Categories
चित्रपट​

हो जा रंगीला रे

लहानपणापासून हिंदी सिनेमाचं बाळकडू मिळालेलं. नंतर कालेजात असताना जागतिक सिनेमाची ओळख व्हायला लागली, अजूनही होते आहे. कुरोसावापासून डि सिकापर्यंत किंवा तुलनेने नवीन अशा लार्स व्हॉन त्रेअ सारख्या दिग्दर्शकांनी सिनेमा हे माध्यम किती विविध प्रकारांनी वापरता येतं याची जाणीव झाली. यात आपले दिग्दर्शकही होतेच. रे, बेनेगल, निहलानी, सई परांजपे यांनी जाणीवपूर्वक अर्थपूर्ण सिनेमा देण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्या तुलनेत ठराविक साचे असलेली कथानकं, मेलोड्रामा, गाणी हे सर्व असलेला मेनस्ट्रीम हिंदी सिनेमा तुच्छ वाटायला लागला. सुदैवाने ही ‘फेज’ जास्त काळ टिकली नाही. जागतिक स्तरावरचा कलाप्रवास बघितला तेव्हा ‘ते तिथं’ का आहेत हे समजलंच, पण ‘आपण इथं’ का आहोत हे ही उलगडतय असं वाटायला लागलं.

आजच्या कलाजगताकडे पाहिलं तर त्यावर युरोपचा फार मोठा प्रभाव जाणवतो. आणि याला सहा-सातशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे. चौदाव्या शतकात इटालियन रेनेसान्सने सुरू झालेला हा प्रवास बरोक, एनलायटनमेंट, रोमॅंटिक एरा आणि विसाव्या शतकातील मॉडर्निझ्मसारख्या विविध चळवळी या सर्व स्थित्यंतरांमधून गेला. विशेष म्हणजे ही स्थित्यंतरं सर्व कलाप्रकारांमध्ये बघायला मिळतात. जसं बरोक संगीत एका विशिष्ट प्रकारचं आहे तसंच त्या काळातील स्थापत्यशास्त्र किंवा चित्रकला ही सुद्धा एका विशिष्ट प्रकारची आहे. यामुळे आज युरोपियन कला ज्या पडावावर उभी आहे, तिच्या तिथं असण्याला नेमकी आणि स्पष्ट कारणं आहेत. अगदी मागच्या शतकापर्यंत सर्व जेते देश युरोपमध्येच होते त्यामुळे साहजिकच हे वर्चस्व कलेच्या क्षेत्रात आपसूकचं आलं. अमेरिकेने स्वातंत्र्य मिळाल्यावर इतर क्षेत्रांमध्ये स्वावलंबी होण्याच्या दिशेने यशस्वी वाटचाल केली पण कलेच्या क्षेत्रात मात्र मोठ्या भावाचं अनुकरण करणार्‍या लहानग्याप्रमाणे भक्तीभावाने युरोपियन कलाप्रकार आणि चळवळींना आपलं म्हटलं. कित्येक चळवळींचा उगम युरोपमध्ये झाला असला तरी त्यांना अमेरिकेत जास्त लोकप्रियता मिळाली.

बाकीच्यांचं काय?

या प्रश्नाचा विचार करताना मला वैयक्तिक पातळीवर काही प्रश्न पडतात. वर दिलेला प्रवास कसा झाला हे बघताना या चळवळी, त्यांच्यामागची भूमिका आणि इथे आजूबाजूला दिसणारं आयुष्य यात बरेचदा तफावत जाणवली. याचं कारण उघड असावं. भारतीय समाज या सर्व स्थित्यंतरांमधून गेलाच नाही. तिकडे हा कलाप्रवास चालू होता तेव्हा आपले पूर्वज स्वत:चं अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कलाप्रकारांचा मनमुराद विस्तार होण्यासाठी समाजामध्ये जी एक प्रकारची ‘समाधानी समृद्धी’ लागते (जी रेनेसान्सच्या काळात तिथे होती) ती आपल्या समाजाला कधीच मिळाली नाही. याचा अर्थ आपल्या कलांचा विस्तार झालाच नाही असा अजिबात नाही, पण तो वेगळ्या दिशेने झाला आणि तुलनेने कमी प्रमाणात झाला.

