चित्रपट पांढर्या पार्श्वभूमीवर सुरु होतो. कदाचित पांढरा पडदा असावा किंवा दुसरे काही, अंदाज येत नाही. पाच सेकंद, दहा, पंधरा काहीच होत नाही. शेवटी वैतागून आपण चुळबूळ करायला लागतो तेवढ्यात बंदुकीतून गोळी सुटल्यासारखा आवाज येतो, कॅमेरा फोकस होतो आणि पडद्यावर J हे अक्षर उमटते. आपण टंकलेखन क्लोजअप मध्ये बघतो आहोत हे लक्षात येता येता ओळ टंकीत झालेली असते June 1, 1972.
हा प्रसंग आहे ऑल द प्रेसिडेंट्स मेन ह्या चित्रपटाच्या सुरवातीचा. १९७२ ते १९७४ ही वर्षे अमेरिकेच्या इतिहासात विशेष ठरावीत. ह्याला कारण होते रिपब्लिकन राजवटीतील वॉटरगेट प्रकरण. १९७२ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयात घुसल्याच्या आरोपाखाली पाच लोकांना अटक झाली. हे पाचही लोक अमेरिकन गुप्तहेर संस्था सी. आय. ए. शी संबंधीत होते. त्यांच्याजवळ वॉकीटॉकी, फोन-टॅपिंगचे साहित्य अशी गुप्तहेरांच्या कामासाठी वापरली जाणारी उपकरणे सापडली. वृत्तपत्रांनी या घटनेकडे फारसे गंभीरपणे पाहीले नाही. अपवाद होते वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचे दोन वार्ताहर : कार्ल बर्नस्टीन आणि बॉब वुडवर्ड. यापैकी बॉबला कामावर रूजू होऊन उणेपुरे नऊ महीने झाले होते. कार्ल त्यामानाने अनुभवी होता. तपास घेताना ह्या प्रकरणात सत्तारुढ रिपब्लिकन पक्षाने सी. आय. ए, एफ. बी. आय. आणि जस्टीस या सरकारी संघटनांचा वापर डेमोक्रॅटिक पक्षातील लोकांवर पाळत ठेवणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांची निवडणुकीत हरप्रकारे मुस्कटदाबी करणे अशासाठी केल्याचे उघडकीस आले. ह्या प्रकरणाची परिणिती अखेर राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या राजीनाम्यात झाली. अमेरिकन राजकारणातील हा एक नीचतम बिंदू होता. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी या दोन पत्रकारांनी जे अथक परिश्रम केले त्याची कहाणी आहे हा चित्रपट. ह्याचा आधार आहे त्यांनी लिहिलेले ह्याच नावाचे पुस्तक.
ह्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे हॉलीवूडमध्ये तयार होऊनही ह्यावर हॉलीवूडची छाप नाही. सर्व प्रसंग कृत्रिम नाट्यमयता न आणता नैसर्गिकरीत्या चित्रित केले आहेत. असे असूनही उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते. तुरळक अपवाद वगळता कुठल्याही प्रसंगात कॅमेरा फिरत नाही. खुर्चीच्या पायांमधून किंवा भिंगोर्या खेळल्याप्रमाणे गोल फिरत कॅमेर्याच्या कोलांट्याउड्या न मारतादेखील दिग्दर्शक कसा ‘दिसू’ शकतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण. एक-दोन प्रसंगात कॅमेरा या दोघांपासून झूम-आऊट होत लॉग शॉटमध्ये शहराच्या विशालकाय इमारतींवर स्थिरावतो, एका बाजूला विशाल सत्ता आणि दुसर्या बाजूला दोन माणसे यातील विरोधाभास सूचित करणारा. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे कमीत कमी पार्श्वसंगीत. नेहमी ऐकू येतो तो टंकलेखन यंत्रांचा खडखडाट. त्यामुळेच क्लायमॅक्सच्या वेळी वापरलेले विवाल्दीचे संगीत अत्यंत परिणामकारक ठरते.
या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ऍलन पाकुला. वुडवर्ड आणि बर्नस्टीन यांच्या भूमिकेत अनुक्रमे रॉबर्ट रेडफोर्ड आणि डस्टीन हॉफमन आहेत. याशिवाय रेडफोर्ड पाकुलाबरोबर सहनिर्माताही होता. या चित्रपटाच्या कल्पनेपासून शेवटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेडफोर्डचा महत्त्वाचा वाटा आहे. याचे चित्रीकरण आधी वॉशिंग्टन पोस्टच्या कार्यालयात करायचे ठरले होते. पण ते अशक्य आहे असे दिसल्यावर ह्या चमूने या वृत्तपत्राची आख्खी न्यूजरुम जशीच्या तशी स्टुडिओत उभी केली. अगदी कचरापेटीतील कचराही मूळ कार्यालयातून आणलेला होता. चित्रपटात कुठलीही राजकारणी व्यक्ती प्रत्यक्ष दिसत नाही. फक्त फोनवरून त्यांचे आवाज ऐकू येतात. याशिवाय काही ठिकाणी निक्सन आणि इतरांच्या दूरचित्रवाणीवरील फिती वापरल्या आहेत.
