Categories
संगीत​

रॉकस्टार

काय बोलायचं? जितकी प्रशंसा करणं शक्य आहे ती आधीच करून झाली आहे. आता नवीन शब्द कुठून आणायचे? या पोतडीतून निघालेला लेटेश्ट आविष्कार म्हणजे ‘रॉकस्टार’. रहमानची गाणी ऐकताना नेहेमीप्रमाणे आपल्या ऐकण्यात बदल होत जातात. पहिल्यांदा वाटतं, काय केलय हे? ह्याला गाणं म्हणायचं? नंतर एक दोनदा ऐकलं की ते गाणं आपोआप मनात वाजायला लागतं आणि तुम्हाला कळायच्या आत तुम्ही त्या गाण्याचे पंखे होऊन जाता. मग वाटतं, हे गाणं आपल्याला पहिल्यांदा आवडलं नव्हतं? कसं शक्य आहे आहे हे? आमिर खान एका मुलाखतीत म्हणाला होता, “रंगीलाच्या वेळेस रामू गाण्यांची कॅसेट घेऊन माझ्याकडे आला आणि आम्ही ‘मंगता है क्या, वो बोलो’ ऐकत होतो. मी रामूला म्हणालो, ‘हे काय आहे? तू चुकून साउथच्या गाण्याची कॅसेट तर नाही आणलीस?’ चार-पाच वेळा ऐकल्यावर ते गाणं आमच्या रक्तात भिनलं.”

असं का होतं याची बरीच कारणं आहेत. एक तर रहमान कधीही नियम पाळत नाही. त्याच्या गाण्यात पुढच्या ओळीत, अंतर्‍यात काय असेल याची कल्पना करणं अशक्य असतं. म्हणूनच जुन्या रूढी प्रिय असणार्‍या लोकांना रहमान भावत नाही. मग त्याच्यावर सिंथेटीक असल्याचा शिक्का मारला जातो. लगान, भगतसिंग किंवा रंग दे बसंतीच्या संगीताला सिंथेटीक कसे म्हणता येईल हे तो दयाघन प्रभूच जाणे. टीकाकारांचे मुख्य ध्येय टीका करणे असते, त्यात सत्याचा अंश किती ही बाब गौण असते. म्हणूनच सत्यजित रेंवर गरीबीचे भांडवल केल्याचा आरोप होतो, ‘खालील अशुद्ध बंगालीतील उतारा शुद्ध बंगालीत लिहा’ असे म्हणून परीक्षेत टागोरांचा उतारा घालण्यात येतो आणि बेथोवनची नववी सिंफनी ऐकताना मला जागे रहाणे अशक्य झाले असे एक टीकाकार म्हणतो. या सर्वांमध्ये एक समान धागा आहे. हे सर्व लोक चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन, वेगळे देण्याचा प्रयत्न करीत होते. सत्यजित रेंनी ‘पाथेर पांचाली’ बनवताता तत्कालीन बंगाली सिनेमातील बटबटीत मेलोड्रामा कटाक्षाने टाळला, टागोरांची वैश्विक जाणीव क्षुद्र मनांच्या कुवतीबाहेरची होती आणि क्लासिकल संगीताचे नियम धाब्यावर बसवून बेथोवनने ‘सेल्फ एक्सप्रेशन’चा घालून दिलेला पायंडा काळाच्या पुढे होता.

गेली काही वर्षे रहमान जागतिक पातळीवर संगीत देतो आहे आणि याचे पडसाद त्याच्या संगीतामध्ये दिसतात. रॉकस्टार हा चित्रपट नावाप्रमाणेच एका गायकाच्या प्रवासावर आधारीत आहे. यात रहमानने तब्बल १३ गाणी दिली आहेत आणि प्रत्येक गाणे वेगळे आहे. मुख्य गायक म्हणून मोहीत चौहानने कमाल केली आहे. ‘मसक्कली’मध्ये जी त्याच्या आवाजाची कसोटी लागली होती तो ट्रेलर होता. ‘रॉकस्टार’ची गाणी गायल्यावर त्याला डबल मॅरॅथॉन केल्यासारखे वाटले असणार. ‘शहर में’ किंवा ‘हवा-हवा’ मध्ये किशोरच्या यॉडलिंगची आठवण करून देणार्‍या करामती आहेत. इथे किशोरदा आणि रहमान एकत्र आले असते तर बहार आली असती असा विचार मनात येतो. रॉकस्टार नाव असूनही रहमानने सर्व गाणी रॉकच्या मुशीत बसवलेली नाहीत. ‘सदा-हक’ हिंदी चित्रपटातील पहिले रॉक गाणे म्हणून ओळखले जावे. (अवधूत गुप्तेंचा ‘कांदेपोहे’ हा मराठीतील प्रयत्न उल्लेखनीय होता. मराठी रांगडी भाषा आहे हे खरेच, मात्र भूतकाळच्या आणि अट्टहास हे शब्द टाळता आले नसते का?) ‘कुन-फाया-कुन‘ ऐकल्यावर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यात गेल्याचा भास होतो तर कतेयां करू बाबा बुल्लेशाहची आठवण करून देते. गाण्यातील रहमानच्या प्रयोगांबद्दल काय बोलावे? अरेबिक संगीत, फ्लेमेंको ते पारंपारिक कव्वाली – या माणसाला काहीही वर्ज्य नाही. रॉकस्टारची गाणी तब्बेतीने ऐकण्यासारखी आहेत. त्यातील करामती, लटके-झटके लक्षात यायलाही वेळ लागतो. ‘शीला की जवानी’ साडेतीन मिनिटात ऐकून होते, तसे इथे नाही. हे संगीत अंगात मुरावे लागते.