नायपॉल, अमर्त्य सेन आणि भारत

गेल्या महिन्यात मुंबईत झालेल्या साहित्य महोत्सवाचे जीवन गौरव पारितोषिक व्ही. एस. नायपॉल यांना देण्यात आले. नंतर गिरीश कर्नाड यांनी त्यांच्या भाषणात या निर्णयावर कडाडून टीका केली. या टीकेचा मुख्य मुद्दा नायपॉल यांचे मुसलमानांबद्दलचे लेखन पूर्वग्रहदूषित आहे हा होता. कर्नाड यांनी ज्या पुस्तकांबद्दल ही टीका केली आहे ती पुस्तके म्हणजे ‘ऍन एरिया ऑफ डार्कनेस’, ‘इंडिया : अ वूंडेड सिव्हिलायझेशन’ आणि ‘इंडिया : अ मिलियन म्युटिनीज नाऊ’ ही आहेत. यापैकी एकही पुस्तक वाचलेले नाही (आणि आता वाचवणारही नाहीत. का ते यथावकाश स्पष्ट व्हावे.) त्यामुळे या पुस्तकांविषयी न बोलल्यामुळे समर्थांनी ज्या थोर लोकांची लक्षणे दिली आहेत त्यातले किमान एक तरी लक्षण लागू होऊ नये. योगायोगाने हा सावळा गोंधळ चालू असताना नायपॉल यांचे ‘द रायटर ऍंड द वर्ल्ड’ हे पुस्तक हातात होते. नायपॉल यांनी दोन प्रकारची पुस्तके लिहिली आहेत – पहिला प्रकार कथा आणि कादंबऱ्या आणि दुसरा प्रवासवर्णने. पैकी त्यांचे कादंबरी लेखन जगातील उत्कृष्ट लेखकांच्या तोडीचे आहे हे त्यांचे विरोधक – अगदी कर्नाडसुद्धा – मान्य करतात. ‘फाइनेस्ट प्रोज रायटर अलाइव्ह इन द इंग्लिश लॅंग्वेज’ अशा शब्दात त्यांची प्रशंसा केली गेली आहे.

मात्र कर्नाड यांच्या टीकेमधून एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे नायपॉल यांच्या ‘नॉन-फिक्शन’ लेखनाचे मूल्यमापन कसे करावे? नायपॉल यांचे हे लेखन एका विशिष्ट साच्यानुसार लिहिले गेले आहे असे जाणवते. नायपॉल यांचा जन्म त्रिनिदादचा, आजोबा इंग्रजांच्या काळात भारतातून त्रिनिदादमध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. नायपॉल यांना भारतीय संस्कृतीची वरवरची ओळख झाली – लहानपणी तिथे रामलीलेचे कार्यक्रम होत असत. पुढे उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्यावर त्यांनी लिहायला सुरूवात केली. लिहिताना त्यांनी परंपरागत ब्रिटिश साहित्याची वाट न चोखाळता आपल्या त्रिनिदादमधील वास्तव्यावर लिहिणे पसंत केले. मूळ वंश भारतीय, संस्कार त्रिनिदादचे आणि लेखन ब्रिटिश वातावरणात अशा मुशीत तयार झालेल्या नायपॉल यांची पुस्तके नेहमी ब्रिटिश वसाहतवादाचे विविध परिणाम, आपली मूळ संस्कृती आणि लादले गेलेले ब्रिटिश (किंवा इतर वसाहतवादी) आचार-विचार या संघर्षामध्ये जगणारे लोक यांच्याबद्दल असतात. शैक्षणिक भाषेत अशा साहित्याला ‘पोस्ट-कलोनियल’ साहित्य असे म्हटले जाते. नायपॉल यांची प्रवासवर्णनेही याच धर्तीवर आहेत. प्रवासासाठी त्यांनी जी ठिकाणे निवडली ती सर्व एके काळी ब्रिटिश किंवा इतर वसाहतवादी साम्राज्याखाली असणाऱ्या देशांची आहेत.

