीवर सुरु होतो. कदाचित पांढरा पडदा असावा किंवा दुसरे काही, अंदाज येत नाही. पाच सेकंद, दहा, पंधरा काहीच होत नाही. शेवटी वैतागून आपण चुळबूळ करायला लागतो तेवढ्यात बंदुकीतून गोळी सुटल्यासारखा आवाज येतो, कॅमेरा फोकस होतो आणि पडद्यावर J हे अक्षर उमटते. आपण टंकलेखन क्लोजअप मध्ये बघतो आहोत हे लक्षात येता येता ओळ टंकीत…

    चित्रपट पांढर्‍या पार्श्वभूमीवर सुरु होतो. कदाचित पांढरा पडदा असावा किंवा दुसरे काही, अंदाज येत नाही. पाच सेकंद, दहा, पंधरा काहीच होत नाही. शेवटी वैतागून आपण चुळबूळ करायला लागतो तेवढ्यात बंदुकीतून गोळी सुटल्यासारखा आवाज येतो, कॅमेरा फोकस होतो आणि पडद्यावर J हे अक्षर उमटते. आपण टंकलेखन क्लोजअप मध्ये बघतो आहोत हे लक्षात येता येता ओळ टंकीत झालेली असते June 1, 1972.

    हा प्रसंग आहे ऑल द प्रेसिडेंट्स मेन ह्या चित्रपटाच्या सुरवातीचा. १९७२ ते १९७४ ही वर्षे अमेरिकेच्या इतिहासात विशेष ठरावीत. ह्याला कारण होते रिपब्लिकन राजवटीतील वॉटरगेट प्रकरण. १९७२ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयात घुसल्याच्या आरोपाखाली पाच लोकांना अटक झाली. हे पाचही लोक अमेरिकन गुप्तहेर संस्था सी. आय. ए. शी संबंधीत होते. त्यांच्याजवळ वॉकीटॉकी, फोन-टॅपिंगचे साहित्य अशी गुप्तहेरांच्या कामासाठी वापरली जाणारी उपकरणे सापडली. वृत्तपत्रांनी या घटनेकडे फारसे गंभीरपणे पाहीले नाही. अपवाद होते वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचे दोन वार्ताहर : कार्ल बर्नस्टीन आणि बॉब वुडवर्ड. यापैकी बॉबला कामावर रूजू होऊन उणेपुरे नऊ महीने झाले होते. कार्ल त्यामानाने अनुभवी होता. तपास घेताना ह्या प्रकरणात सत्तारुढ रिपब्लिकन पक्षाने सी. आय. ए, एफ. बी. आय. आणि जस्टीस या सरकारी संघटनांचा वापर डेमोक्रॅटिक पक्षातील लोकांवर पाळत ठेवणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांची निवडणुकीत हरप्रकारे मुस्कटदाबी करणे अशासाठी केल्याचे उघडकीस आले. ह्या प्रकरणाची परिणिती अखेर राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या राजीनाम्यात झाली. अमेरिकन राजकारणातील हा एक नीचतम बिंदू होता. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी या दोन पत्रकारांनी जे अथक परिश्रम केले त्याची कहाणी आहे हा चित्रपट. ह्याचा आधार आहे त्यांनी लिहिलेले ह्याच नावाचे पुस्तक.

    ह्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे हॉलीवूडमध्ये तयार होऊनही ह्यावर हॉलीवूडची छाप नाही. सर्व प्रसंग कृत्रिम नाट्यमयता न आणता नैसर्गिकरीत्या चित्रित केले आहेत. असे असूनही उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते. तुरळक अपवाद वगळता कुठल्याही प्रसंगात कॅमेरा फिरत नाही. खुर्चीच्या पायांमधून किंवा भिंगोर्‍या खेळल्याप्रमाणे गोल फिरत कॅमेर्‍याच्या कोलांट्याउड्या न मारतादेखील दिग्दर्शक कसा ‘दिसू’ शकतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण. एक-दोन प्रसंगात कॅमेरा या दोघांपासून झूम-आऊट होत लॉग शॉटमध्ये शहराच्या विशालकाय इमारतींवर स्थिरावतो, एका बाजूला विशाल सत्ता आणि दुसर्‍या बाजूला दोन माणसे यातील विरोधाभास सूचित करणारा. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे कमीत कमी पार्श्वसंगीत. नेहमी ऐकू येतो तो टंकलेखन यंत्रांचा खडखडाट. त्यामुळेच क्लायमॅक्सच्या वेळी वापरलेले विवाल्दीचे संगीत अत्यंत परिणामकारक ठरते.

