नेदरलॅंडच्या वेक आन झीमध्ये ‘टाटा स्टील चेस’ स्पर्धा गेल्या महिनाभर चालू होती. यात भारताचे दोन खेळाडू असूनही स्पर्धेबद्दल फारशी उत्सुकता कुठे दिसली नाही. विश्वविजेतेपद मिळाल्यापासून आनंदचा परफॉर्मन्स हवा तसा होत नव्हता. स्पेनच्या स्पर्धेत आणि नंतर मागच्या महिन्यात लंडनमध्ये त्याला सूर सापडत नव्हता. एकदा तो कार्लसनकडून हरलाही, आणि बाकी सगळे डाव बरोबरीत. नेदरलॅंडमध्ये पहिल्या दोन डावात नाकामुरा आणि गिरी या दोघांशी बरोबरी झाली. तिसरा डाव मात्र तो जिंकला आणि तो ही इटालियन खेळाडू कारूआनाबरोबर. कारूआना सध्याच्या पहिल्या पाचात आहे, इलो रेटिंग – २७८१. तरीही विश्लेषक सगळं श्रेय आनंदला द्यायला तयार नव्हते कारण कारूआनाला वेळ कमी पडला आणि त्यामुळे दबावाखाली येऊन त्याने चूक केली.
चौथा डाव होता आर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनबरोबर. अरोनियन आणि आनंदची ‘पुरानी दुश्मनी’ आहे. आतापर्यंतच्या खेळल्या गेलेल्या डावांमध्ये अरोनियनचं पारडं जड आहे. स्पर्धेच्या काळात अरोनियनचं इलो रेटींग २८०२ होतं – जागतिक क्रमवारीत तिसरा क्रमांक. त्याच्या पुढे फक्त क्रामनिक (२८०७) आणि कार्लसन (२८६२) होते. साहजिकच हा डाव ‘तगडी टक्कर’ होणार हे उघड होतं. या डावात आनंदनं अरोनियनचं जे काही केलं त्याला तमिळमध्ये ‘इल्लवे सामिळवेरान’ आणि प्राकृत भाषेत ‘वाट लावणे’ असं म्हणतात. हा डाव या वर्षातील आणि बहुधा या दशकातील सर्वोत्कृष्ट डावांमध्ये गणला जावा. कार्लसन या डावाला ‘माइंड ब्लोइंग’ म्हणाला. कास्पारोव्ह आणि जुडित पोलगर यांनीही आनंदची तोंडभरून स्तुती केली. आनंद-अरोनियन खेळत असताना इथे काहीतरी अद्भुत घडतंय याचा सुगावा लागल्यावर बाकीचे सगळे खेळाडू त्यांचे डाव सोडून इकडे गर्दी करत होते.
असं काय अद्भुत होतं या डावात? आनंदला विचारलं तर तो कदाचित होम्ससारखं म्हणेल – ‘अब्जर्व्ह ऍंड लर्न.’
डाव सुरू झाला ‘क्वीन्स गॅम्बिट, सेमी स्लाव्ह मेरान वेरिएशन’नं. ही पद्धत वापरून आनंदनं २००८ मध्ये विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेत क्रामनिकविरूद्ध दोन विजय मिळवले होते तर याच पद्धतीने गेल्या विश्वविजेतेपद स्पर्धेमध्ये गेलफांडने आनंदला हरवलं होतं. अरोनियनकडे पांढरे मोहरे होते. सुरुवातीच्या खेळ्या अशा झाल्या.
१. डी४ डी५ २. सी४ सी६. ३. घो एफ३ घो एफ६ ४. घो सी३ ई६. ५. ई३ घो बीडी७ ६. उं डी३ डी x सी४ ७. उं x सी४ बी५ ८. उं डी३ उं डी ६ ९. O-O O-O
१०. व सी २ उं बी ७ ११. ए ३ ह सी ८ ११ खेळ्यांनंतर परिस्थिती अशी होती.
इथे पांढऱ्याचा प्रयत्न पटाच्या मध्यभागावर ताबा मिळवण्याचा असतो तर काळा उं बी७ मध्ये आणून एच १ ते ए ८ या तिरप्या पट्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी सी ६ चे प्यादे लवकरात लवकर पुढे ढकलण्याची आवश्यकता असते. जर पांढरा याला अटकाव करू शकला तर मात्र काळ्याचा उंट निष्कारण अडकून पडतो. यासाठी पांढऱ्याने वजीर सी २ मध्ये आणून सी पट्टीवर आणखी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर काळ्याने लगोलग हत्ती सी ८ घरात आणून त्याला प्रत्युत्तर दिले. सी २ मधील एच ७ घरावर नेम धरून वजीर काळ्याच्या किल्ल्याला खिंडार पाडण्यातही उपयोगी पडू शकतो. काही किरकोळ फरक वगळता ही स्थिती आतापर्यंत शेकडो डावांमध्ये आलेली आहे.