सर्व भारतीय कलाप्रकारांमध्ये हा प्रवास कसा झाला हे जाणून घेण्याइतका माझा अभ्यास नाही त्यामुळे ‘हिंदी सिनेमा’ हे तुलनेनं सर्वपरिचित आणि सोपं उदाहरण घेऊयात. सिनेमा हा कलाप्रकार अस्तित्वात आल्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचा प्रसार वेगवेगळ्या दिशांनी झाला. भारतात पहिल्यापासूनच संगीत हा सिनेमाचा अविभाज्य भाग बनला. भारतीय मेनस्ट्रीम सिनेमाचं इटालियन ऑपेराशी असलेलं साधर्म्य बरेचदा जाणवतं. वास्तववादी चित्रणाऐवजी इंग्रजीत ज्याला ‘इमोशन्स रनिंग हाय’ म्हणतात तसे प्रसंग असणारी कथानकं आणि त्यांना साजेशी भावनाप्रधान पात्रं दोन्हीकडे दिसतात, जवळजवळ प्रत्येक पात्र गाणं म्हणतंच. गाण्यामधून आणि संगीतामधून कथानकाला वेग आणि कलाटण्या मिळतात. हे पाहिल्यावर वाटतं की हिंदी सिनेमा हा जागतिक सिनेमाचा एक स्वतंत्र उपप्रकार मानायला हवा. तसंही जर मॉडर्निस्ट चळवळींचा आणि आपला सुतराम संबंधही आला नाही त्या चळवळींवर बेतलेल्या कुरोसावा आणि अंतोनियोनिच्या फूटपट्ट्या आपण भारतील सिनेमाला का लावायच्या?

या प्रश्नामागे वर म्हटले तसे अनेक वैयक्तिक पातळीवर पडणारे प्रश्न दडलेले आहेत. कलेच्या क्षेत्रात आणि काही प्रमाणात सामाजिक क्षेत्रांमध्ये सध्या ज्या चळवळी प्रसिद्ध आहेत त्यांची ओळख करून घेताना मागे मागे जावं लागतं आणि असं मागे मागे जाताना आपण पार तेराव्या शतकात रेनेसान्सपर्यंत जाऊन पोचतो. हा सगळा प्रवास मेंदूला कळतो पण एक भारतीय म्हणून आपण त्या प्रवासात कुठेही नव्हतो ही जाणीवही प्रखर होत जाते. मग वाटतं, फक्त सध्या तिथे ते विचार रूढ आहेत म्हणून मी ते का स्वीकारायचे? माझा-त्यांचा अर्थाअर्थी काय संबंध? ते विचार मांडताना त्या विचारवंतांच्या डोक्यात भारतीय समाज कुठेही नव्हता, बर्‍याच जणांना भारताची तोंडओळखही नसेल. मग तेच विचार तिथे सर्वमान्य आहेत म्हणून आपण आपल्याकडेही रूढ का म्हणून करायचे? बरं, कलाक्षेत्रात शास्त्रासारखं नसतं. सापेक्षता सिद्धांताचा एकदा शोध लागला की तो सिद्धांत युगांडापासून चिलीपर्यंत सर्वांना मानावाच लागतो. कलाक्षेत्रात अंतिम सत्य कुणाजवळच नसतं. दस्तोयेव्हस्कीच्या काळातील रशियन विचारवंत आणि विसाव्या शतकातील टर्कीमधील विचारवंत बौद्धिकरीत्या पूर्णपणे युरोपवर अवलंबून होते. यामुळे त्या देशांच्या शतकानुशतके चालत आलेल्या संस्कृतीवर एका प्रकारे आक्रमणच झालं आणि त्याचे परिणाम आजही दिसून येतात.