    या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ऍलन पाकुला. वुडवर्ड आणि बर्नस्टीन यांच्या भूमिकेत अनुक्रमे रॉबर्ट रेडफोर्ड आणि डस्टीन हॉफमन आहेत. याशिवाय रेडफोर्ड पाकुलाबरोबर सहनिर्माताही होता. या चित्रपटाच्या कल्पनेपासून शेवटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेडफोर्डचा महत्त्वाचा वाटा आहे. याचे चित्रीकरण आधी वॉशिंग्टन पोस्टच्या कार्यालयात करायचे ठरले होते. पण ते अशक्य आहे असे दिसल्यावर ह्या चमूने या वृत्तपत्राची आख्खी न्यूजरुम जशीच्या तशी स्टुडिओत उभी केली. अगदी कचरापेटीतील कचराही मूळ कार्यालयातून आणलेला होता. चित्रपटात कुठलीही राजकारणी व्यक्ती प्रत्यक्ष दिसत नाही. फक्त फोनवरून त्यांचे आवाज ऐकू येतात. याशिवाय काही ठिकाणी निक्सन आणि इतरांच्या दूरचित्रवाणीवरील फिती वापरल्या आहेत.

    या चित्रपटाचे चित्रीकरण दिग्दर्शक होते गॉडफादर चित्रित करणारे गॉर्डन विलीस. त्यांची खासियत म्हणजे कमी प्रकाशातील चित्रीकरण. यासाठीच त्यांचे ‘प्रिंस ऑफ डार्कनेस’ हे टोपणनाव पडले. या चित्रपटात प्रामुख्याने दोन ठिकाणी घडणारे प्रसंग आहेत. एकतर न्यूजरूम मध्ये किंवा बाहेर. बाहेर घडणार्‍या गोष्टी पडद्याआड आहेत, त्यातले खरे किती, खोटे किती हे माहीत नाही. याउलट न्यूजरूममध्ये आहे कठोर सत्य. ह्याला अनुसरून विलीस यांनी बाहेरचे बहुतेक सर्व प्रसंग कमी प्रकाशात किंवा जवळजवळ अंधारात चित्रित केले आहेत. आणि न्यूजरूममध्ये आहे भावनाविरहीत, फ्लूरोसंट असा प्रखर प्रकाश. या दोन्हींचा विरोधाभास खूपच प्रभावी झाला आहे.

    पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा रेडफोर्ड किंवा हॉफमन यांच्या अभिनयाकडे फारसे लक्ष गेले नाही. कारण हा अभिनय होता हे कुठे जाणवलेच नाही, इतका तो नैसर्गिक होता. परत बघितला तेव्हा त्यांच्या अभिनयातील विविध बारकावे लक्षात येऊ लागले. हॉफमन/बर्नस्टीन सतत सिगरेट पिणारा, नर्व्हस एनर्जीने भरलेला, तथ्यांपेक्षा ‘गट फिलींग’वर जास्त विश्वास ठेवणारा. याउलट रेड्फोर्ड/वुडवर्ड शांत, मितभाषी, डोक्याने काम करणारा. दोघांमधील समान गोष्ट म्हणजे हार न मानता अथक परिश्रम करण्याची वृत्ती. कार्ल आणि बॉब यांचे स्वभाव, त्यांच्या लकबी, त्यांची एकमेकांशी वागण्याची पद्धत ह्या सर्वांची इत्थंभूत माहिती त्या दोघांकडून घेतली गेली होती. यासाठी रेडफोर्ड आणि हॉफमन यांनी त्या दोघांबरोबर बराच काळ व्यतीत केला. प्रसंगांशी पूर्णपणे तन्मय होण्यासाठी रेडफोर्ड आणि हॉफ़मन यांनी स्वतःच्या संवादांबरोबर एकमेकांचेही संवाद पाठ केले होते.

