बावीस हजार वर्षांचा रोमांचक इतिहास – फाउंडेशन मालिका

१ ऑगस्ट १९४१. २१ वर्षे वयाचा आयझॅक ऍझिमॉव्ह (Isaac Asimov) कोलंबिया विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पी. एचडी. करत होता. त्याचबरोबर ‘अस्टाउंडींग’ नावाच्या ‘सायन्स फिक्शन’ मासिकामध्ये तो लघुकथाही लिहीत होता. नुकतीच ‘नाइटफॉल’ नावाची कथा इतर पाच कथांसोबत मासिकाचा संपादक – जॉन कॅंपबेल – याने स्वीकारली होती. आज एका नवीन कथेबद्दल चर्चा करण्यासाठी त्याला कॅंपबेलने बोलावलं होतं. फक्त एक…

१ ऑगस्ट १९४१. २१ वर्षे वयाचा आयझॅक ऍझिमॉव्ह (Isaac Asimov) कोलंबिया विद्यापीठात रसायनशास्त्रामध्ये पी. एचडी. करत होता. त्याचबरोबर ‘अस्टाउंडींग’ नावाच्या ‘सायन्स फिक्शन’ मासिकामध्ये तो लघुकथाही लिहीत होता. नुकतीच ‘नाइटफॉल’ नावाची कथा इतर पाच कथांसोबत मासिकाचा संपादक – जॉन कॅंपबेल – याने स्वीकारली होती. आज एका नवीन कथेबद्दल चर्चा करण्यासाठी त्याला कॅंपबेलने बोलावलं होतं. फक्त एक छोटीशी अडचण होती. नवीन कथा कशावर असणार आहे याचा अझिमॉव्हला अजिबात पत्ता नव्हता. आता कॅंपबेलला काय सांगायचं हा मोठाच प्रश्न होता. शेवटी अझिमॉव्हने गिलबर्ट आणि सलिव्हन यांच्या नाटकाचे पुस्तक उघडले आणि जो विषय समोर येईल त्यावर ‘फ्रि असोसिएशन’ (free association) करण्याचा प्रयत्न केला. त्याने जे पान उघडले त्यावर एका राणीचे चित्र होते. राणी – राज्य – सैनिक – रोमन साम्राज्य – गॅलॅक्टिक एम्पायर! बिंगो! गिबनचे प्रसिद्ध ‘डिक्लाइन ऍंड फॉल ऑफ रोमन एम्पायर’ अझिमॉव्हने दोनदा वाचले होते. त्याच धर्तीवर गॅलॅक्टीक एम्पायरची कथा का लिहीता येऊ नये? कॅंपबेलच्या हापिसात पोचेपर्यंत ऍझिमॉव्हच्या डोक्यात कल्पनांची गर्दी झाली होती. कॅंपबेललाही हे कथानक मनापासून आवडले. पुढच्या तासभर दोघांनी मिळून पहिल्या आणि दुसर्‍या गॅलॅक्टिक एम्पायरच्या हजार वर्षांचा आराखडा पक्का केला. यथावकाश या कथा प्रसिद्ध झाल्या आणि दहा वर्षांनी यांचे एकत्रीकरण करून तीन पुस्तकेही निघाली – फाउंडेशन त्रिधारा (Foundation Trilogy) या नावाखाली त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. जागतिक सायन्स फिक्शन परिषदेतील ह्युगो पारितोषिक टोलकिनच्या ‘लॉर्ड ऑफ द रिंग’ (Lord of the Ring) ला न मिळता फाउंडेशन त्रिधारेला देण्यात आले.

Book cover for Foundation

फाउंडेशन मालिकांच्या मुळाशी अनेक रोचक कल्पना आहेत. मालिकेचा नायक हरी सेल्डन एक गणितज्ञ आहे. त्याने सायकोहिस्टरी (Psychohistory) नावाची गणिताची एक नवीन शाखा शोधून काढली आहे. सायकोहिस्टरीच्या सहाय्याने आकाशगंगेतील विविध साम्राज्यांचे भविष्य वर्तवता येते. समाजशास्त्राला गणिताचे पाठबळ मिळाले तर जे तयार होईल त्याला सायकोहिस्टरी म्हणता येईल. सायकोहिस्टरीची भाकिते अचूक येण्यासाठी जितकी लोकसंख्या जास्त तितके चांगले. इथे स्टॅटिस्टीकल मेकॅनिक्स (Statistical Mechanics) या पदार्थविज्ञानातील शाखेचा आधार घेतला आहे. शिवाय साम्राज्याला काही कारणांमुळे धोका निर्माण होणार असेल तर तो कसा टाळता येईल यासाठीही सेल्डनने काही तरतुदी करून ठेवलेल्या असतात. या तरतुदींची अंमलबजावणी करता यावी यासाठी त्याने आकाशगंगेच्या दोन टोकांना संस्था निर्माण केलेल्या असतात. सगळ्या आकाशगंगेचे भविष्य ज्यांच्यावर अवलंबून आहे अशा या संस्था – फाउंडेशन. सुरूवातीला या कथांचा आवाका इनमिन पाचशे वर्षे होता, वाढता वाढता तो वीस हजार वर्षे झाला. या दीर्घ कालखंडामध्ये अनेक ग्रहांवर अनेक राज्ये आली आणि गेली, नवीन शत्रू निर्माण झाले, अनपेक्षित घटना घडल्या – मात्र सर्व पुस्तकांमध्ये एक दुवा समान राहीला – हरी सेल्डन आणि त्याने केलेली भविष्यवाणी.

