१. पहिला पदार्थ अर्थातच पिझ्झा. इटलीला जाण्याआधी मी डॉमिनोजचा पिझ्झा खाल्ला होता. इटलीला जो पिझ्झा मिळतो त्यात आणि डॉमिनोज पिझ्झामध्ये फारसं साम्य नाही. मला बहुतेक पिझ्झ्यांचं भारतीय रूप आवडत नाही – म्हणजे पनीर किंवा इतर भारतीय मसाले घालून केलेलं. इटालियन पिझ्झा दिसायला ओबडधोबड असतो, त्यात टॉपिंग नावाचा प्रकार नसतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा पिझ्झा भट्टीत केलेला असतो त्यामुळे कधीकधी थोडासा जळालेला असतो. समजा म्याकडोनाल्डने झुणका-भाकरीची फ्रॅंचाईझ घेतली आणि निर्जंतुक वातावरणात यंत्राने भाकऱ्या केल्या तर त्यात आणि बायजाबाईने केलेल्या चुलीवरच्या भाकऱ्यांच्या चवीत जो फरक असेल तोच इथेही आहे. इटलीमध्ये प्रत्येक भागात मिळणाऱ्या पिझ्झाची चव वेगळी असते. नेपल्स ही पिझ्झाची जन्मभूमी. तिथला पिझ्झा अवर्णनीय असतो. बहुतेक वेळा इटालियन पिझ्झा कापू देत नाहीत त्यामुळे सुरीने आपल्यालाच कापावा लागतो.
याखेरीज तिथे दुकानात पिझ्झाचे चतकोर तुकडेही विकतात. वेगवेगळ्या चवीचे दोन-तीन तुकडे घेतले तर मजा येते.
२. इटलीच्या लिगुरिया भागात (पश्चिम इटली) फोकाच्या (Focaccia) नावाचा पदार्थ मिळतो. फोकाच्या हा ब्रेडचाच एक प्रकार आहे. पीठ, ऑलिव्हचं तेल आणि वेगवेगळ्या प्रकारचं मीठ. ताजा खाल्ला तर नरम, वाळलेलाही छान लागतो. हा सँडविचसाठीही वापरता येतो.
३. रिझोत्तो आल फुंगी (Risotto al funghi) म्हणजे मश्रूम आणि भात. इटालियन जेवणाचं एका वैशिष्ट्य म्हणजे मसाले फारसे नसतात त्यामुळे बहुतेक पदार्थ त्यांच्या मूळ चवीनुसार लागतात. इथे मश्रूम आणि कांदा ऑलिव्हच्या तेलात आणि/किंवा लोण्यात परतून घेतात. कधी थोडी व्हाइट वाईनही घालता. मग त्यात चिकन किंवा इतर ब्रॉथ घालून तांदूळ घालतात आणि शिजवतात. नंतर वरून पार्मेजान चीज.
४. तिरामिसु (Tiramisu). यात कॉफी, अंडी, साखर आणि मस्कारपोने चीज यांचं मिश्रण. मग वरून कोकोची पावडर पेरायची. मला गोड फारसं आवडत नाही पण तिरामिसु आवडतं.
५. एखाद्या वाईनची चव कशी आहे हे नेमकं सांगण्यासाठी इग्रजीत खास वेगळे शब्द आहेत. मराठीत हे शब्द नसताना वाईनची चव सांगणं अशक्य आहे. मला दोन वाईन आवडतात – कियांती क्लासिको (Chianti Classico) आणि प्रिमितिव्हो (Primitivo). दोन्ही रेड वाईन आहेत.
सर्व चित्रे विकी/गूगलवरुन साभार.