कदाचित या कारणांमुळेच भारतीय सिनेमाला अगदी आतापर्यंत जागतिक स्तरावर मान्यता नव्हती. (रे, घटक असे अपवाद वगळता.) या भावनाप्रधान आणि सारखी गाणी म्हणणार्‍या लोकांचं काय करायचं हेच त्यांना कळत नव्हतं. पण याचा अर्थ भारतीय सिनेमा लोकप्रिय नव्हता का? अजिबात नाही. भाषा, संस्कृती यात कुठेही फारसं साम्य नसताना राज कपूरच्या सिनेमाला रशियन जनतेनं डोक्यावर घेतलं. कपाळावर आठ्या आणून प्रत्येक कलाकृती बघणार्‍या समीक्षकांचं ऐकायचं की एका परकीय संस्कृतीने मनापासून दिलेली ही दाद खरी मानायची? स्वातंत्र्योत्तर काळातील गरीबीमध्ये बुडालेले भारतीय प्रेक्षक वेगळ्या वातावरणात त्याच मूलभूत समस्यांचा सामना करणारे रशियन दोघांनाही राज कपूरचा भणंग ‘आवारा’ आपला वाटावा हे विशेष आहे. फ्रांसमध्ये असताना भारतीय आहोत असं कळल्याबरोबर कॉफी देणार्‍या मुलीनं ‘रूक जा ओ दिल दीवाने’ म्हणायला सुरूवात केली होती. रशियाच नव्हे तर आखाती देशांमध्येही हिंदी सिनेमा पूर्वीपासून लोकप्रिय आहे आणि आतातर जवळजवळ सर्व प्रमुख देशांमध्ये त्याचे चाहते आहेत.

या सर्वांचा अर्थ जागतिक सिनेमा किंवा त्यामागची भूमिका समजून घ्यायची नाही असा अजिबात नाही. पण तुलना करताना तारतम्य असावं एवढी माफक अपेक्षा आहे. सिंहगडावर गेल्यावर झुणका-भाकरच मिळणार, तिथं पिझ्झाची अपेक्षा ठेवू नये. सत्यजित रे एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते, “भारतीय प्रेक्षक फारच मागासलेला आहे.” एका अर्थानं खरं असावं. बर्गमनला डोक्यावर घेणार्‍या स्वीडीश प्रेक्षकाइतकी भारतीय जाणीव विस्तारलेली नाही. पण तिला तितका वेळ तरी कुठे मिळाला आहे? अजूनही ६४ % लोक दारिद्य्र रेषेखाली असणार्‍या आपल्या देशामध्ये सिनेमा हे दोन घटका विरंगुळा मिळण्याचंच साधन आहे. पन्नास-शंभर वर्षं मूलभूत गरजांसाठी झगडणं बंद होऊ देत, आपणही वेगळ्या वाटा चोखाळू.

मग हिंदी सिनेमा बघायचा तरी कसा? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हिंदी गाणी मनापासून आवडणं अत्यावश्यक आहे. ‘याहू’ पासून ‘रंगरेजा’पर्यंत सगळ्या हाकांना दाद देता यायला हवी. सैगलपासून रहमानपर्यंत सर्व प्रकारच्या संगीताचा तुम्ही आस्वाद घेऊ शकत नसाल तर हिंदी सिनेमातली गाणी कंटाळवाणी नाही वाटणार तर काय होईल? ओपीचा ठेका, खय्यामचं पहाडीचं ऑबसेशन असो की आरडीचे विविध प्रयोग – मूडप्रमाणे यात तुमचे फेवरिट असायला हवेत.

रंगीलामध्ये उर्मिला जशी रहमानच्या गाण्यांमध्ये स्वत:ला झोकून देते तसं काहीसं.

——

१. पुलंच्या म्हणण्यानुसार समीक्षक बोहारणीसारखे असतात. नवीकोरी पैठणी दिली तरी अजून काही आहे का म्हणून विचारतील.