‘द रायटर ऍंड द वर्ल्ड’ या पुस्तकात भारत, आफ्रिका, वेस्ट इंडीज बेटे आणि अमेरिका (दक्षिण आणि उत्तर दोन्ही) या ठिकाणच्या अनुभवांची त्यांनी नोंद केली आहे. वाचताना हळूहळू नायपॉल यांची लेखनाची पद्धत लक्षात येऊ लागते. नवीन देशात गेल्यावर अध्यक्ष किंवा राजदूतांपासून ते सामान्य लोकांपर्यंत विविध स्तरातील लोकांशी ते बोलतात. या भेटींचे प्रसंग त्यांच्या साहित्यिक प्रतिभेला साजेशा अशा ओघवत्या आणि प्रसंगी ‘poignant’ भाषेत मांडतात. आणि मग शितावरून भाताची परीक्षा करत या प्रसंगांवरून त्या देशाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल ठाम मते व्यक्त करतात. हे करताना कुठेही सत्य परिस्थिती आपल्याला जे वाटते आहे त्याहून वेगळी असू शकेल असा विचार त्यांच्या मनात येत नाही. पुस्तकातील एक प्रदीर्घ (१०० पानांहून अधिक) लेख अर्जेंटीना आणि इव्हा पेरॉन यांच्यावर आहे. अर्जेंटीनामधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान नायपॉल होर्हे लुइस बोर्घेसला भेटले. त्यांचे बोर्घेसबद्दलचे मत वाचून मला ‘अंदाज अपना अपना’मधील क्राइम मास्टर गोगो आठवला, “आप लोग मेरी तारीफ कर रहे है या मुझे गाली दे रहे है?”

But his Anglo-American reputation as a blind and elderly Argentine, the writer of a very few, very short, and very mysterious stories is so inflated and bogus that it obscures his greatness…Borges gives many interviews. and every interview seems to be like every other interview.

अर्थात नायपॉल यांच्या मतांशी परिचित असणाऱ्यांना हे वाचून फारसे आश्चर्य वाटू नये. नायपॉल यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते इतर लेखकांबद्दल क्वचितच बोलतात आणि बोललेच तर चांगले फारच क्वचित बोलतात. भारताचा शोध घेत असताना आर. के. नारायण, टागोर किंवा गांधीजी यांच्या लेखनामध्ये त्यांना काही विशेष आढळले नाही. तीच गत इतर पाश्चात्त्य लेखकांची. याला अपवाद फक्त कॉनराडचा असावा. कॉनराडविषयी ते भरभरून बोलतात. कोणत्याही विषयावर लिहीत असताना त्यांना कॉनराडची वाक्ये आठवतात. यात गैर काहीच नाही, आवडते लेखक सर्वांचेच असतात. पण आपली आवड म्हणजे साहित्यिक मूल्यमापनाचा अंतिम निर्णय असा अभिनिवेश घेऊन दर वेळी केलेला कॉनराडचा जयजयकार वाचताना हळूहळू वैताग यायला लागतो.

या पुस्तकातील भारतावरच्या लेखांमध्ये एक लेख कलकत्ता शहरावर तर दुसरा राजस्थानमधील एका जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुका चालू असतानाच्या काळाचे वर्णन यावर आहे. लेखांचा काळ ६०-७० च्या दशकातला आहे. पद्धत तीच, एकेक माणूस, त्याच्या/तिच्या मुलाखती, मुलाखती घेताना त्यांची व्यक्तिचित्रे रेखाटायची. इथपर्यंत सगळं ठीक पण मग यावरून भारतीय जनतेबद्दल, भारताबद्दल सामान्यीकरण करून निष्कर्ष काढायचे. हे करत असताना आणखी एक विशेष म्हणजे नायपॉल यांना प्रशंसा करण्यासारख्या गोष्टी कधीही दिसत नाहीत. आणि टीका करण्यासारख्या गोष्टींची आपल्याकडे – किंवा इतर कुठेही – अजिबात वानवा नाही.

पैकी पुस्तकातील माल्कम एक्स आणि त्याने केलेल्या निर्घृण हत्यांवरचा लेख खिळवून ठेवणारा आहे. कदाचित विशिष्ट व्यक्ती, प्रसंग याबद्दल लिहिताना असे लेख कथालेखनाच्या जवळ जात असावेत. माल्कम एक्सबद्दल लिहिताना नायपॉल म्हणतात, “An autobiography can distort; facts can be realigned. But fiction never lies : it reveals the writer totally.” हे नायपॉल यांनाही लागू पडते. नायपॉल यांची प्रवासवर्णने वाचताना त्या देशांपेक्षा नायपॉल या माणसाचीच ओळख होत जाते. वेस्ट इंडीज बेटांमधील एका चिमुकल्या देशात नायपॉल एका सेक्रेटरीला भेटतात. तिच्यामार्फत इतर लोकांच्या मुलाखती घेतल्यानंतर दोघे जेवायला नायपॉल राहत असलेल्या पंचतारांकित हॉटेलात जातात. तिथे तिच्याशी बोलताना नायपॉल यांना कळते की तिची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही आणि हे जेवणाचे आमंत्रण तिच्या दृष्टीने एक कधीही न येणारी संधी आहे. मग ते लगेच वेटरला बोलावून सर्वात महाग मेन्यू ऑर्डर करतात. जेवताना ते तिच्या सर्व प्रतिक्रिया काटेकोरपणे बघत असतात. शेवटी बिल आल्यावर ती पाकीट उघडत असताना तिला थांबवून दिलदारपणे बिल देतात. हे सर्व वर्णन इतके ‘पॅट्रनायझिंग’ वाटते की शेवटी-शेवटी या सगळ्याची शिसारी यायला लागते.

