Categories
इतर

आषाढस्य प्रथम दिवसे

कालिदासाला सोळाशे वर्षांपूर्वी आजूबाजूला जे दिसलं असेल त्यातलं आज फार थोडं शिल्लक असावं, पण त्याला जे आकाश दिसलं असेल तेच आपल्यालाही दिसतं आहे.

आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं।
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श।।

आषाढाच्या पहिल्या दिवशीं बघतो शिखरीं मेघ वांकला,
टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडातुर गज जणूं ठाकला!

(अनुवाद : शान्ता शेळके)

आशिया खंडातील मान्सून गेल्या ५० ते ८० लाख वर्षांपासून अस्तित्वात आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. चार महिन्यांच्या कडक उन्हाळ्यामध्ये जमिनीवरची हवा तापून वर जाते. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि या जागेत समुद्रावरची थंड आणि ओली हवा येते. भारताच्या तापलेल्या जमिनीवर हे थंड वारे वाहू लागतात. जसजसे हे वारे वर-वर जातात, तसतसं त्यांचं तपमान कमी होतं, वाफेचं पाणी आणि कधीकधी बर्फ होतो आणि पाऊस येतो, गाराही पडतात. महाराष्ट्रात सह्याद्री आणि उत्तरेकडे हिमालय या वार्‍यांना अडवण्यासाठी भिंतीचं काम करतात. इथे पोचण्यासाठी पावसाच्या प्रत्येक थेंबानं हजारो मैलांचा प्रवास केलेला असतो. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र यांच्यामधलं हजारो टन पाणी वाफेच्या रूपानं हा प्रवास करतं. महाराष्ट्रात हे वारे अरबी समुद्रावरून पश्चिमेच्या दिशेने येतात तर उत्तर भारतात बंगालच्या खाडीवरून पूर्व दिशेने येतात. ‘चुपके चुपके चल री पुरवैय्या’ मधली पुरवैय्या म्हणजे हे पूर्व दिशेने येणारे वारे. पुरवैय्या म्हणजे उन्हाळ्यापासून सुटका देणारी शीतलता.

भारतीय शेतकर्‍यासाठी मान्सून एक वरदान आहे. सिंधू संस्कृतीचा उत्कर्ष होत असताना पर्जन्याला देवतेचं स्थान मिळालं ते याच कारणासाठी. आजही भारतीय कृषीव्यवस्था मान्सूनवर अवलंबून आहे. पण मान्सून नेमका कधी येईल ते सांगणं हवामानशास्त्रज्ञांनाही अवघड जातं. याचं कारण मान्सून राजस्थानमधलं तपमान किंवा सिंगापूरमध्ये १० किमी उंचीवर वार्‍याची गती अशा दूरवर पसरलेल्या घटकांवर अवलंबून असतो आणि या सर्व घटकांचं एकमेकांशी असलेलं नातं गुंतागुंतीचं असतं. मान्सून १ जूनला केरळमध्ये येणार असं ढोबळमानाने म्हणता येतं पण कधीकधी तो मे महिन्यातच दाखल झाल्याची उदाहरणं आहेत तर कधी या वर्षी येतो आहे तसा उशिराही येतो. मध्येच एखादं चक्रीवादळ वगैरे आलं तर हे सगळं वेळापत्रक कोलमडूही शकतं. पण तो येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच आपल्या हवामानखात्याचं ब्रीदवाक्य आहे – आदित्यात् जायते वृष्टी: – जोपर्यंत सूर्य आकाशात आहे तोपर्यंत मान्सून येणारच. हे ब्रीदवाक्य काय किंवा ‘नेमेचि येतो पावसाळा’ सारखी म्हण काय – एखादी नैसर्गिक घटना त्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग कसा बनते हेच यातून दिसतं.

