देवा हो देवा, आनंद देवा

प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात, लोकशाहीचेही आहेत. उत्तर कोरियात सर्व पुरुषांनी किम जोंगसारखा हेअरकट करावा असं फर्मान निघालं आहे. भारतात हे शक्य नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं. ही अर्थातच चांगली गोष्ट आहे पण याचा तोटा हा की प्रत्येकाला कोणत्याही विषयावरचं आपलं मत सर्वश्रेष्ठ वाटायला लागतं. राजकारणापासून क्रिकेटपर्यंत सर्व विषयांवर सर्वांची ठाम मतं असतात. लोकशाहीत प्रत्येकाचं मत महत्त्वाचं असतं पण कोणत्याही विषयावरच्या प्रत्येकाच्या मताला सारखीच किंमत असते असं नाही. याचं उत्तम उदाहरण क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. जन्मभरात बॅट हातात धरली नसेल तरीही सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह कुठे चुकतो किंवा आता फिल्डिंग कशी लावायला हवी होती हे सांगायला लोक तत्पर असतात. आणि याचा बचाव करण्यासाठी एक नेहमीचं वाक्य तयार असतं, ‘आम्लेट कसं झालं आहे हे बघायला अंडं घालायची गरज पडत नाही. ‘ अशी वाक्यं बहुतेक वेळा मिठाबरोबर घेतलेली चांगली असतात.

हे सर्व लिहिण्याचा कारण म्हणजे मागच्या वर्षी चेन्नई इथे झालेल्या बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेनंतर नेहमीप्रमाणे आम आदमीपासून ते कास्पारोव्हसारख्या ग्रॅंडमास्टरपर्यंत सर्वांनी आपापली मतं व्यक्त केली. यात बहुतेक लोकांच मत होतं की आनंदची सद्दी संपली आहे, त्यानं निवृत्त व्हायला हवं. (‘आनंद खेळतोय अजून? रिटायर हो म्हणावं’ – इति जन्मात एकही डाव न खेळलेले एक स्वयंभू ‘एक्सपर्ट’. ) यामागे मुख्य कारण हे की विश्वचषक स्पर्धा आणि त्याआधीच्या अनेक स्पर्धांमध्ये आनंदचा खेळ बेतास बात ते निराशाजनक यातच अडकलेला होता. विश्वचषक स्पर्धेत पहिल्या चार डावात त्याने कार्लसनला उत्तम लढत दिली पण पाचव्या डावात हरल्यानंतर तो जवळजवळ कोलमडलाच. नंतर सहज टाळता येण्यासारख्या चुकांमुळे स्पर्धा त्याच्या हातातून गेली. या चुकांमागे मानसिक दबावाचा प्रभाव ठळकपणे जाणवत होता. इतक्या वाईटरीत्या हरल्यानंतर कोणताही खेळाडू परत येऊ शकेल यावर विश्वास बसणं कठीणच. विश्वचषक स्पर्धेनंतर जानेवारीत झुरिक चेस चॅलेंज स्पर्धेत आनंदनं भाग घेतला. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की यात इतर महारथींबरोबरच कार्लसनही होता. विश्वविजेतेपदानंतर हे दोघे पहिल्यांदाच भेटत होते. त्यांचा डाव बरोबरीत सुटला पण एकुणात आनंदचा खेळ अत्यंत निराशाजनक झाला. स्पर्धेत त्याला अगदी तळाचं पाचवं स्थान मिळालं. दरवर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्याचा मुकाबला कोण करणार हे मार्च महिन्यात होणाऱ्या कॅंडिडेट्स स्पर्धेवरून ठरवलं जातं. या वर्षी आनंद स्पर्धेत भाग घेणार की नाही इथपासून सुरुवात होती. अखेर त्यानं भाग घ्यायचा निर्णय जाहीर केला. (नाकामुराकडून हरल्यानंतर व्ह्लादिमिर क्रामनिक निराश झाला होता. मग विशी त्याला डिनरला घेऊन गेला. तिथे क्रामनिकने विशीला कॅंडिडेट्समध्ये भाग घ्यायला राजी केलं. दोघे प्रतिस्पर्धी असूनही त्यांची गाढ मैत्री आहे. )

पुढे जे काय झालं ते कोणत्याही लोकप्रिय बॉलीवूड/हॉलीवूड चित्रपटात शोभून दिसलं असतं. आनंदचा पहिलाच सामना होता जागतिक क्रमवारीत नंबर दोनच्या स्थानावर असलेल्या आर्मेनियाच्या लेव्हॉन अरोनियनशी. अरोनियन ही स्पर्धा जिंकण्यासाठी फेवरिट होता. खुद्द कार्लसननेच त्याला फक्त अरोनियनपासून धोका आहे असं मत व्यक्त केलं होतं. या डावात आनंदचं जे रूप समोर आलं ते सगळ्या जगाला आश्चर्यचकित करणारं होतं. गेली एक-दोन वर्षे सारखा बचावात्मक खेळणारा, नेहमी बरोबरी करणारा आनंद कुठल्या कुठे गायब झाला होता. उपमा ठोकळेबाज आहे पण राखेतून फिनिक्स पक्षी जन्माला यावा तसं हे त्याचं नवं रूप होतं. प्रत्येक खेळी अचूक, अरोनियनला प्रतिवाद करायला कुठेही जागा नाही. अरोनियनचं सध्याचं इलो रेटींग २८२०-२५ च्या आसपास आहे. नंबर दोनच्या खेळाडूला पूर्णपणे निष्प्रभ करणं ही सोपी गोष्ट नाही. मागे ‘वेक आन झी’ मध्ये झालेल्या स्पर्धेत आनंदने याच अरोनियनचा कोथळा बाहेर काढला होता. या वेळचा डाव तितका प्रेक्षणीय नसला तरी प्रत्येक खेळीवर आनंदचं पूर्ण नियंत्रण दाखविणारा होता. पहिल्याच डावात अरोनियन आनंदकडून हरला.