आधी म्हटल्याप्रमाणे या लेखनातून सतत नायपॉलच दिसत राहतात आणि हे दिसणे फारसे रोचक नाही. कर्नाड यांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय संगीताचा ते उल्लेखही करत नाहीत पण याचबरोबर भारतीय संस्कृतीची गेल्या चार हजार वर्षांतील वाटचाल, विविध धर्म, कला, यांचा उगम आणि प्रसार यासारख्या अनेक गोष्टी ते लक्षात घेत नाहीत. त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे आणि तिच्या आकलनामुळे जी दृष्टी मिळाली आहे तिच्या पलीकडे जायला ते साफ नकार देतात. बहुतेक वेळा ते त्या-त्या विभागातील वर्तमानपत्रे किंवा फारशी प्रसिद्ध नसलेली पुस्तके (कधीकधी निवडणुकीची पॅंम्फ्लेट) यांचा संदर्भ देतात पण त्या विषयावर मान्यवर लेखकांनी केलेल्या लेखनाचा संदर्भ कधीही येत नाही. भारताबद्दल टागोर, गांधी यांचे लेखन त्यांनी निश्चितच वाचले असणार पण त्या लेखनाला – आणि बरेचदा लेखकालाही – बाद करणे यापलीकडे त्या लेखनाबद्दल ते बोलत नाहीत.

हे लक्षात आल्यावर मग प्रश्न येतो की नायपॉल यांचे अशा प्रकारचे लेखन का वाचावे? त्यातून काही नवीन मिळते आहे अशी शक्यता फार कमी आहे. उलट नायपॉल यांचा दृष्टिकोन कळल्यानंतर लेखन कुठल्या दिशेने जाणार आहे याचा आधीच अंदाज येतो. शिवाय आपल्याला माहिती नसणारे देशांबद्दल असे लेखन वाचल्याने पूर्वग्रह तयार होण्याची शक्यताच अधिक. म्हणून वाचायच्या यादीतील नायपॉल यांची सर्व ‘नॉन-फिक्शन’ पुस्तके काढून टाकली आहेत. त्यांच्या कादंबऱ्या मात्र व्यक्तिरेखांचे चित्रण, भाषा, शैली अशा अनेक गुणांमुळे वाचाव्याश्या वाटतात.

खरे तर इथे लेख संपायला हवा पण ‘द रायटर ऍंड द वर्ल्ड’नंतर जे पुस्तक हाती आले ते वाचून हे विचार आणखी स्पष्ट झाले. (प्रा. वि. ग. भिडे सरांच्या शब्दांत सांगायचे तर ‘क्लॅरिटी ऑफ थिंकिंग.’) हे पुस्तक होते अमर्त्य सेन यांचे ‘द आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन.’ आर्ग्युमेंटेटिव्ह म्हणजे ज्याला वादविवाद घालायला आवडतं असा माणूस. नाव वाचल्यानंतर या पुस्तकात सेनही निराद चौधरींप्रमाणे भारतीयांवर टीका करण्याचा एक-कलमी कार्यक्रम राबवत आहेत की काय अशी शंका आली पण पुस्तकाची प्रस्तावना वाचतानाच सर्व संशय दूर झाले. भारत आणि भारतीय यांची इतिहास, कला, धर्म, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र अशा अनेक दृष्टिकोनांमधून करून दिलेली ओळख या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. वाचताना सेन यांचा प्रचंड व्यासंग सतत जाणवत राहतो. पुस्तक सामान्य वाचक आणि या क्षेत्रांमधील अभ्यासक दोघांसाठी आहे. काही अपवाद वगळता सामान्य वाचकालाही पुस्तकातील मुख्य कल्पना समजायला कठीण जात नाहीत आणि समजायला कठीण असे अपवाद फारच थोडे आहेत. ते गाळले तरी चालतील.