अझिमॉव्हची स्वत:ची अशी एक वेगळी शैली आहे. पात्रांचे मानसिक व्यवहार किंवा गुंतागुंती यामध्ये तो फारसा शिरत नाही. तसेच त्या दिवशी हवा कशी होती, कुणी कोणते कपडे घातले होते यांची पानेच्या पाने वर्णनेही नाहीत. त्यामुळे ज्यांना ‘कॅरॅक्टरायझेशन’ सारख्या गोष्टींची अपेक्षा असते त्यांना ही पात्रे उथळ वाटू शकतात. गंमत अशी आहे की अझिमॉव्हच्या कथांमध्ये मुख्य पात्रे माणसे नाहीत तर अभिनव कल्पना (Ideas) असतात. ‘सायन्स फिक्शन’ आहे म्हणून तीन डोकी आणि चार पाय असलेल्या अफाट जीवांच्या अचाट करामती असले प्रकार नाहीत. किंबहुना युद्ध किंवा मारामारी यांचीही फारशी वर्णने नाहीत. या कथांमध्ये जे सर्व घडते ते आपल्याला फक्त पात्रांच्या संवादांमधून कळते. आणि हा संघर्ष बहुतेक वेळा कल्पनांचा असतो. कुठली कल्पना शास्त्रीय दृष्टीने अधिक व्यापक आहे, कोणती शास्त्रीय संकल्पना तार्किक दृष्टीने परिस्थितीचे अचूक वर्णन करू शकते यावर कथानकाचा सगळा डोलारा अवलंबून असतो. मग कधी ही कल्पना टुरिंग मशीनची असते तर कधी यंत्रमानव विशिष्ट परिस्थितीमध्ये एका माणसाचे हित बघेल की मानवजातीचे असा पेच असतो.ही अझिमॉव्हची खासियत आहे. त्याच्या सर्व कथांचा शास्त्रीय आधार पक्का असतो. ‘सायन्स फिक्शन’ या प्रकारातील सायन्सचा भाग अचूक आणि अभिनव असेल याची तो पूर्ण काळजी घेतो. त्याच्या जादूच्या कथांमध्येही भले राक्षस किंवा ड्रॅगन असोत, पण ते शास्त्रीय नियमांचे उल्लंघन करीत नाहीत.

फाउंडेशनच्या तीन कादंबर्‍या प्रकाशित झाल्या, गाजल्या आणि अझिमॉव्हवर यावर आणखी लिहा असा दबाव यायला लागला. वाचकांनी विनवण्या, आर्जवे केली, काहींनी तर ‘यावर आणखी लिहीले नाहीत तर परिणाम चांगले होणार नाहीत’ अशा धमक्याही दिल्या. पण कॉनन डॉयलला जसा होम्सचा वीट आला होता तसाच अझिमॉव्हला फाउंडेशनचे नावही ऐकावेसे वाटत नव्हते. हळूहळू प्रकाशक – डबल्सडे सुद्धा याची मागणी करू लागले. अझिमॉव्ह प्रत्येक वेळी काहीतरी सबब काढून टाळायचा. एकदा म्हणाला फाउंडेशनऐवजी मी आत्मचरित्रही लिहायला तयार आहे. ते म्हणाले लिही. या पठ्ठ्याने लिहीलंसुद्धा. १९७३ ते १९८१ अशी आठ वर्षे हुलकावणी दिल्यावर शेवटी डबल्सडेची सहनशक्ती संपली. एके दिवशी त्यांनी अझिमॉव्हला बोलावलं आणि हातात $२५,००० चा चेक ठेवला (इतर पुस्तकांसाठी त्याचा ऍडव्हान्स $३,००० असायचा.) आणि सांगितलं, ‘हे नवीन फाउंडेशन कादंबरीसाठी. बाकीचे पंचवीस कादंबरी झाल्यावर.’ अझिमॉव्ह म्हणाला, ‘पैसे पाण्यात जातील.’ ते म्हणाले, ‘फिकिर नाही.’ बरीच हमरीतुमरी झाल्यावर अखेर त्याने कादंबरी लिहायला घेतली. ‘फाउंडेशन्स एज’ ही चौथी कादंबरी तीस वर्षांनंतर प्रसिद्ध झाली. नंतर आणखी तीन कादंबर्‍या आल्या. १९९२ मध्ये अझिमॉव्हच्या मृत्यूनंतर इतर लेखकांनीही या मालिकेत भर घातली. ‘हिचहायकर्स गाइड टु द गॅलक्सी’ ही डग्लस ऍडम्सची प्रसिद्ध कादंबरी फाउंडेशन मालिकेचे उत्कृष्ट विडंबन आहे.

