त्याला दर वेळी हे कसे काय जमते? हा प्रश्न मी पुन्हा पुन्हा स्वत:ला विचारतो. वाक्यांकडे, शब्दांकडे निरखून पाहिले तर ते नेहेमीचेच शब्द, नेहेमीचीच वाक्ये असतात. त्यात पुन्हा हे अनुवादित साहित्य, म्हणजे थोडा बदल नक्कीच झाला असणार. तरीही या वाक्यांमध्ये वातावरण निर्मितीची ही जादू कुठून आली? जर मी तेच वाक्य लिहीले तर तोच परिणाम साधेल का?
प्रश्न, प्रश्न, प्रश्न! असे बरेच प्रश्न पडले त्याचे पुस्तक वाचल्यानंतर. खरे तर पुस्तक वाचले, आवडले की त्याचे साग्रसंगीत परीक्षण करायचे असते. हे उपरोधिकपणे म्हणत नाहिये, मीच आत्तापर्यंत तसे केलेले आहे. पण हे पुस्तक वाचल्यानंतर काय लिहायचे असा प्रश्न पडला. एखाद्या जादूगाराच्या प्रभावाखाली संमोहित झालेल्या प्रेक्षकासारखी अवस्था झाली. त्याची वेगवेगळी पुस्तके म्हणजे वेगवेगळ्या कथा असल्या तरी बरेचदा त्यामुळे फारसा फरक पडत नाही. प्रत्येक लेखकाची काही शक्तीस्थाने असतात. मॉम पात्रांच्या मनोव्यापारातील बारकावे इतके अचूक दाखवतो की दाद दिल्यावाचून राहवत नाही. डिकन्स पात्र दोन मिनिटांसाठी येणार असले तरी त्याचे वर्णन इतके हुबेहूब करतो की ते पात्र जिवंत होते. याचे तसे काहीच नाही. याच्या व्यक्तिरेखा शार्प फोकसमध्ये कधीच येत नाहीत, नेहेमी काहीश्या धूसर रहातात. व्यक्तिरेखा ‘डेव्हलप’ करण्याचे प्रयत्न तो निदान जाणीवपूर्वक तरी करताना दिसत नाही. कारण त्याचे मुख्य उद्दीष्ट तुम्हाला त्या वातावरणात घेऊन जाणे असते. हे वातावरण म्हणजे १९७०-८० च्या दशकातील जपान. बीटल्स, रोलिंग स्टोन्स, एरिक क्लॅप्टन, बेथोवन, शूबर्ट, बर्ट बॅकॅरॅक यांचे संगीत. जॉन अपडाइक, एफ. स्कॉट फिट्झजेराल्ड, रेमंड शॅंरलर यांची पुस्तके. टोक्योमधील कॅफे, बार. एखादे तरी मांजर, कधी कधी बरीच मांजरे. आणि नायक? एकलकोंडा, वाचनाची आवड असलेला, उत्तम संगीत ऐकणारा, मितभाषी, विवेकी असावा अशी शंका येण्यासारखे वर्तन. बराचसा आत्मचरित्रपर भासावा असा. वूडी ऍलनच्या बहुतेक चित्रपटांमधील नायक जसा स्वत:वरच बेतलेला असतो तसा. पण त्याला एका मुलाखतीत याबद्दल विचारले तर तो म्हणाला, “माझे लेखन आत्मचरित्रपर नसते, जरी तसे वाटले तरीही. आत्मचरित्रपर लिहायचे म्हटले तर पुस्तक पंधरा-वीस पानात संपून जाईल. नायक माझा जुळा भाऊ आहे असे समजा. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वाढल्यामुले काही साम्ये आहेत पण बरेच फरकही आहेत.”
बहुतेक कथा गूढतेच्या अंगाने जाणार्या. पण या कथेमध्ये त्याने मुद्दाम तो मार्ग चोखाळण्याचे टाळले. संपूर्णपणे वास्तववादी कथा आपल्याला लिहीता येते का हे त्याला बघायचे होते. त्यामुळेच या कथेत कोणतीही रहस्यमय पात्रे नाहीत, स्थल-कालाच्या सीमा धूसर होत नाहीत. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याचा नायक नेहेमी दोन जगांमध्ये वावरत असतो, खरे जग आणि आभासी -ज्याला तो स्पिरिचुयल जग म्हणतो. या कथेमध्ये या दोन जगांमध्ये विशेष संघर्ष होत नाही, पण तरीही शेवट थोडासा धूसर रहातोच. (आणि शेवट नेमका काय आहे यावर आंतरजालावर चर्चांच्या फैरी झडतात.) माझ्या मते शेवट महत्वाचा आहे पण नेहेमीच्या कथांमध्ये असतो तितका नाही. कारण त्या शेवटापर्यंत तुम्ही कसे गेलात हे ही तितकेच महत्वाचे आहे आणि इथेच वाचकांच्या अनूभूतीचा प्रश्न येतो. कारण पुस्तक वाचण्यापूर्वी वाचक कुठे आहे, पुस्तकातील वातावरणाला तो कसा सामोरा जातो यावर बरेचसे अवलंबून आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे मला जो संमोहित करणारा अनुभव आला तो सर्वांनाच येईल याची खात्री मी पामर कशी देणार?
वेगवेगळ्या ऋतूंचे, त्या ऋतूंमध्ये होणार्या सूर्यप्रकाशाच्या खेळांचे, सावल्यांचे, सकाळ-संध्याकाळ-रात्रींचे, पावसांचे, वार्यांचे, झाडांचे-पानांचे, त्याने केलेले नेटके वर्णन इतके चपखल असते की काही वाक्यांमध्येच आपल्याला त्या वेळेचा, त्या परिस्थितीचा ‘फील’ येतो. आणि त्याला लगडून येतात अनेक भावना. एकटेपणा किंवा इंग्रजीत bereft म्हणता येईल अशा ठळक भावना आहेतच पण याचबरोबर शब्दांच्या रकान्यांमध्ये चपखल न बसणार्या, किंवा भाषेच्या मर्यादेमुळे ज्यांच्यासाठी रकानेच नाहीत अशाही भावना आहेत. कदाचित यामुळेच त्यांचे अस्तित्व नायकलाही बरेचदा नीटसे जाणवत नाही. आपल्यालाही तसेच होते, शब्द मेंदूपर्यंत जातात, अनूभूती येते.
मी त्याची पुस्तके पुरवून पुरवून वाचतो आहे. नॉर्वेजियन वुडवर टिकमार्क केला. आता सातच कादंबर्या शिल्लक आहेत.