पुस्तकात सेन भारताबद्दल असणारे दोन प्रकारचे गैरसमज दूर करतात. एक म्हणजे पाश्चात्त्यांचे भारताबद्दलचे गैरसमज आणि दुसरे भारतीयांचे भारताबद्दलचे गैरसमज. यात अर्थातच पाश्चात्त्यांचे मत काळ्या दगडावरची रेघ मानणारे भारतीयही आलेच. भारतावर ब्रिटिशाने राज्य केले म्हणून ते गेल्यानंतर आपण त्यांची लोकशाही स्वीकारली असे एक लोकप्रिय मत आहे. याला काही आधार नाही. विसाव्या शतकात ब्रिटिशाने सत्ता सोडल्यानंतर लोकशाही स्वीकारणारा भारत पहिला देश होता, इतर देशांनी हुकूमशाही आणि तिचे वेगवेगळे पर्याय स्वीकारले. भारताला लोकशाहीची ओळख ब्रिटिशाने करून दिली यातही तथ्य नाही. सेन यांच्या मतानुसार भारतात चर्चा आणि वादविवादाची जुनी परंपरा आहे. आपण लोकशाही स्वीकारण्यामागे ही परंपरा कारणीभूत आहे. हा ‘आर्ग्युमेंटेटीव्ह इंडियन’मागचा गाभा आहे. भारतीय संस्कृतीबद्दल दोन प्रकारची लोकप्रिय मते आढळतात. एक म्हणजे अणुबॉम्बपासून विमानापर्यंत सगळे शोध आम्हीच लावले होते असे दावे करणारे आणि दुसरे म्हणजे भारतीय वेद, उपनिषद म्हणजे अंधश्रद्धांनी भरलेली पुस्तके असे मानणारे विज्ञानवादी. या दोन्ही समजुतींमुळे प्राचीन भारत नेमका कसा होता, तिथे कोणत्या प्रकारचे लोक राहत होते हे कळण्याचे मार्ग खुंटतात.

भारताकडे बघण्याचे पाश्चात्त्यांचे दृष्टिकोन तीन प्रकारचे आहेत असे सेन म्हणतात. पहिला म्हणजे भारत हा काहीतरी गूढ, रहस्यमय प्रदेश आहे, इथे गेल्यावर आध्यात्मिक स्वर्गाच्या किल्ल्या मिळतात. रवींद्रनाथ टागोरांना पाश्चात्त्य जगात जी प्रसिद्धी मिळाली त्यामागे या गूढ प्रतिमेचा बराच हात होता. नोबेल मिळाल्यानंतर काही वर्षांनी ही कृत्रिम प्रतिमा भंग पावली आणि आपली फसवणूक झाल्याची पाश्चात्त्यांची समजूत झाली. गूढ अध्यात्मापलीकडे गुरुदेवांनी विविध विषयांवर जे विपुल लेखन केले आहे ते पाश्चात्त्य देशांत फारसे लोकप्रिय झाले नाही. १९१० च्या दरम्यान गुरुदेवांना डोक्यावर घेणारे नंतर त्यांच्यावर प्रखर टीका करत होते. “As for Rabindranath Tagore, I cannot believe that anyone but Mr Yeats takes his poems seriously,” इति ग्रॅहॅम ग्रीन. तेव्हाचा हा दृष्टिकोन आजही लोकप्रिय आहे. ‘स्पिरिचुअल एनलायटनमेंट’साठी भारतासारखे दुसरे ठिकाण नाही. मग ती केट विन्सलेट असो किंवा ‘इट, प्रे, लव्ह’ची लेखिका.