    ह्या चित्रपटातील बरेच प्रसंग लक्षात राहतात. माझा सर्वात आवडता प्रसंग रेडफोर्डचा आहे. वुडवर्डला बर्नस्टीनचा फोन येतो की वॉटरगेटमध्ये पकडलेल्या चोरट्यांपैकी एकाच्या बॅंक अकाउंटमध्ये केनेथ डॉलबर्ग या नावाने एक चेक आहे. वुडवर्ड त्याच्या टेबलासमोर येऊन बसतो. कॅमेरा मिड-शॉट, मागची ऑफिसातली गडबड आपल्याला दिसते. डॉलबर्गला फोन लागतो. तो प्रेसिडेंट रिइलेक्शन कमिटीचा मिडवेस्ट फायनान्स चेअरमन आहे हे कळते, पण त्याला चेकबद्दल विचारल्यावर तो फोन कट करतो. वुडवर्ड अस्वस्थ होतो, काय करावे याच्या विचारात. कॅमेरा अत्यंत हळूहळू पुढे सरकतो आहे. मग तो प्रेसिडेंट रिइलेक्शन कमिटीला फोन लावतो. तिथे कमिटी प्रमुख टाळाटाळीची उत्तरे देतो. त्याच्याशी वादावादी चालू असतानाच दुसर्‍या लाइनवर परत डॉलबर्गचा फोन येतो. त्याला एक सेकंद थांबायला सांगून वुडवर्ड कमिटी चेअरमनला वाटेला लावतो आणि परत डॉलबर्गकडे. कॅमेरा आता क्लोजअपमध्ये. डॉलबर्ग माहिती देत असतो. महत्त्वाचा प्रश्न, “तुमच्या नावाचा चेक चोरट्यांच्या अकाउंटमध्ये कसा आला?” “मी खरंतर हे तुम्हाला सांगायला नको.” वुडवर्डच्या चेहेर्‍यावर उत्कंठा, अपेक्षा अशा अनेक भावनांचा कल्लोळ. “मी तो चेक स्टॅंझ यांना दिला.” “आय बेग युअर पार्डन???” वुडवर्ड खुर्चीतून खाली पडायचा बाकी असतो. स्टॅंझ म्हणजे निक्सन यांच्या अर्थखात्याचे प्रमुख. हे प्रकरण इतक्या वरपर्यंत जाईल असे त्याच्या स्वप्नातही नसते. फोन संपवून तो घाईघाईने बातमी टंकित करत असतानाच परत बर्नस्टीनचा फोन येतो. वुडवर्ड त्याला ही आनंदाची बातमी देतो आणि शॉट संपतो. तब्बल पावणेसहा मिनिटांचा सलग शॉटमध्ये रेडफोर्डचा नैसर्गिक अभिनय. एका ‘मस्ट सी’ चित्रपटातील हा ‘मस्ट ऑब्झर्व्ह’ शॉट आहे.

    चित्रपटाच्या शेवटी या दोघांना कळते की हे प्रकरण राष्ट्राध्यक्षांपर्यंत गेलेले आहे, पण अजून पुरावे मिळायचे बाकी असतात. दूरचित्रवाणी संचावर नुकत्याच निवडून आलेल्या निक्सन यांचा शपथविधी चाललेला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वुडवर्ड आणि बर्नस्टीन टंकलेखन करताना. शेवटच्या शॉटमध्ये परत टंकलेखन यंत्राचा क्लोज-अप आणि धडधड टंकित होणार्‍या वॉशिंग्टन पोस्टच्या हेडलाइन्स. शेवटची हेडलाईन.. “निक्सन रिझाइन्स” आणि चित्रपट संपतो.