‘सायन्स फिक्शन’ या प्रकाराखाली नेमक्या कोणत्या प्रकारच्या कथा यायला हव्यात याबद्दल बरेचदा संदिग्धता असते. डोरिस लेसिंग किंवा मार्गारेट ऍटवूडसारख्या लेखिकांनी भविष्यकाळातील कथा लिहील्या आहेत, त्याही उत्तम प्रकारे. पण या कथांमध्ये ‘सायन्स’ हा प्रकार चवीपुरताच असतो. या कथा भविष्यकाळात घडतात म्हनून यांना सायन्स फिक्शन म्हणायचं, इतकंच. म्हणूनच कधीकधी अशा कथांना ‘स्पेक्युलेटिव्ह फिक्शन’ असेही म्हटले जाते. फरक इतकाच की शास्त्रशुद्ध ‘सायन्स फिक्शन’ लिहीणार्‍या अझिमॉव्ह किंवा आर्थर सी. क्लार्कसारख्या लेखकांना उच्च साहित्यिक वर्तुळांमध्ये प्रवेश मिळत नाही. शास्त्रीय संकल्पनांना मध्यवर्ती ठेवून लिहील्या गेलेल्या साहित्याला तितकी प्रतिष्ठा मिळत नाही हे विदारक सत्य आहे. अर्थात या लेखकांचा आणखी एक दोष असा की हे धो-धो लोकप्रिय आहेत. यांच्या कादंबर्‍यांवर वाचकांच्या उड्या पडतात. याचा अर्थ सरळ आहे. हे लेखक इतके लोकप्रिय आहेत म्हणजे नक्कीच यांचा दर्जा फारसा चांगला नसणार. अर्थात अझिमॉव्हची मुलाखत पॅरिस रिव्ह्यू किंवा न्यूयॉर्करमध्ये आली किंवा नाही आली तरी वाचकांना काहीही फरक पडत नाही. आणि ते बरंच आहे.

परत फाउंडेशन मालिका लिहायला सुरूवात केल्यावर अझिमॉव्हने सायकोहिस्टरीचा उगम कसा झाला आणि आधी काय झालं याच्याविषयी लिहीलं. प्रत्यक्षात बर्‍याच उशिरा लिहीलेली ‘प्रिल्यूड टू फाउंडेशन’ (Prelude to Foundation) ही कादंबरी क्रमाने पहिली येते. खरं सांगायचं तर मी अजूनही मालिकेतील सर्व पुस्तके वाचलेली नाहीत कारण सातच पुस्तके आहेत, पुरवून पुरवून वाचत होतो. आता उरलेलीही वाचून टाकायला हवीत असं वाटायला लागलं आहे. एक मात्र खात्री आहे, अझिमॉव्हची शैली कितीही परिचित असली तर शेवटी तो धोबीपछाड टाकणार आणि आपली त्यात सपशेल मात होणार. त्याने हुशारीने कथानकाला दिलेल्या या कलाटण्या या मालिकांचा उच्च बिंदू ठराव्यात.

कथा वाचताना ही म्हण लक्षात ठेवावी, ‘दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं.’ अर्थात उपयोग होणार नाहीच. 🙂

—-

१. ‘गॅलक्सी’ साठी मराठीत दोन शब्द आहेत. आकाशगंगा आणि दिर्घिका. मात्र गॅलॅक्टीक साठीही दिर्घिका शब्द दिला आहे जो बरोबर वाटत नाही. शिवाय ‘दिर्घिका साम्राज्य’ कैच्याकै वाटते. तीच गत ‘गांगेय’ ची. ‘गांगेय साम्राज्य’ म्हटलं तर इ.स.पू. ४९७ मध्ये पाटलीपुत्रच्या आसपास एखाद्या मठात पिवळी वस्त्रे नेसून काही गंभीर चेहरे महासीहनाद सुत्तावर चर्चा करत आहेत असं दृश्य डोळ्यासमोर येतं.

२. यालाही दोन प्रतिशब्द आहेत आणि दोन्ही बोजड आहेत. सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र आणि सांख्यिकी यामकी. समजा या विषयात एखादा लेख लिहायचा आहे आणि त्यात हे शब्द पन्नास वेळा वापरले तर वाचायला कसं वाटेल? सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र, सांख्यिकी स्थितीगतिशास्त्र… चार वेळा म्हणता म्हणता माझा ‘कच्चा पापड पक्का पापड’ झाला.

३. फाउंडेशन मालिकेनंतर अझिमॉव्हची यंत्रमानव मालिका (Robot Series) सर्वात गाजली. यंत्रमानवांसाठी त्याने मांडलेले चार नियम प्रसिद्ध आहेत.

Comments

One response to “बावीस हजार वर्षांचा रोमांचक इतिहास – फाउंडेशन मालिका”

  1. Ashish Avatar

    “‘गॅलक्सी’ साठी मराठीत दोन शब्द आहेत. आकाशगंगा आणि दिर्घिका.”
    मला वाटते आपण ज्या दीर्घिकेत राहतो त्या दीर्घिकेचे नाव आकाशगंगा (मिल्कीवे) आहे.
    Galaxy साठी दीर्घिका का एकच शब्द आहे.