दुसरा दृष्टिकोन – याला सेन ‘मॅजेस्टेरियल अप्रोच’ असे नाव देतात. युरोपियन वंश हा जगातील सर्वात पुढारलेला आणि सुसंस्कृत वंश आहे. आशिया, अमेरिका, आफ्रिका इथल्या मागासलेल्या वंशांना शिक्षण देऊन ‘सुधारण्याची’ महान जबाबदारी गोऱ्या लोकांवर आहे हे या दृष्टिकोनाचे मूळ गृहीतक. हा दृष्टिकोन स्वातंत्र्यपूर्व काळात विशेष लोकप्रिय होता. किपलिंगचे ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ याच जातकुळीचे. आजही नायल फर्गसनसारखे इतिहासकार याचा प्रामुख्याने वापर करतात. मात्र भारतीय इतिहासाच्या बाबतीत जेम्स मिल यांना याचे सुवर्णपदक मिळायला हवे. १८१७ मध्ये मिल यांनी ‘द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया’ हे पुस्तक लिहिले. हे लिहीण्याआधी त्यांनी भारतात यायचेही कष्ट घेतले नाहीत. त्यांना संस्कृत, पर्शियन, अरेबिक किंवा इतर कोणत्याही भारतीय भाषेची तोंडओळखही नव्हती. या पुस्तकात त्यांनी जे मुख्य काम केले ते म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या चार हजार वर्षात जे काही झाले आहे ते सर्व खोडून काढले. भारत आणि भारतीय अत्यंत मागासलेले आणि उद्धट लोक आहेत असा त्यांचा दावा होता. ‘आर्यभट्ट आणि वराहमिहीर यांच्यासह भारतीय गणितज्ञांनी जे काम केले ते सर्व इकडून-तिकडून घेतलेले होते, आणि भारतीय संस्कृतीची प्रगती हा प्रश्न इतका गौण आहे की यावर अधिक वेळ घालवणे व्यर्थ आहे’ अशी विधाने कोणतेही पुरावे न देता त्यांनी केली. विशेष म्हणजे त्यांचा हा ग्रंथ इंग्लंडमध्ये लोकप्रिय झाला. लॉर्ड मॅकॉले यांनी ‘the greatest historical work…since that of Gibbon’ या शब्दात याची प्रशंसा केली. परिणामत: भारतात बदली होण्याआधी इंग्रज अधिकाऱ्यांनी संदर्भ म्हणून हा ग्रंथ वाचला आणि भारतातील ब्रिटिश साम्राज्याची धोरणे आखण्यात या ग्रंथाचा मोठा वाटा होता. याचबरोबर कॅथरीन मायो यांनी लिहिलेले ‘मदर इंडिया’ हे पुस्तकही त्या काळात लोकप्रिय होते. यात मागासलेल्या भारतीयांवर राज्य करणे कसे आवश्यक आहे हे दाखवले होते. अमेरिकेत भारतातील ब्रिटिश साम्राज्याला पाठिंबा मिळवण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग करण्यात आला. याच्या प्रशंसकांमध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रूझवेल्ट आणि जॉन स्ट्युअर्ट मिल यांचाही समावेश होता.

भारताकडे बघण्याचा तिसरा दृष्टिकोन म्हणजे अभ्यासकांचा. जे आहे ते शक्य तितक्या निष्पक्षपणे जाणून घेणाऱ्यांचा. सातव्या शतकातील चिनी अभ्यासक ह्यू एन त्सांग किंवा अकराव्या शतकातील अल बेरूनी यांच्यासारख्या पंडितांनी या बाबतीत मोलाची कामगिरी केली आहे. अल बेरूनी महंमद गझनीच्या फौजांबरोबर भारतात आले. इथे संस्कृत पंडितांबरोबर राहून त्यांनी संस्कृत भाषा आत्मसात केली आणि गणित, तत्त्वज्ञान, धर्म, साहित्य अशा अनेक विषयांवरचे ग्रंथ वाचले. या अभ्यासातून त्यांनी लिहिलेला ‘तारीख-अल-हिंद’ हा तत्कालीन भारतावरील एक अमूल्य ग्रंथ आहे. ब्रह्मगुप्ताच्या खगोलशास्त्रावरील ग्रंथाबरोबरच इतर अनेक ग्रंथांचे त्यांनी अनुवाद केले. दशमान पद्धतीचा उगम भारतात झाल्यानंतर अरबी अनुवादकांच्या मार्फत ही पद्धत युरोपमध्ये पोचली. इ.स.पू. पाचवे शतक ते इ. स. आठव्या शतकादरम्यान अनेक चिनी अभ्यासक भारतात आले, पैकी ह्यू एन त्सांग हा एक महत्त्वाचा अभ्यासक होता. भारत आणि चीन यांच्यामधील देवाणघेवाणीची सुरूवात जरी बुद्ध धर्मापासून झाली असली तरी लवकरच तिचा विस्तार इतर अनेक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये झाला. शेकडो चिनी विद्यार्थी नालंदा येथे शिक्षणासाठी येत असत, तसेच भारतीय विद्यार्थीही चीनमध्ये जात असत. आठव्या शतकात गौतम सिद्धार्थ नावाच्या भारतीय शास्त्रज्ञाची चीनमधील खगोलशास्त्र मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. भारत-चीन व्यापारही त्या काळात जोरात होता. चिनी रेशमाचा उल्लेख कौटिल्याचे अर्थशास्त्र, महाभारत इ. ग्रंथांमध्ये सापडतो.

