गुस्ताव्ह फ्लोबेर, पोपट आणि कादंबरी

सार्वजनिक माध्यमांमध्ये काही आरोळ्या विशेष लोकप्रिय असतात. राज्य पातळीवर ‘मराठी भाषेचा लोप होतो आहे’ ही जशी नेहमी उठणारी आरोळी आहे तशीच आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘कादंबरी हा प्रकार आता मृत झाला आहे (यावेळी अगदी नक्की बरं का!)’ हीसुद्धा नेहमी ऐकू येणाऱ्या आरोळ्यांपैकी एक. जागतिक स्तरावर कादंबरीच्या स्वरुपात गेल्या दोन-तीन शतकात अनेक बदल झाले. ग्रॅंट स्नायडरने हे एका कार्टूनमधून उत्तम प्रकारे दाखवलं आहे. हा प्रवास बरेचदा नैसर्गिकपणे झाला – इथे नैसर्गिकचा अर्थ सामाजिक, राजकीय आणि/किंवा व्यक्तिगत पातळीवर घडणारे बदल आणि त्या बदलांना दिलेली प्रतिक्रिया असा घ्यावा. सुरुवात पारंपरिक कादंबरी वाचनापासून झाली, नंतर इतर प्रकारांची ओळख होत गेली – अजूनही होते आहे. यातले काही आवडले, पटले, इतर काही तितकेसे पटले नाहीत किंवा भावले नाहीत. नंतर एक गोष्ट लक्षात आली. बहुतेक वेळा एखाद्या नवीन प्रकारची कादंबरी वाचण्याआधी त्या प्रकाराची ओळख करून घेतली नाही तरी चालू शकतं. किंबहुना कधीकधी पथ्यावरच पडतं. उदा. मुराकामीचं साहित्य आधुनिकोत्तर प्रकारात मोडतं पण ते पारंपरिक जरी असतं तरी तो तितकाच आवडला असता यात शंका नाही कारण त्याच्या कादंबऱ्या वाचल्यावर जे मिळतं ते या प्रकारांच्या वर्गीकरणाच्या पलिकडे असतं.

नुकतीच ज्युलियन बार्न्स या ब्रिटीश लेखकाची ‘फ्लोबेर्स पॅरट’ ही कादंबरी वाचली. खरं सांगायचं तर विशेष आवडली नाही तरीही त्यावर लिहावसं वाटलं याचं कारण बार्न्सने यात अनेक गमतीजमती केल्या आहेत. एकदा वाचताना ठीक वाटतात. गुस्ताव्ह फ्लोबेर हा एकोणिसाव्या शतकातील प्रसिद्ध फ्रेंच लेखक. याने कादंबरीत ‘वास्तववाद’ आणला असं मानलं जातं. याच्या साहित्यामध्ये प्रसंग आणि परिसर यांचं अचूक वर्णन असे, आणि हे वर्णन शक्य तितकं अचूक व्हावं, ते वाचल्यावर वाचकाच्या डोळ्यासमोर चित्र यावं यासाठी फ्लोबेर खूप परिश्रम घेत असे. ‘अ सिंपल हार्ट’ नावाची लघुकथा लिहीत असताना त्या कथेत एक पोपटाचं पात्र होतं. त्याचं वर्णन हुबेहुब व्हावं म्हणून फ्लोबेरनं एक पोपट उसना आणला आणि कथा लिहून होईपर्यंत तो त्या पोपटासमोर बसून त्याचं निरिक्षण करत होता. बार्न्सच्या कादंबरीच्या नावाचा हा संदर्भ आहे. बार्न्स हा आधुनिक लेखक – सोप्या शब्दात सांगायचं तर कादंबरीच्या पारंपरिक नियमांना न जुमानणारा. कादंबरीच्या मुख्य पात्राला – जेफरीला – फ्लोबेरमध्ये खूप रस असतो आणि तो त्याच्या आयुष्यातील सर्व धागेदोरे शोधत असतो. एका वास्तववादी लेखकावर कादंबरी लिहीताना बार्न्सने जी कादंबरी लिहीली ती वास्तववादाचं दुसरं टोक आहे.

ब्रिटीश लेखक विल सेल्फ हा अशा आरोळ्या मारणाऱ्यांमध्ये आघाडीवर असतो. नुकताच त्याचा याच आशयाचा एक लेख (का?) वाचला. ढीगभर बोलूनही मुद्यावर न येण्याची कला याला छान साधते. लेखाचा सारांश असा : अजूनही आधुनिकतावाद (मॉडर्निझ्म) चालू आहे – सेल्फसाहेबांना आधुनिकतावाद लई प्रिय. त्याच्या नंतरचं किंवा आधीचं काहीही त्यांना मंजूर नाही. जेम्स जॉयसने ‘फिनेगन्स वेक’ लिहीली तेव्हाच कादंबरी हा प्रकार मरणासन्न झाला. त्यानंतर अनेक चांगल्या कादंबऱ्या लिहील्या गेल्या हे मान्य पण त्यांच्यात काही राम नव्हता. (म्हणजे त्या कादंबऱ्या चांगल्या होत्या की नाही? एक पे रैना – घोडा या चतुर.) नंतर अनेक प्यारे(मोहन नाही, ग्राफ) डिजीटल मिडीया कसा फोफावतो आहे, रॉक संगीतात राम, सुग्रीव किंवा जांबुवंत कसे उरलेले नाहीत, सोशलिझ्म, लोकांचं वाचन कसं कमी झालं आहे याडा, याडा. आणि अर्थातच मागच्या दशकात रोलिंग बाईंच्या हॅरी पॉटर कादंबऱ्या धो-धो चालल्या याचा इथे काहीही संबंध नाही कारण सेल्फसारखे उच्चभ्रू लेखक ज्या हस्तीदंती मनोऱ्यांमध्ये राहतात तिथे रोलिंगबाइंचं नाव जरी ऐकलं तरी आत्मशुद्धी करावी लागते म्हणे. साहजिकच हॅरी पॉटरमुळे किती लहानग्यांना वाचनाची गोडी लागली हा मुद्दा विचारात घ्यायचं कारणच नाही. सुरूवात कादंबरी हा प्रकार मृत झाला आहे अशी, शेवट गंभीर कादंबऱ्या अजूनही लिहील्या आणि वाचल्या जातील असा. मधलं लांबलचक गुर्हाळ वाचल्यानंतरही हातात काही न पडल्यामुळे बिचारे वाचक कपाळ बडवून घेतात. ही कपाळबडवी लेखावर आलेल्या प्रतिक्रियांमध्ये उत्तम प्रकारे दिसली. क्षणभर आंग्लाळलेल्या मुक्तपीठावरच्या प्रतिक्रिया वाचतो आहोत की काय असा भास झाला. एक उदाहरण, “Well basically, the novel is dead because a metaphorical rhombus-shaped canary wants to go down a mine rather than read one. Or something. And because Western European socialists don’t like Stalinism or Hollywood. It’s pretty simple really, who needs any statistics or proof?”