१२. घो जी ५ एच ७ घरावर हल्ला करण्यासाठी अरोनियन मोर्चेबांधणी करतो आहे. स्लाव्ह मेरानमध्ये घो जी ५ ही खेळी नवीन आहे. काळ्याच्या डी ६ वरील उंटाचे लक्ष्य एच २ वरचे प्यादे आहे. याला हा घोडा एफ ३ घरातून संरक्षण देत होता. घोडा जी ५ मध्ये गेल्यामुळे हे संरक्षण नष्ट झाले आहे.
१२… सी ५ आनंदने बी ७ घरातील उंट मोकळा करण्याचा निर्णय घेतला आहे.
१३. घो x एच ७ घो जी ४. अरोनियनने हल्ला केला पण आनंद बचाव करण्याऐवजी उलटा हल्ला करतो आहे. एच २ चे प्यादे धोक्यात आहे.
१४. एफ ४ सी x डी ४. अरोनियनने धोका ओळखून आनंदच्या हल्ल्याला थोडा पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. प्यादे डी ६ च्या उंटाचा रोख थोपवण्यासाठी एफ ४ मध्ये प्यादे आणले. आनंद अजूनही त्याच्या हत्तीला वाचवण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही आहे.
१५. ई x डी ४ उं बी ५!!!
आनंदची ही खेळी बघितल्यावर टॉम आणी जेरीच्या कार्टूनमध्ये समोर काहीतरी अघटित घडले की टॉमची डोळे विस्फारून दोन क्षण बुबुळे बाहेर येतात तसे अरोनियनचे झाले. फक्त अरोनियनच नाही तर जगभर सर्व प्रेक्षकांचा आ वासला. उं बी ५!? आनंदचा हत्ती बळी जातो आहे त्याला वाचवण्याचा प्रयत्न न करता तो उंटाचा बळी देतो आहे? जय पांढऱ्याने उंट घेतला तर वजीर डी पट्टीत येण्याचा धोका आहे.
१६. उं इ २ घो डीई ५!!! आनंदचं चाललंय काय? उंट घेतला नाही तर नंतर घोड्याचंही बलिदान? आतापर्यंत अरोनियनची अवस्था विश्वरूपदर्शन झालेल्या अर्जुनासारखी झाली होती. समजा घोडा घेतला तर – १७. एफ x ई ५ व x डी ४ शह १८. रा एच १ व जी १ शह १९. ह x जी १ घो एफ २ शह आणि मात.
१७. उं x जी ४ उं x डी ४ शह १८ रा एच १ घो x जी ४ १९. घो x एफ ८ अखेर हत्ती घेतला. १९… एफ ५
आता आनंद वजीर एच ५ पट्टीत आणून – सुलतानढवा – शेवटची चढाई करू शकतो. पण एक धोका आहे. पांढरा वजीर एच ७ मध्ये येऊ शकतो. त्याला थांबवण्यासाठी आनंदने एफ ५ ही सुरेख खेळी केली.
२०. घो जी ६ व एफ ६ २१. एच ३ व x जी ६ २२. व ई २ व एच ५ २३. व डी ३ उं ई ३ अरोनियनने राजीनामा दिला.
शेवटच्या खेळीत अरोनियनने वजीर डी ३ मध्ये आणून एच ३ चे प्यादे वाचवण्याचा निष्फळ प्रयत्न केला पण लगेच आनंदने उं ई ३ मध्ये आणून त्यात खोडा घातला. आनंदच्या दोन उंटांचा प्रखर हल्ला, वजीराची दहशत आणि घोडा इतक्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी अरोनियनकडे काहीही उपाय नाही. त्याचा एक उंट तर अडकूनच पडला आहे आणि घोड्यावर अजून खोगीरसुद्धा घातलेलं नाही. वजीर आणि हत्ती निष्प्रभ आहेत. आता काही केले तरी मात अटळ आहे.
‘गॉडफादर’ बघितल्यावर किंवा मुराकामीचं ‘विंड अप बर्ड क्रॉनिकल’ वाचल्यावर जी अनुभूती येते तोच अनुभव बॉबी फिशर, कापाब्लांका अशा बाप लोकांचे अजरामर डाव बघितल्यावर येतो. असे डाव एखाद्या सुंदर कलाकृतीसारखे असतात. आणि आता, या क्षणाला आपल्यासमोर एक ऐतिहासिक डाव खेळला जातोय हा अनुभव निव्वळ रोमांचकारी असतो. हॅट्स ऑफ टू विश्वनाथन आनंद!