सगळे आश्चर्यचकित झाले पण ‘पहिला डाव देवाला’, अरोनियनला अजून फॉर्म सापडला नाही वगैरे कारणं दिली गेली. आनंदचा विजय ‘फ्लूक’ असावा अशी शंकाही व्यक्त केली गेली. पुढच्या डावांमध्ये आनंदने त्याचं नवं रूप कायम ठेवलं. अनेक जुन्या-जाणत्या लोकांना त्याच्या खेळात पूर्वीच्या विशीची झलक दिसली. नंतर टोपालोव्ह आणि मेमेद्यारॉव्ह यांच्या विरुद्ध आनंद विजयी झाला तर इतर डाव बरोबरीत सुटले. परत अरोनियनशी सामना झाला तेव्हा बिचारा अरोनियन इतका हबकला होता की त्याने पांढऱ्याकडून खेळताना १. सी ४ सी ६ २. घो एफ ३ डी ५ ३. व बी ३ डी ४ अश्या खेळ्या केल्या. साधारणपणे या दर्जाच्या स्पर्धांमध्ये अशी ओपनिंग फार क्वचित बघायला मिळते. अरोनियनचा एकमेव हेतू नेहमीच्या सर्व ओपनिंग टाळून लवकरात लवकर बरोबरी साधणे हाच होता आणि त्यात तो यशस्वी झाला. आतापर्यंत स्पर्धेत आनंद एकमेव अपराजित खेळाडू आहे. आणखी एक फेरी बाकी आहे. एक फेरी बाकी असतानाच आनंदने काल या स्पर्धेत विजय मिळवून कार्लसनशी आपला सामना पक्का केला.

आनंदचं या स्पर्धेतील रूप निश्चितच सुखावणारं आहे. जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंबरोबर खेळताना संतुलित, अचूक खेळ सातत्याने करणं सोपं नाही, विशेषत: स्पर्धेच्या शेवटी क्रामनिक आणि अरोनियनसारखे खेळाडू दबावाखाली येऊन चुका करत असताना. बदक जेव्हा पाण्यावर नुसतं आरामात तरंगताना दिसतं तेव्हा पाण्याखाली पाहिलं तर त्याचे पाय अथक परिश्रम करताना दिसतात. आनंदच्या या खेळामागे जी अपार मेहनत आहे ती क्वचितच लक्षात घेतली जाते. शिवाय आनंदचा स्वभावही याला थोडाफार कारणीभूत आहे. कार्लसन किंवा कास्पारोव्हप्रमाणे वल्गना करणं त्याच्या स्वभावात नाही. (नुकतंच कार्लसनने ‘क्रामनिक जे खेळतो त्यात बरंच ‘नॉन्सेन्स’ असतं’ वगैरे मुक्ताफळं उधळली. ) तोंडाची वाफ न दवडता जे काय सांगायचं ते तो कृतीमधून सांगतो. गेले चार महीने त्याच्यावर जी अतोनात टीका झाली तिच्याकडे लक्ष न देता आपल्या ध्येयाचा पाठपुरावा करत राहणे त्याला कसं जमलं त्यालाच ठाऊक. विश्वचषक स्पर्धेत काय होईल याचं भविष्य वर्तवणं अशक्य आहे. तरीही शॉर्टसारखे खेळाडू कॅडिडेट्स सुरू व्हायच्या आधीच आनंद आता परत कधीही विश्चविजेता होणं शक्य नाही असा निर्वाळा देऊन मोकळे होतात. खुद्द शॉर्टला कोलकात्यामध्ये २५०० रेटिंगच्या खेळाडूंशी बरोबरी करतानाही तोंडाला फेस येतो ही गोष्ट वेगळी.

यावेळचा आनंद आधीपेक्षा वेगळा आहे. मागच्या स्पर्धेत ज्या चुका झाल्या त्या सुधारायला त्याला भरपूर वेळ आहे. यावेळी पीटर लेकोचं साहाय्य तो कदाचित घेणार नाही, पण कुणाचंही घेतलं तरी ते जाहीर मात्र नक्की करणार नाही. मागच्या वेळेस ती एक मोठी चूक होती. वाघाशी सामना अवघड असतोच पण जखमी, चवताळलेल्या वाघाशी सामना त्याहूनही अवघड. ‘टायगर ऑफ मद्रास’ यावेळी काय करतो बघूयात.