Categories
चित्रपट​

द आयर्न लेडी

पटकथा हा या चित्रपटाचा सर्वात मोठा शत्रू आहे. चित्रपट सुरू होतो वर्तमानकाळात आणि मग फ्लॅशबॅकने याची कथा उलगडत जाते. हे ठीक आहे, बर्‍याच चित्रपटात असं केलय. पण एकदा भूतकाळात गेलो की किती वेळा परत यायचं आणि जायचं याला काही मर्यादा?

चित्रपट बघताना अपेक्षा ठेवू नयेत हेच बरं म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. तरीही चित्रपटाचं नाव, कलाकार यांच्याबद्दल कळल्यानंतर नकळत काही अपेक्षा निर्माण होतातच. चित्रपटानं त्याही पूर्ण केल्या नाहीत तर मात्र विरस होतो. अर्थात हे गणित इतकं सरळ नसतं. बरेचदा दिग्दर्शक काही तरी वेगळंच सांगायचा प्रयत्न करत असतो आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचतच नाही.

The Iron Lady movie poster

‘द आयर्न लेडी’ हा मार्गारेट थॅचर यांच्यावर आधारित चित्रपट.  ‘आयर्न लेडी’चे निर्माते ब्रिटीश आहेत, याचा एक फायदा म्हणजे चित्रपटात बराच वेळ शांतता आहे. तरीही जिथे पार्श्व संगीत दिलं आहे तिथंही बरेचदा अति झाल्यासारखं वाटतं. थॅचर यांचं आत्मचरित्र वाचलेलं नाही त्यामुळे चित्रपटात दाखवलेल्या घटना कितपत वास्तवाला धरून आहेत याची कल्पना नाही. (पुस्तक यादीत टाकलं आहे पण तो हजार पानांचा ठोकळा आहे त्यामुळे त्याला वेळ लागेल.)

पटकथा हा या चित्रपटाचा सर्वात मोठा शत्रू आहे. चित्रपट सुरू होतो वर्तमानकाळात आणि मग फ्लॅशबॅकने याची कथा उलगडत जाते. हे ठीक आहे, बर्‍याच चित्रपटात असं केलय. पण एकदा भूतकाळात गेलो की किती वेळा परत यायचं आणि जायचं याला काही मर्यादा? इथे होतं काय की सध्याच्या थॅचर घरात फिरत असताना प्रत्येक वस्तू बघतात, मग त्या वस्तूशी निगडीत भूतकाळाचा तुकडा त्यांना आठवतो. हे आठवणं अर्थातच क्रमवार होतं आणि त्यामुळं अधिक कृत्रिम वाटतं. थॅचर यांच्या कारकीर्दीतील महत्वपूर्ण घटनांचेही काही तुकडे दाखवले आहेत, नंतर गाडी परत वर्तमानकाळात भोज्ज्याला शिवायला येतेच. मग प्रश्न पडतो की दिग्दर्शिकेचा फोकस काय आहे? सध्या थॅचर आजारी असतात, त्यांना बरेचदा विस्मृती होते. वर्तमानकाळावर फोकस ठेवल्यामुळे थॅचर यांची सध्याची परिस्थिती हाच चित्रपटाचा केंद्रबिंदू बनून जातो. त्यामुळे हा एका महत्वपूर्ण व्यक्तीमत्वाच्या कारकीर्दीवरचा चित्रपट आहे असं न वाटता ‘एकेकाळी शक्तीशाली असणार्‍या बाईला सध्या काय दिवस काढावे लागत आहेत, हाय रे ये फूटी किस्मत!’ असं दाखवणारा चित्रपट होऊन जातो. पैकी त्या राजकारणात आल्या तेव्हा स्त्रिया आणि राजकारण म्हणजे मासा आणि सायकल अशी परिस्थिती होती. या काळात त्यांना करावा लागलेला संघर्ष चांगला दाखवला आहे, पण इथेही तुकडे-तुकडे असल्याने एकसंध परिणाम साधता येत नाही. सुरूवात करूण, नंतर मध्येच थॅचर पंतप्रधान होण्याची तयारी करत असताना हलकंफुलकं वातावरण, मग परत वतमानकाळात करूण. यामुळे दिग्दर्शिकेला चित्रपटाचा टोन कसा ठेवायचा आहे हे स्पष्ट होत नाही. असं केल्यामुळे थॅचर यांच्यासारख्या चतुरस्त्र आणि धडाडीच्या व्यक्तीमत्वाला चित्रपट न्याय देऊ शकत नाही. असंच दिग्दर्शिकेला दाखवायचं असेल तर ठीके. पण मग त्याला थॅचर कशाला हव्यात, कुणीही चाललं असतं की!?