भारताकडे बघण्याचे हे पाश्चात्त्यांचे दृष्टिकोन झाले. मात्र खुद्द भारतीयही अनेकदा आपल्या देशाकडे चुकीच्या चश्म्यातून बघतात. यातील एक महत्त्वाचा चश्मा म्हणजे हिंदुत्ववाद. भारताची ओळख हिंदू राष्ट्र अशी करण्यामागचे धोके सेन स्पष्ट करतात. एक तर ही ओळख ऐतिहासिक दृष्ट्या बरोबर नाही. भारतात हजारएक वर्षे बुद्ध धर्म प्रामुख्याने प्रचलित होता, त्याचबरोबर पारशी, ख्रिस्ती या धर्मांचे लोक वेगवेगळ्या काळांमध्ये इथे येऊन स्थायिक झाले होते. शीख धर्माचा उदय इथेच झाला. त्यातही इतर धर्मांप्रमाणे हिंदू धर्माची एक व्याख्या नाही, देवही अनेक आहेत. पश्चिम आणि उत्तर भारतात रामाला देव मानतात, पण पूर्वेकडे रामाची ओळख रामायणाचा नायक अशीच आहे. इतर धर्मांमध्ये नास्तिकांना स्थान नाही, उलट असे विचार मांडल्यास ‘heresy’च्या आरोपाखाली शिक्षा होत असे. मात्र हिंदू धर्मात उपनिषदांच्या काळापासून देव या संकल्पनेच्या विरुद्ध जाणारे विचार वेळोवेळी मांडण्यात आले आहेत. लोकायत पंथाचे तत्त्वज्ञान आणि चार्वाकाचे विचार या संदर्भात विशेष महत्त्वाचे आहेत. भारतात हिंदू धर्माची परंपरा जशी रूढ होत होती तसेच चार्वाकाचे विचारही लोकप्रिय होत होते. संस्कृत भाषेतील साहित्य म्हणजे धार्मिक साहित्य हा गैरसमज आहे. नास्तिकता आणि अज्ञेयवादी (Agnosticism) यांच्यावर कुठल्याही अभिजात भाषेपेक्षा संस्कृत भाषेमध्ये अधिक लेखन झाले आहे.

—-

१. जे अपवाद आहेत ते म्हणजे अर्थशास्त्रातील काही मुद्दे. शिवाय समाजशास्त्र, राज्यशास्त्र यासारख्या विषयांची पार्श्वभूमी नसलेल्यांना (यात मी ही आहे) ‘It is the combination of internal pluralism and external receptivity that has been most challenged in the recent decades by seperatist viewpoints, varying from communitarian exclusion and aggresive parochialism on one side to cultural alienation and isolationalist nationalism on the other.’ यासारखी वाक्ये थोडा प्रयत्न केल्यावर कळू शकतात पण त्या-त्या विषयांच्या संदर्भात या शब्दांना व्यापक अर्थ आहे. या शब्दांचे अध्याहृत संदर्भ आहेत. या सर्वांचे त्या विषयांचा अभ्यास नसलेल्यांना आकलन होणे अवघड आहे.

२. ज्यांचे लेखन आवर्जून वाचावे अशा भारतीय लेखकांमध्ये आढळणारी एक समान गोष्ट म्हणजे हे सर्व लोक प्राचीन भारतीय साहित्याचे सखोल वाचक आहेत. शांता शेळके, इरावती कर्वे, दुर्गाबाई भागवत, नरहर कुरूंदकर, टागोर, गांधीजी. अमर्त्य सेनही याला अपवाद नाहीत. बृहदारण्य उपनिषदातील याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीच्या संपत्ती आणि तिचे मानवी आयुष्यातील स्थान यावरच्या संवादात मैत्रेयी विचारते, “ज्यामुळे मला अमरत्व मिळणार नाही अशी वस्तू घेऊन मी काय करू?” मैत्रेयीच्या या प्रश्नावर अमर्त्य सेन म्हणतात, “Maitreyi’s central question was useful to me to motivate and explain an understanding of development that is not parasitic on judging development by growth of GNP or GDP..”