युरोपात पहिल्यांदा गेल्यावर ज्या अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावं लागलं त्यातली एक होती, ‘पाऊस कधीही येऊ शकतो’ हा नियम. खरं सांगायचं तर हे काही झेपलं नाही पण सांगता कुणाला? रोज बीबीसी नाहीतर कुठल्यातरी अशाच सायटीवर हवामानाचा अंदाज बघायचा, स्क्रीन ओला दिसला तर छत्री घ्यायची. पण याहीपेक्षा अवघड म्हणजे त्यांची आणि आपली चांगल्या हवेची कल्पना यात जमीन-अस्मानचा फरक आहे. दहा-बारा महिने कडाक्याची थंडी, मध्येच वादळ, पाऊस, बोचणारे गार वारे हे सगळं सहन केल्यावर निरभ्र आकाश आणि सूर्याची उब हवीशी वाटली नाही तरच नवल. हे शरीराला चांगलं वाटतं, पण मनाला मात्र पटत नाही. लहानपणापासून वर्षातले दहा महीने तीस-चाळीस डिग्रीमध्ये काढणार्‍या भारतीयांना सूर्याचं काय कौतुक असणार? आपली चांगल्या हवेची कल्पना म्हणजे चार महिने ‘तेजोनिधी लोहगोलाने’ खरपूस भाजून काढल्यानंतर येणारा मान्सून.

हा जो कल्पनांमधला फरक आहे त्याचं प्रतिबिंब बर्‍याच ठिकाणी दिसतं. पाश्चात्य साहित्यामध्ये किंवा चित्रपटांमध्ये औदासिन्यापासून दु:खापर्यंत कोणतीही नकारात्मक भावना दाखवायची असेल तर काळे ढग, वादळ, पाऊस यांचा वापर हमखास केला जातो. म्हणूनच हॅरी पॉटरच्या शेवटच्या दोन चित्रपटांमधलं राखाडी आकाश आणि पाऊस – पुढे येणार्‍या ‘grim’ घटनांची पूर्वसूचना देतात. याउलट हिरो, हिरविण आणि कंपनीचा ईजय झाला की ढग निवळतात आणि सूर्य डोकावतो. ‘यू आर माय सनशाइन’ टाइपची गाणी तिकडे किलोंनी सापडतील. हा न्याय आपल्याकडे लावायचा म्हटला तर आपण सदासर्वदा सुखीच असयला हवं. याउलट इथे पाऊस म्हणजे दिलासा, सुटका, आशा. आपल्याकडच्या चित्रपटांमध्ये सूर्य आशेचं प्रतीक म्हणून फारच मोजक्या ठिकाणी वापरला गेला आहे. चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे सत्यजित रेंचा ‘कांचनजंघा.’ यात शेवटी ढग जाऊन सूर्याची किरणे कांचनगंगा शिखरावर पडतात. अर्थात कथा दार्जिलिंगमध्ये घडत असल्याने हा शेवट कथानकाला साजेसाच आहे. हिंदी चित्रपटांमध्ये सावन किंवा बरखा हे प्रतीक किती वेळा वापरलं गेलं आहे त्याची गणतीच नाही. इथे एक मजेदार कल्पना सुचली. समजा बाकी सगळ्या गोष्टी समान ठेवून युरोप आणि आशिया खंडातील फक्त हवामानाची अदलाबदल झाली असती तर आज काय चित्र दिसलं असतं? गन्स ऍंड रोझेस नी ‘नोव्हेंबर रेन’ ऐवजी काय गायलं असतं? अंतोनियो विवाल्दीने ‘फोर सीझन्स’मध्ये मान्सूनसाठी कोणतं संगीत दिलं असतं? आपल्या अनामिक पूर्वजांनी मल्हार रागाऐवजी बर्फाळ हिवाळ्यासाठी कोणता राग निर्माण केला असता?

आज महाकवी कालिदास दिन. सुमारे सोळाशे वर्षांपूर्वी लिहीलेल्या मेघदूताच्या सुरूवातीलाच आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख आहे. रामगिरीमध्ये असलेल्या यक्षाला आषाढाच्या पहिल्या दिवशी आकाशाकडे बघताला एक काळा ढग दिसतो. कालिदासाची जन्मतिथी उपलब्ध नसल्यामुळे या श्लोकाचा आधार घेऊन आषाढाचा पहिला दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदासाचा यक्ष ज्या रामगिरीवर होता ते ठिकाण आजच्या नागपूरमधल्या रामटेक गावाजवळ असावे असे मानले जाते. गंमत आहे, कालिदासाला सोळाशे वर्षांपूर्वी आजूबाजूला जे दिसलं असेल त्यातलं आज फार थोडं शिल्लक असावं, पण त्याला जे आकाश दिसलं असेल तेच आपल्यालाही दिसतं आहे.