फ्लॅशबॅक अनेक दिग्दर्शकांनी परिणामकारक रीत्या वापरला आहे. एक चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे गांधी. संपूर्ण चित्रपट फ्लॅशबॅकमध्येच होतो पण कुठेही संगती खंडित होत नाही. थॅचर यांच्या आयुष्यातही ‘सिनेमॅटीक’ म्हणाव्यात अशा भरपूर घटना होत्या. त्यांचा राजकारणात प्रवेश, त्यासाठी प्रेरणा ठरलेल्या व्यक्ती, त्यांचे सहकारी, लोकशाहीकडून एकाधिकारशाहीकडे झालेला त्यांचा प्रवास, आयर्लॅंडच्या स्वातंत्र्याचा प्रश्न, फोकऍंडवरून अर्जेंटिनाशी झालेले युद्ध – अशा कितीतरी घटना प्रभावीपणे मांडता आल्या असत्या. पण इथे दिसतं काय तर आताच्या थॅचर सुपरमार्केटमध्ये दूध आणायला जातात आणि त्यांना कुणीच ओळखत नाही. किंवा स्वत:ची कपबशी स्वत:लाच विसळावी लागते आहे. हे म्हणजे सचिन तेंडुलकरवर चित्रपट काढायचा, त्यात ७०-८०% वेळ तो मॉडेलिंग करतोय, कार विकत घेतोय असं दाखवायचं आणि मधून मधून त्याच्या म्याचेसचे तुकडे दाखवायचे. मान्य आहे, सचिन या इतर गोष्टीही करतो पण महत्वाचं काय?

काही दिग्दर्शक व्यावसायिक अभिनेत्यांना मुद्दामहून टाळतात. निओरिअलिझ्म चळवळीतील इटालियन दिग्दर्शक व्हित्तोरियो डि सिका हे यातलं महत्वाचं नाव. बायसिकल थीव्ह्ज मध्ये निर्मात्यांच्या विरोधांना न जुमानता त्याने अभिनयाचे कुठलेही प्रशिक्षण नसणारे लोक घेतले आणि चित्रपट यशस्वी करून दाखवला. याचं दुसरं टोक म्हणजे यक्ष्ट्रा कलाकारही व्यावसायिक अभिनेतेच हवेत असा हट्ट धरणारे काही दिग्दर्शक. हॅरिसन फोर्डच्या ‘द फ्युजिटिव्ह‘ चित्रपटात शेवटी हाटेलात जो कॉन्फरन्सचा प्रसंग आहे त्यात बसलेले सर्व प्रेक्षकही व्यावसायिक अभिनेते आहेत. बरेच दिग्दर्शक या दोन टोकांचा सुवर्णमध्य निवडतात. गॉडफादरमध्ये कपोलाने महत्वाच्या भूमिकांसाठी व्यावसायिक अभिनेते निवडले, पण किरकोळ भूमिका चक्क आपल्या नातेवाईकां दिल्या. सुरूवातीच्या लग्नाच्या प्रसंगातील बरेच लोक त्याच्या घरची मंडळी आहेत तर कोनीची भूमिका करणारी अभिनेत्री त्याची सख्खी बहीण आहे. याचं मुख्य कारण म्हणजे गॉडफादर १ चं बजेट अत्यंत कमी होतं, स्टूडियोचा कपोलावर अजिबात भरवसा नव्हता आणि चित्रपट कधी बंद पडेल याचा नेम नव्हता . गांधी, थॅचर अशा ऐतिहासिक भूमिका असोत किंवा रोजच्या आयुष्यातील गुंतागुंतीच्या भूमिका – रेन मॅन मधला डस्टीन हॉफमन किंवा ‘डेड मॅन वॉकिंग’मधला विषारी इंजेक्शनची वाट बघणारा शॉन पेन हा कैदी आणि त्याला दिलासा देणारी सूझन सॅरॅंडन ही सिस्टर यांची अंगावर काटा आणणारी कथा – अशा वेळी व्यावसायिक अभिनेत्यांना पर्याय नाही असं वाटतं .