या चित्रपटाचे चित्रीकरण दिग्दर्शक होते गॉडफादर चित्रित करणारे गॉर्डन विलीस. त्यांची खासियत म्हणजे कमी प्रकाशातील चित्रीकरण. यासाठीच त्यांचे ‘प्रिंस ऑफ डार्कनेस’ हे टोपणनाव पडले. या चित्रपटात प्रामुख्याने दोन ठिकाणी घडणारे प्रसंग आहेत. एकतर न्यूजरूम मध्ये किंवा बाहेर. बाहेर घडणार्या गोष्टी पडद्याआड आहेत, त्यातले खरे किती, खोटे किती हे माहीत नाही. याउलट न्यूजरूममध्ये आहे कठोर सत्य. ह्याला अनुसरून विलीस यांनी बाहेरचे बहुतेक सर्व प्रसंग कमी प्रकाशात किंवा जवळजवळ अंधारात चित्रित केले आहेत. आणि न्यूजरूममध्ये आहे भावनाविरहीत, फ्लूरोसंट असा प्रखर प्रकाश. या दोन्हींचा विरोधाभास खूपच प्रभावी झाला आहे.
पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा रेडफोर्ड किंवा हॉफमन यांच्या अभिनयाकडे फारसे लक्ष गेले नाही. कारण हा अभिनय होता हे कुठे जाणवलेच नाही, इतका तो नैसर्गिक होता. परत बघितला तेव्हा त्यांच्या अभिनयातील विविध बारकावे लक्षात येऊ लागले. हॉफमन/बर्नस्टीन सतत सिगरेट पिणारा, नर्व्हस एनर्जीने भरलेला, तथ्यांपेक्षा ‘गट फिलींग’वर जास्त विश्वास ठेवणारा. याउलट रेड्फोर्ड/वुडवर्ड शांत, मितभाषी, डोक्याने काम करणारा. दोघांमधील समान गोष्ट म्हणजे हार न मानता अथक परिश्रम करण्याची वृत्ती. कार्ल आणि बॉब यांचे स्वभाव, त्यांच्या लकबी, त्यांची एकमेकांशी वागण्याची पद्धत ह्या सर्वांची इत्थंभूत माहिती त्या दोघांकडून घेतली गेली होती. यासाठी रेडफोर्ड आणि हॉफमन यांनी त्या दोघांबरोबर बराच काळ व्यतीत केला. प्रसंगांशी पूर्णपणे तन्मय होण्यासाठी रेडफोर्ड आणि हॉफ़मन यांनी स्वतःच्या संवादांबरोबर एकमेकांचेही संवाद पाठ केले होते.
ह्या चित्रपटातील बरेच प्रसंग लक्षात राहतात. माझा सर्वात आवडता प्रसंग रेडफोर्डचा आहे. वुडवर्डला बर्नस्टीनचा फोन येतो की वॉटरगेटमध्ये पकडलेल्या चोरट्यांपैकी एकाच्या बॅंक अकाउंटमध्ये केनेथ डॉलबर्ग या नावाने एक चेक आहे. वुडवर्ड त्याच्या टेबलासमोर येऊन बसतो. कॅमेरा मिड-शॉट, मागची ऑफिसातली गडबड आपल्याला दिसते. डॉलबर्गला फोन लागतो. तो प्रेसिडेंट रिइलेक्शन कमिटीचा मिडवेस्ट फायनान्स चेअरमन आहे हे कळते, पण त्याला चेकबद्दल विचारल्यावर तो फोन कट करतो. वुडवर्ड अस्वस्थ होतो, काय करावे याच्या विचारात. कॅमेरा अत्यंत हळूहळू पुढे सरकतो आहे. मग तो प्रेसिडेंट रिइलेक्शन कमिटीला फोन लावतो. तिथे कमिटी प्रमुख टाळाटाळीची उत्तरे देतो. त्याच्याशी वादावादी चालू असतानाच दुसर्या लाइनवर परत डॉलबर्गचा फोन येतो. त्याला एक सेकंद थांबायला सांगून वुडवर्ड कमिटी चेअरमनला वाटेला लावतो आणि परत डॉलबर्गकडे. कॅमेरा आता क्लोजअपमध्ये. डॉलबर्ग माहिती देत असतो. महत्त्वाचा प्रश्न, “तुमच्या नावाचा चेक चोरट्यांच्या अकाउंटमध्ये कसा आला?” “मी खरंतर हे तुम्हाला सांगायला नको.” वुडवर्डच्या चेहेर्यावर उत्कंठा, अपेक्षा अशा अनेक भावनांचा कल्लोळ. “मी तो चेक स्टॅंझ यांना दिला.” “आय बेग युअर पार्डन???” वुडवर्ड खुर्चीतून खाली पडायचा बाकी असतो. स्टॅंझ म्हणजे निक्सन यांच्या अर्थखात्याचे प्रमुख. हे प्रकरण इतक्या वरपर्यंत जाईल असे त्याच्या स्वप्नातही नसते. फोन संपवून तो घाईघाईने बातमी टंकित करत असतानाच परत बर्नस्टीनचा फोन येतो. वुडवर्ड त्याला ही आनंदाची बातमी देतो आणि शॉट संपतो. तब्बल पावणेसहा मिनिटांचा सलग शॉटमध्ये रेडफोर्डचा नैसर्गिक अभिनय. एका ‘मस्ट सी’ चित्रपटातील हा ‘मस्ट ऑब्झर्व्ह’ शॉट आहे.
चित्रपटाच्या शेवटी या दोघांना कळते की हे प्रकरण राष्ट्राध्यक्षांपर्यंत गेलेले आहे, पण अजून पुरावे मिळायचे बाकी असतात. दूरचित्रवाणी संचावर नुकत्याच निवडून आलेल्या निक्सन यांचा शपथविधी चाललेला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वुडवर्ड आणि बर्नस्टीन टंकलेखन करताना. शेवटच्या शॉटमध्ये परत टंकलेखन यंत्राचा क्लोज-अप आणि धडधड टंकित होणार्या वॉशिंग्टन पोस्टच्या हेडलाइन्स. शेवटची हेडलाईन.. “निक्सन रिझाइन्स” आणि चित्रपट संपतो.