एके काळी मराठी चित्रपटांमध्ये माहेर, सासर, तुळशीवृंदावन, बांगड्या अश्या ‘कीवर्ड्स’ची चाहूल जरी लागली तरी बाया-बापड्या डोळ्याला पदर लावायला तयार व्हायच्या. विशिष्ट प्रकारच्या आड्यन्सला विशिष्ट गोष्टी दाखवल्या की त्यांच्या भावनांचा ड्याम (म्हणजे धरण, डॅम इट! चापट!) वाहायला लागतो. चित्रपट लोकप्रिय होण्यासाठी हे तंत्र अनेक जणांनी वापरलं आहे. काही लोक खुबीने वापरतात, काही ‘बुल इन चायनाशॉप’च्या धर्तीवर. हिंदी चित्रपटातही हे होतं पण तिथली ‘गिमिक्स’ इतकी प्रसिद्ध आहेत की त्याबद्दल परत लिहायची गरज नाही. आणि पॉश दिसत असले तरी हॉलिवूडचे चित्रपटही हेच करतात – फक्त त्यांचे भावनिक ‘वीक पॉइंट’ थोडे वेगळे आहेत आणि याबद्दल कुठे लिहून आल्याचं फारसं दिसत नाही.
‘इंडिपेडन्स डे’. जगबुडी आलेली आहे आणि वाचवण्यासाठी जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे दोन निधड्या छातीचे वीर. आणि ते लढाईला जात असताना निरोप देण्यासाठी दोन गोजिरवाणी पोरं. ही पोरं बहुतेक वेळा सोनेरी केस, निळे डोळे या वर्गात बसतात. (इथे विल स्मिथ आहे त्यामुळे थोडा बदल. शिवाय सर्वात शक्तिशाली देशात आता वर्णद्वेषही राहिलेला नाही हा यामागचा संदेश. बघा! दिग्दर्शक इथे दिसतो. ) अशा वेळी तो बाप मरायला चाललेला असताना ही कारटी हमखास विचारणार, “तुम्ही परत कधी येणार? ” मग लेखक-दिग्दर्शकांच्या वकुबाप्रमाणे बाप एक छोटेखानी भाषण किंवा संदेश देतो. बरेचदा ही मुलं जे काही संकट आलं आहे त्यात सापडतात. ह्याची उदाहरणं द्यायची म्हटली तर पानं भरतील पण उदाहरणं संपणार नाहीत. एका ‘स्टार-ट्रेक’ चित्रपटात संपूर्ण वेळ एकही मूल दिसलं नाही. तसंही यानावर मुलं कुठून असणार? पण एका प्रसंगात क्लिंगॉनचा हल्ला होतो आणि लगेच बाया-बापड्या आणि लहान मुलं सुरक्षित ठिकाणी जाताना दिसतात. ‘अपोलो-१३’ हा सर्व बाबतीत उल्लेखनीय चित्रपट पण तिथेही यान संकटात सापडलेलं असताना कमांडर जिम लॉवेलच्या तीन लहान मुलांवर नको इतका फोकस करण्याचा मोह रॉन हॉवर्डला आवरता आला नाही. ‘इंटरस्टेलर’मध्ये स्पेशल इफेक्ट्सवर इतकी मेहनत घेतली पण स्क्रिप्टचं काय? इथेही जग वाचवण्यासाठी नायक जाताना त्याच्या मुलीबरोबर परत तोच प्रसंग. मनमोहन देसाईंनी ज्याप्रमाणे ‘लॉस्ट अँड फाउंड’ फॉर्म्युला शेवटपर्यंत सोडला नाही, तसंच हॉलिवूडही गोजिरवाण्या अमेरिकन मुलांचा बाप जग वाचवतो हा फॉर्म्युला सोडायला तयार नाही.
‘ज्यूरासिक पार्क’ थोडासा वेगळा आहे. स्पिलबर्गने लहान मुलांवर अनेक चित्रपट केले. ‘इ. टी. ‘ संपूर्णपणे मुलांचाच होता पण त्यात कथा मुलांच्या दृष्टिकोनातून मांडली होती. चित्रपटात बराच वेळ कॅमेरा मुलांच्या नजरेतून बघतो. ‘ज्यूरासिक पार्क’मध्येही मुलं संकटात सापडतात पण या मुलांच्या व्यक्तिरेखा अधिक गहिर्या होत्या. त्यांची व्यक्तिमत्त्वं परस्परविरोधी आणि म्हणूनच एकमेकांना पूरक होती. शिवाय डॉ. ग्रँटला मुलांची आवड नसणं आणि त्यातून निर्माण होणारे प्रसंग रोचक होते.