अशी निराशा झाली तर मी बरेचदा चित्रपट किंवा पुस्तक अर्ध्यातून सोडून देतो. किंवा फाष्ट फारवर्ड करून शेवटी काय होतं ते बघतो. (लाइफ इज टू शॉर्ट टू वेस्ट ऑन यू – साइनफेल्ड.) इथं मात्र तसं नाही केलं कारण एकच. मेरिल स्ट्रीप. हिच्याबदल जिम कॅरी एकदा म्हणाला होता, ‘देअर इन नो बॅड फिल्म ऑन धिस वुमन.’ यात अतिशयोक्ती असेल कदाचित पण सत्याचा अंशही बराच आहे. पटकथेने पांढरं निशाण दाखवल्यानंतर या बाईनं एकटीनं सगळा चित्रपट तारून नेला आहे. मेरिल स्ट्रीपच्या अनेक गुणांपैकी एक म्हणजे कोणत्याही प्रकारचे उच्चार ती लिलया आत्मसात करते. इथेही ब्रिटीश इंग्लिश बोलताना ही बाई अमेरिकन आहे असा संशयही येत नाही. ही भूमिका तिचा कस पाहाणारी होती आणि ती या कसोटीवर पुरेपूर उतरली आहे.

तळटीपा :
[१] गॉडफादरचे अनेक किस्से ऐकायचे असले तर त्याच्या ‘डायरेक्टर्स कट डीव्हीडी’ मधली कपोलाची कमेंट्री ऐका. सुरूवातीला ब्रॅंडोच्या मांडीवर जे मांजर आहे, ते असंच सेटवर फिरत होतं. शॉट घ्यायच्या आधी कपोलानं काही न बोलता ते ब्रॅंडोच्या मांडीवर ठेवलं, ब्रॅंडोनं अजिबात न बिचकता मांजरासकट शॉट दिला. टॉम हेगनला ओलिस ठेवतात त्या प्रसंगाच्या वेळी वादळ सुरू होतं, हवा इतकी खराब होती की शूटींग होईल की नाही याची खात्री नव्हती. शेवटी सोसाट्याचा वारा, बर्फ यांच्यासकट कपोलानं शूटिंग केलं. नंतर तेच वातावरण प्रचंड परिणामकारक ठरलं. अशा अनेक तडजोडी ऐकल्या आणि पाहिल्यावर अप्रतिम कलाकृती १००% परिपूर्ण असावी लागते हा गैरसमज दूर होतो.

[२] हे विषयांतर होतय हे मान्य आहे. पण कारण म्हणून कणेकरांचा एक किस्सा. लता मंगेशकर एका गायिकेच्या कॅसेट उद्घाटनाला गेल्या होत्या. तिथं बोलताना त्यांनी ती गायिका घर सांभाळून गाणी गाते वगैरे कौतुक केलं, तिच्या गाण्याविषयी काही बोलल्या नाहीत कारण बोलण्यासारखं काही नव्हतंच. इथेही मेरिल स्ट्रीप सोडून बाकी काही बोलण्यासाखं नाही.