या सर्वांच्या मुळाशी ‘अमेरिकन ड्रीम’ आहे. मॉरगेजखाली घेतलेलं स्वतःचं घर, चौकोनी कुटुंब, कुत्री-मांजरं वगैरे. थोडक्यात ‘अ वाइफ अॅड अ फॅमिली अँड अ डॉग अँड अ कॅट’ (चित्रपट कोणता ते ओळखा! ). मात्र यात ‘अल्टर्नेटीव्ह फ्यामिली’ येत नाही. बॅड पब्लिसिटी. या ड्रीमवर कोणतंही संकट आलं की अमेरिकन प्रेक्षकाच्या भावनेला हात घालता येतो आणि हॉलिवूडचे पटकथा लेखक याचा पुरेपूर फायदा घेतात.
अर्थातच अपवाद आहेत आणि सन्माननीय आहेत. ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’मधली स्काउट फिंच. लहान मुलीची इतकी सशक्त आणि गहिरी व्यक्तिरेखा क्वचितच बघायला मिळते. याचं श्रेय अर्थातच मूळ कादंबरीची लेखिका हार्पर ली हिला जातं. वर्णद्वेषाचा संघर्ष एका लहान मुलीच्या नजरेतून दाखविणे या कल्पनेवर बेतलेला हा चित्रपट मैलाचा दगड ठरावा. त्याचप्रमाणे मार्जरी किनॅन रोलिंग्जच्या ‘द इयरलिंग’ (मराठी अनुवाद राम पटवर्धन यांचं ‘पाडस’) वर आधारित चित्रपटही उल्लेखनीय आहे. इथेही श्रेय लेखिकेला जातं.
या सर्वाहून वेगळी लहान मुलगी क्वेंतिन टॅरँटिनोच्या ‘किल बिल २’ मध्ये बघायला मिळते. टॅरँटिनोचा चित्रपट असल्याने याला अनेक पदर आहेत आणि याचे एकाहून अधिक अर्थ लावता येतात. टॅरँटिनोने हॉलिवूड आणि जपानी सिनेमांमध्ये नेहमी दिसणारी प्रतीकं वापरलेली आहेत मात्र बरेचदा यांचा वापर नेहमी होतो त्याच्या अगदी उलट केलेला आहे. ‘किल बिल २’मध्ये ‘वेस्टर्न स्फॅगेटी’ चित्रपटांचं संगीत आहे पण इथे मूळ व्यक्तिरेखा स्त्रीपात्र आहे. वेस्टर्न चित्रपटांमध्ये स्त्री पात्रांना नगण्य भूमिका असतात, टॅरॅटीनोने इथे त्याचा व्यत्यास केला आहे. (चित्रपट सुरू होतो तेव्हाचं संगीत बेथोवनच्या सुप्रसिद्ध पाचव्या सिंफनीवर बेतलेलं आहे, पण त्यातली गंमत काय ते अजून कळलेलं नाही. )
‘किल बिल २’ मधली लहान मुलीची व्यक्तिरेखा वरवर पाहिलं तर हॉलिवूड चित्रपटाला साजेशीच आहे. आई आणि बाप एकमेकांच्या जिवावर उठलेले असताना मध्ये सापडलेली एक गोंडस मुलगी. पण थोडं लक्षपूर्वक पाहिलं तर या व्यक्तिरेखेचं वेगळेपण लक्षात येतं. ही मुलगी तिच्या वयाला साजेसं न वागता प्रौढांसारखी वागते. जन्मल्यापासून आईला एकदाही बघितलेलं नसतं, तरीही इतक्या वर्षांनी आई दिसल्यावर तिची प्रतिक्रिया अत्यंत सौम्य असते. नंतर बाप मेल्यावर आईबरोबर राहत असताना तिला बाबांची आठवणही येत नाही. तिच्या अॅक्वेरियममध्ये असलेल्या माश्याला ती मारून टाकते. ही व्यक्तिरेखा विलियम गोल्डींगच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाइज’मधल्या मुलांच्या जवळ जाणारी वाटते. आपल्याकडे ‘प्रेमस्वरूप आई’ ही जशी ठोकळेबाज प्रतिमा आहे त्याचप्रमाणे हॉलिवूड चित्रपटात नेहमी दाखवली जाणारी निष्पाप, गोजिरवाणी मुलं तितकीच साचेबद्ध आहेत. या प्रतिमेला छेद देणारं पात्र टॅरॅंटीनोने निर्माण केलं आहे.
या पार्श्वभूमीवर लहान मुलं आणि नेहमीच ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ नसलेले अॅक्शनपट अधिक भावतात. जेम्स बाँडच्या चित्रपटांचा हा एक मोठा ‘प्लस पॉइंट’ म्हणता यावा. कियानु रीव्हजचा ‘स्पीड’, हॅरिसन फोर्डचा ‘द फ्युजिटीव्ह’ अशी काही उदाहरणे आहेत. तसंच क्युब्रिक, कपोला, ऑलिव्हर स्टोनसारख्या दिग्दर्शकांनी असे फॉर्म्युले वापरणं कटाक्षाने टाळलं आहे.